Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन

तरुण, नव्या चेहऱ्यांना राष्ट्रवादीची पसंती
- सकाळ वृत्तसेवा
Sunday, January 29, 2012 AT 12:00 AM (IST)
सांगली - राष्ट्रवादी कॉंग्रेसने तरुण, नव्या चेहऱ्यांना पसंती दिली आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांनी आज सायंकाळी जिल्हा परिषदेसाठी 41 आणि पंचायत समितीसाठी 68 जणांची पहिली यादी जाहीर केली. त्यात प्रामुख्याने दत्तूशेठ सूर्यवंशी, मनोज शिंदे - म्हैसाळकर, भीमराव माने, अप्पासाहेब हुळ्ळे, सुहास बाबर, देवराज पाटील, सम्राट नाईक, सुनंदा लाड आदींचा समावेश आहे. तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्‍यांतील जागा वाटपाचा तिढा मात्र आजही सुटला नाही. आटपाडीतील एका गटाने केलेली बंडखोरी रोखण्यातही नेत्यांना यश आले नाही.

पक्षाने 700 इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. त्यानंतर उमेदवार निवडीसाठी सांगली ते मुंबई आणि पुन्हा सांगली असा चर्चेचा प्रवास झाला. आरक्षित मतदार संघाचा तिढा सुटला; पण सर्वसाधारण गटातील उमेदवार निवडीसाठी नेत्यांना कसरत करावी लागली. गटा-तटाचाही प्रश्‍न पुढे आला, त्यामुळे यादी लांबली. साऱ्या इच्छुकांनी अर्ज दाखल केले; पण अधिकृत उमेदवारीची त्यांना प्रतीक्षा करावी लागली. कोणा कोणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अखेर आज सायंकाळी कवठेमहांकाळ आणि तासगाव वगळून अन्य तालुक्‍यातील उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली. जाहीर झालेल्या उमेदवार यादीतही काही काही जागाबाबत वाद असल्याने राष्ट्रवादीच्या उमेदवारीसाठी अजूनही रस्सीखेच सुरूच आहे.
बेडग मतदारसंघातून बाजार समितीचे संचालक संभाजी पाटील यांना डच्चू देण्यात आला असून तिथे मनोज शिंदे- म्हैसाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कुंडलमधून किरण लाड यांच्या पत्नी सुनंदा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कासेगावमधून ग्रामीण विकासमंत्री जयंत पाटील यांचे चुलत भाऊ देवराज पाटील, वाळव्यात वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील यांचे भाऊ राजेंद्रकुमार पाटील, नेर्लेतून विद्यमान सदस्य लिंबाजी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिराळ्यात आमदार मानसिंगराव नाईक यांच्या नातेवाईक वैशाली अभिजित नाईक यांना तर मालगावमधून अप्पासाहेब हुळ्ळे यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.

पंचायत समितीसाठी माजी आमदार अनिल बाबर यांचा मुलगा सुहास यांना गार्डीमधून, आळसंदमधून महिला नेत्या आशाराणी जाधव, कांदे (शिराळा) मतदारसंघात युवक आघाडीचे तालुकाध्यक्ष सम्राट नाईक यांना तर बाजार समितीचे सभापती वैभव पाटील यांच्या पत्नी वैशाली आणि बाजमध्ये आकाराम मासाळ यांच्या भावजय लक्ष्मी अप्पासाहेब मासाळ यांना उमेदवारी दिली आहे.

कवठेमहांकाळ, तासगाव आणि पलूस तालुक्‍यांतील जागा वाटपाचा तिढा आजही सुटला नाही. आटपाडीमध्ये एका गटाने बंडखोरी केली असून त्यांनी चर्चेलाही नेत्यांना प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे तिथे हणमंतराव देशमुख, रामभाऊ पाटील आणि आनंदराव पाटील गटाची बंडखोरी अटळ असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांनी वाद मिटेल, असा दावा करीत दुसरी यादी उद्या जाहीर केली जाईल, असे सांगितले.

बागणीही प्रतिष्ठेची
राष्ट्रवादीने नवे चेहरे, युवकांना आणि पहिल्यांदाच राजकीय पटलावर पाऊल टाकणाऱ्या महिलांना संधी दिली असली तरी नात्या-गोत्याच्या राजकारणाचा विचार झाल्याचे यादीवरून निदर्शनास येते. बागणी (ता. वाळवा) मतदारसंघात खुद्द जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांच्या स्नुषा इच्छुक आहेत. इथली उमेदवारी प्रतिष्ठेची ठरली आहे.

उमेदवारी मिळालेली प्रमुख नावे
अमर देशमुख, दत्तूशेठ सूर्यवंशी, मनोज शिंदे- म्हैसाळकर, भीमराव माने, अप्पासाहेब हुळ्ळे, सुहास बाबर, देवराज पाटील, सम्राट नाईक, सुनंदा लाड, विद्युलता अमरसिंह फडनाईक, नंदाताई रामचंद्र पाटील, वैशाली अभिजित नाईक, रवींद्र बर्डे, सम्राट नाईक, अरविंद तांबवेकर, पद्‌मश्री महावीर पाटील.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: