सोनसाखळ्या चोरणाऱ्या चौकडीला अटक
- सकाळ वृत्तसेवा
Sunday, January 29, 2012 AT 12:00 AM (IST)
बेळगाव - यात्रेतील महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या लांबविणाऱ्या चौघांना बेळगाव ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. तर, एकजण फरारी आहे. अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीपैकी तिघे कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. तर, एकजण उचगाव (ता. बेळगाव ) येथील आहे. या आरोपींकडून पावणे दोन लाख रुपये किंमतीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
याबाबत बेळगाव ग्रामीण पोलिसांनी सांगितले, की पिरनवाडीमध्ये 27 जानेवारीला रात्री गस्त घालीत असताना एक टाटा सुमो (एमएच-01, डीए-3906) गाडी आली. या गाडीला पोलिसांनी थांबविण्याचा इशारा केला; पण गाडी चालकाने पोलिसांना पाहून गाडी अधिक वेगाने पळवली. त्यामुळे संशय बळाविलेल्या पोलिसांनी गाडीचा पाठलाग केला आणि गाडी अडविली. गाडीसह संशयित आरोपी जितेंद्र ऊर्फ पिंटू किसनसिंग रजपूत (वय 30, उचगाव, गणेश कॉलनी), एकनाथ बाबूराव पाटील (वय 50, यादववाडी, जि. कोल्हापूर), सचिन रामचंद्र भोसले (वय 30, रा. विक्रमनगर), चंद्रकांत गणपत पोवार (वय 32, रा. दत्त गल्ली, कोल्हापूर) या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता या आरोपींनी कुरबनट्टी आणि मच्छे येथे यात्रेमध्ये महिलांच्या गळ्यातील दागिने लांबविल्याची माहिती दिली. दोन्ही ठिकाणी सुमारे साडेसहा तोळे दागिने लांबविले असून, त्याची किंमत सुमारे पावणे दोन लाख रुपये असल्याचे सांगितले. पोलिसांनी गाडीमधील सुमारे 5 हजार रुपयांचे क्रॅंकशाफ्टही जप्त केले आहे. दरम्यान, या प्रकरणातील आणखी एक आरोपी प्रकाश ऊर्फ दत्तू यल्लाप्पा जाधव (रा. मणेरमाळ, ता. करवीर, जि. कोल्हापूर) हा फरारी असून, त्यालाही ताब्यात घेण्यासाठी जाळे विणण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. बेळगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात याची नोंद आहे.