'सहकार' देणार शेतकऱ्यांना कर्जसंजीवनी
-
Saturday, January 28, 2012 AT 03:00 AM (IST)
नाशिक - राज्यात दर वर्षी 12 हजार कोटींचे शेती कर्ज वितरित होत असून, येत्या 2020 पर्यंत ते 20 हजार कोटींपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट सहकार खात्याने ठेवले आहे, असे प्रतिपादन सहकारमंत्र्यांचे स्वीय सचिव डॉ. विजय सूर्यवंशी यांनी येथे केले.
'जागतिक सहकार वर्ष 2012'निमित्त प्रजासत्ताकदिनी शहरात सहकार दिंडी व सहकार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी श्री. सूर्यवंशी बोलत होते. जिल्हाधिकारी पी. वेलरासू अध्यक्षस्थानी होते. "सकाळ'च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक विश्वास देवकर, सहकार वर्धिनीचे संचालक प्रकाश मिसाळ या वेळी प्रमुख वक्ते होते. सहकार दिंडीला जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या कर्मचाऱ्यांनी सहकार क्षेत्रातील विविध मान्यवरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन "विना सहकार नही उद्धार'च्या घोषणेने परिसर दणाणून सोडला होता. सहकारी दिंडीचा प्रारंभ हुतात्मा स्मारक येथून विभागीय सहनिबंधक (आदिवासी उपयोजना) अनिल चव्हाण यांच्या हस्ते झाला. गौतम भालेराव, जिल्हा उपनिबंधक बाजीराव शिंदे, प्रभारी सहनिबंधक दिगंबर हौसारे, तालुका उपनिबंधक चंद्रशेखर बारी यांनी सहकाराची पालखी पुढे नेली. त्यानंतर सीबीएस, शिवाजी रोड, नेहरू उद्यान, मेन रोड, गाडगे महाराज पुतळा, इंदिरा गांधी चौक, गंजमाळमार्गे दिंडी कालिदास कलामंदिरात आली.
डॉ. सूर्यवंशी म्हणाले, 'सहकार चळवळीचा उगम लोकसहभागातून लोककल्याण या जाणिवेतून झाला आहे. सद्यःस्थितीत जागतिकीकरण आणि मुक्त आर्थिक धोरणाच्या काळात सहकारावरचा विश्वास वाढला आहे. त्यामुळे सहकार ही सक्षम अशी यंत्रणा आपले वेगळेपण टिकवून आहे. "सहकार ते कॉर्पोरेट' या संकल्पनेचा आपण स्वीकार करायला हवा. सहकार या सामाजिक आर्थिक चळवळीची वाटचाल आज राजकीय राजकीय चळवळ होऊ पाहत आहे. त्यावर चिंतन होणे गरजेचे आहे.''
श्री. वेलरासू म्हणाले, 'जनसामान्यांसाठीच्या योजना तळागाळापर्यंत पोचविण्यासाठी "सहकार' हे प्रभावी माध्यम आहे. हा विचार प्रत्येकाने रुजविल्यास आपल्याला संपन्न समाजाचा पर्याय मिळेल. जिल्ह्यातील पाच हजार कोटी रुपयांच्या पत आराखड्यापैकी एक हजार कोटी केवळ सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोचविले जातात. शासनाच्या कोणत्याही योजना पोचविण्यासाठी सहकारी सोसायट्यांसारखा दुसरा चांगला पर्याय आजपर्यंत सापडलेला नाही.''
श्री. देवकर म्हणाले, 'मानवता, समता आणि आर्थिक समानता या मूल्यांवर सुरू झालेली "सहकार' ही जनचळवळ व्यवस्थेला नवा विचार देणारी ठरली आहे. ही चळवळ जिवंत ठेवण्यासाठी सर्वसामान्यांनी चांगुलपणाचा आवाज वाढवला पाहिजे. सामन्यांचा दुर्दम्य विश्वास व आशावादच सहकाराचा तारक ठरला आहे.''
श्री. मिसाळ म्हणाले, '"सहकार चळवळीची व्याप्ती वाढविण्यासाठी सार्वजनिक माध्यमांचा उपयोग करणे गरजेचे आहे. सहकाराला अभिप्रेत असलेल्या मूल्यांना न विसरता वाटचाल केली तरच ती खऱ्या अर्थाने विकासाकडे वाटचाल होईल.''
या वेळी कोकण विभागाचे विभागीय सहनिबंधक एम. आर. मोरे, अप्पर आयुक्त सहकार सुधीर तुंगार, सुरेशकुमार शेडपुरे, विशेष जिल्हा लेखापरीक्षक विजय सावंत, डी. एस. प्रायः उपस्थित होते. नरेश महाजन यांनी सूत्रसंचालन केले. प्रभारी विभागीय सहनिबंधक दिगंबर हौसारे यांनी आभार मानले. दिंडी यशस्वितेसाठी विशेष सहकार्य केल्याबद्दल विश्वास सहकारी बॅंकेचे कौतुक करण्यात आले. या वेळी वाय. आर. शिरसाट, विश्वास ठाकूर, संजय चव्हाण, मोतीलाल गायकवाड, प्रकाश सोळुंके, आव्हाड, संजय गिते, संतोष वाघचौरे, अविनाश खैरनार आदींसह विविध संस्थांचे अधिकारी उपस्थित होते.