Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन

पेस शाबास... टीम इंडियाला 'वाईट'वॉश!
- वृत्तसंस्था
Sunday, January 29, 2012 AT 12:00 AM (IST)
Tags: india,   cricket,   tennis,   sports
ऍडलेड/ मेलबर्न - ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर सुरू असलेल्या टेनिस आणि क्रिकेट या दोन्ही खेळांमध्ये भारतासाठी शनिवार हा मिश्र भावनांचा ठरला. एकीकडे अव्वल टेनिसपटू लिअँडर पेसने "ऑस्ट्रेलियन ओपन'च्या दुहेरीचे विजेतेपद पटकावत "करिअर स्लॅम' पूर्ण केले; तर दुसरीकडे यजमान ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिकेत भारताला 4-0 असे पराभूत केले. अवघ्या आठ महिन्यांपूर्वी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या भारतीय संघावर सलग दोन परदेश दौऱ्यांमध्ये "व्हाईटवॉश' पत्करण्याची नामुष्की आली.

लिअँडर पेसने चेक प्रजासत्ताकाचा जोडीदार रॅडेक स्टेपानेक याच्या साथीत ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात त्यांनी माईक आणि बॉब या अमेरिकेच्या जुळ्या ब्रायन बंधूंवर दोन सेटमध्ये 7-6 (7-1), 6-2 अशी मात केली. पेसला आतापर्यंत ऑस्ट्रेलियन ओपनमधील विजेतेपदानेच हुलकावणी दिली होती. दुहेरीतील हे त्याचे सातवे विजेतेपद आहे. पेसने रशियाच्या एलेना व्हेस्निनासह मिश्र दुहेरीतही अंतिम फेरी गाठली आहे. त्यांची अमेरिकेची बेथानी मॅटेक सॅंड्‌स आणि रुमानियाची होरिया टेकॅयू यांच्याशी उद्याच लढत होत आहे. मिश्र दुहेरीत पेसने सहा विजेतीपदे मिळविली असून, त्याला केवळ फ्रेंच जेतेपद मिळवता आलेले नाही.

भारतीय क्रिकेट संघाची परदेशातील अपयशी मालिका ऍडलेडमध्येही कायम राहिली. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये भारताला एकदाही ऑस्ट्रेलियावर वर्चस्व गाजवता आले नाही. कागदावर बलाढ्य दिसणाऱ्या "टीम इंडिया'चे "बलाढ्य' आणि "विश्‍वविक्रमी' फलंदाज ऑस्ट्रेलियामध्ये पूर्णत: निष्प्रभच ठरले. या दौऱ्यामध्ये आतापर्यंत भारताचे फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक काहीही कमाल दाखवू शकलेले नाहीत. तीनपेक्षा जास्त कसोटी सामने असलेल्या सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि वीरेंद्र सेहवाग हे चौघेही किमान तीन कसोटी एकूण 16 मालिकांमध्ये खेळले आहेत. यांपैकी, यंदाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील धावांची सरासरी नीचांकी आहे. सचिन, राहुल, लक्ष्मण यांचा शेवटचा ऑस्ट्रेलिया दौरा, सचिनचे बहुचर्चित-बहुप्रतीक्षित "महाशतक', या मालिकेआधी ऑस्ट्रेलियाला दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडने दिलेले पराभवाचे धक्के या सगळ्या वातावरणात "हा भारतीय संघ ऑस्ट्रेलियात मालिका जिंकू शकेल' असा आत्मविश्‍वास दौऱ्याआधी बहुतेक सर्वांनीच व्यक्त केला होता; पण ऑस्ट्रेलियाच्या ताज्या दमाच्या गोलंदाजांनी अनुभवी भारतीय फलंदाजांचे घामटेच काढले. चार कसोटींमध्ये, आठ डावांमध्ये "बिग थ्री'सह सेहवाग आणि गंभीर या प्रमुख फलंदाजांना एकही शतक झळकावता आले नाही, हीच गोष्ट ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी किती अचूक होती, हे स्पष्ट करते.

गेल्या वर्षी जुलै महिन्यामध्ये झालेल्या इंग्लंड दौऱ्यात कसोटी आणि "वनडे'मध्ये भारताला पूर्ण अपयश पत्करावे लागले होते. आता ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिका तर गमावलीच आहे... आता फेब्रुवारीत होणाऱ्या " "वनडे'मध्येही भारताचे असेच हाल करू,' असा विश्‍वास ऑस्ट्रेलियाने व्यक्त केला आहेच. या पराभवातून भारतीय संघ काही धडे घेईल, हीच एक छोटीशी आशा...!
प्रतिक्रिया
On 29/01/2012 12:41 AM Prakash said:
आम्ही धडे खूप घेऊ,,पण परीक्षेत नापास होऊ कारण अभ्यास करणार नाही हि भिस्म्प्रतीज्ञ घेतली आहे!!!


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: