Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन

पोलिसांना 165 कोटींद्वारे आधुनिक चेहरा
-
Thursday, February 23, 2012 AT 03:30 AM (IST)

नाशिक - महाराष्ट्र पोलिस दलाच्या आधुनिकीकरणावर गेल्या तीन वर्षांपासून भर देण्यात आला असून, यावर्षी 165 कोटी रुपये आधुनिकीकरणावर खर्च होणार आहेत. आधुनिक साधने, तसेच प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून पोलिसांनी दहशतवादी शक्तींना हद्दपार करावे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे केले.

अखिल भारतीय पातळीवरील 55 व्या पोलिस कर्तव्य मेळाव्याचे उद्‌घाटन आज सायंकाळी पोलिस अकादमीत मुख्यमंत्र्यांनी केले. या वेळी अप्पर पोलिस महासंचालक के. के. पाठक, श्रीदेवी गोयल, महाराष्ट्र पोलिस अकादमीचे संचालक संजय बर्वे, पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल उपस्थित होते. 28 राज्यांतून आलेल्या 827 जवानांनी शानदार संचलन करून त्यांना मानवंदना दिली.

मेळाव्याचे उद्‌घाटन झाल्याचे जाहीर करून श्री. चव्हाण म्हणाले, की 1953 पासून सुरू झालेला हा पोलिस कर्तव्य मेळावा यंदा नाशिकसारख्या पवित्र शहरात होत असल्याचा आम्हाला अभिमान आहे. यानिमित्ताने होणाऱ्या विविध स्पर्धांतून घातपातविरोधी तपासणी, संगणक कौशल्य, विज्ञानाची तपासकार्यासाठी मदत यावर सविस्तर विवेचन होऊन आगामी काळात तपासादरम्यान खूप मदत होईल. दैनंदिन कामकाज करताना हे अनुभव निश्‍चित कामी येतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

राज्य आणि केंद्र शासनाने गेल्या तीन वर्षांपासून पोलिस दलाच्या आधुनिकीकरणावर विशेष भर दिला आहे. 2009 मध्ये 103 कोटी रुपये राज्याला मिळाले होते. यंदा 165 कोटी रुपये मिळाले आहेत. त्यातून अत्याधुनिक वाहने, संगणकीकरण, घातपाती कारवाया रोखण्यासाठी विशेष उपाययोजना केल्या जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

श्री. पाठक यांनी प्रास्ताविक केले. कर्तव्य मेळाव्याचे महत्त्व त्यांनी विशद केले. एम. एम. खंदारे यांनी संचलन केले. संतोष जाधव यांनी क्रीडाज्योत नेली. एचएएल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी 26 नोव्हेंबरच्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या घटनेवर आधारित नृत्य सादर केले.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: