बोईंगला दुसरी धावपट्टी नको, टॅक्सी-वे हवा - दिनेश केसकर
-
Saturday, January 28, 2012 AT 04:00 AM (IST)
नागपूर - मुख्यमंत्र्यांसह मिहानचे सर्व अधिकारी दुसऱ्या धावपट्टीसाठी आग्रही असताना बोईंगच्या एमआरओकरिता दुसऱ्या धावपट्टीची गरज नसल्याचे बोईंग इंटरनॅशनलचे उपाध्यक्ष डॉ. दिनेश केसकर यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. बोईंगच्या एमआरओसाठी "टॅक्सी-वे' तयार करून द्यावा. तो दिल्यास पुढच्या वर्षी मार्च महिन्यात एमआरओचे फंक्शन सुरू होईल, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
तुळशीराम गायकवाड पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित दोनदिवसीय चर्चासत्राच्या उद्घाटनाला डॉ. केसकर आले असता पत्रकारांशी बोलत होते. मिहान आणि बोईंग प्रकल्पामुळे विदर्भाच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा मिळणार आहे. भारताने बोईंग विमानाची खरेदी केली तेव्हाच नागपूरला देखभाल दुरुस्ती केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. जागतिक मंदी आणि काही तांत्रिक अडचणींमुळे तीन वर्षे उशीर झाला आहे; आता मात्र सर्व अडचणी संपल्या आहेत. एमआरओच्या कामाला सुरवात झाली आहे. याकरिता लागणाऱ्या मनुष्यबळाची नियुक्ती एअर इंडियाच्या माध्यमातून केली जाईल तर त्यांना प्रशिक्षित करण्याची जबाबदारी बोईंगची राहील. यात नागपूरच्या युवकांना रोजगार मिळेल ते सांगणे कठीण आहे. प्रकल्पात अत्याधुनिक उपकरणे लावण्यात येणार असून तीन वर्षांपर्यंत एअर इंडियाला प्रकल्पाचे "मेंटनन्स' नाही. बोईंगला झालेल्या विलंबाला जागतिक मंदीच जबाबदार आहे. यात कुठलाही राजकीय हस्तक्षेप नाही. केवळ बोईंगच नव्हे, तर इतर कंपन्यांनी मंदीमुळे गुंतवणूक केलेली नाही. यावेळी डॉ. केसकर यांनी '787' या प्रवासी विमानाबाबत माहिती दिली तसेच मार्च महिन्यात नवीन विमाने एअर इंडियात दाखल होणार असल्याचे सांगितले.
मार्च 2013 मध्ये "एमआरओ' होणार पूर्ण
बोईंगचा एमआरओ नागपूरमध्ये उभारला जाणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. अनेकदा भूमिपूजनाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या. मध्यंतरी हा प्रकल्प पळवण्यात आल्याच्या चर्चा होत्या. याबाबत विचारणा केली असता यात काही तथ्य नसल्याचे डॉ. दिनेश केसकर यांनी सांगितले. एमआरओ प्रकल्पाच्या संपूर्ण उभारणीचे काम सुरू झाले आहे. दररोज सहाशेपेक्षा अधिक कामगार राबत आहेत. डिसेंबर अखेर प्रकल्पाचे काम पूर्ण होईल. मार्च 2013 मध्ये एमआरओचे प्रत्यक्ष ऑपरेशन सुरू होईल, असे डॉ. केसकर यांनी सांगितले.