घाम का येतो?
 | | (डॉ. म. गो. गोगटे)
उन्हात फिरलो की घाम येतो, व्यायाम केला की घाम येतो, घाबरलो की घाम येतो, तसंच
घाम येतो आणि ताप उतरतो असे घामाचे अनेक संदर्भ आपल्या अनुभवात येत असतात.
त्याबद्दल अनेक तक्रारीही असतात. घाम नेमका येतो कसा आणि का हे कोडे उलगडले की
त्याबद्दलच्या तक्रारी दूर करण्याचे अनेक उपायही सहज समोर येऊ लागतात. .......
एखादी दुःखद किंवा भीतिदायक वार्ता कानावर आली की पुष्कळांच्या अंगाला घाम येतो.
मुलाखतीला आलेल्या उमेदवारांच्या हाता-पायावर किंचित घाम सुटलेला असतो. व्यायाम
करीत असलेल्या व्यक्तीच्या त्वचेवर घामाचा स्राव आढळून येतो. व्यायाम तीव्र
प्रकारचा आणि खूप वेळ टिकणारा असला तर अशा व्यक्तीच्या त्वचेवरून घामाच्या धारा
ओघळलेल्या असतात. दुपारी उन्हात हिंडल्यावर घाम येतोच. ताप उतरण्याच्या औषधामुळे
घाम येतो आणि ताप कमी होतो. मलेरियामुळे सकाळच्यावेळी अंगातील तापमान वाढत जाते.
काही रुग्णांना हुडहुडीही भरते. सायंकाळी घाम येऊन हा ताप उतरतो. क्वचित प्रसंगी
हृद्रोगाच्या रुग्णांमध्ये अंगाला दरदरून घाम येणे हे एक महत्त्वाचे लक्षण दिसून
येते. या सर्व वर्णनांवरून असे दिसून येते की त्वचेमधून बाहेर पडणाऱ्या घाम या
स्रावाचा भावनिक वर्तनाशी जवळचा संबंध आहे. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे घाम
निर्मिती आणि त्वचेच्या बाह्य स्तरावरून घडत जाणाऱ्या बाष्पीभवनामुळे शरीराचे
तापमान ३७ अंश सेल्सिअस किंवा ९८ अंश फॅरेनहाइट या पातळीवर कायम राहण्यास मदत होते.
तापमान कायम राहण्याचा लाभ
पाण्यात राहणारे जलचर, मगरी, साप यासारख्या प्राण्यांच्या शरीराचे तापमान
सभोवतालच्या वातावरणानुसार बदलत असते. पक्षी आणि सस्तन प्राण्यांचे असे नसते.
त्यांच्या शरीरातील इंद्रियांचे तापमान एका विशिष्ट पातळीला कायम ठेवले जाते.
सभोवतालच्या वातावरणाचे तापमान शून्य ते ४८ अंश सेल्सिअसपर्यंत कसेही बदलले तरी
मानवी शरीराचे तापमान ३७ अंश सेल्सिअसच्या पातळीला कायम असते. यात बदल झाले तरी
शरीराची यंत्रणा इतकी कार्यक्षम असते की, शरीरातील तापमान एखाद्या अंशानेच खाली-वर
झालेले आढळते. शरीरातील हा बदल अभियांत्रिकी शास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहिले
तरी नगण्यच समजला पाहिजे. शरीराचे तापमान कायम राहिल्याने शरीरातील पेशींमध्ये
सातत्याने कार्यरत असलेली अगणित विकरे (एन्झाइम्स) आपापली कार्ये सुयोग्य रीतीने
पार पाडू शकतात.
तापमान कायम ठेवण्याची यंत्रणा
तापमापीवर (थर्मोमीटर) शरीराचे तापमान मोजले तर ते साधारणतः ९८ अंश फॅरेनहाइटच्या
पातळीवर कायम असलेले आढळते. आपल्या अन्नातील प्रथिने, कर्बोदके आणि मेदपदार्थ या
सर्वांमुळे शरीरात उष्णता निर्माण होते. एक ग्रॅम प्रथिने किंवा कर्बोदकांच्या
चयापचयामध्ये प्रत्येकी चार किलो कॅलरी उष्मांक निर्माण होतात. मेद पदार्थांचा
रेणू खूप लांबलचक असल्याने प्रत्येक ग्राम मेद पदार्थांच्या चयापचयामुळे ९
किलोकॅलरी उष्मांक निर्माण होतात. या अन्नघटकांच्या चयापचयातून शरीरात निर्माण
होणारी ही सर्व उष्णता एकाचवेळी शरीराबाहेर टाकली जात नाही. बरीचशी उष्णता ऊर्जा
ऍडिनोसिन ट्राय फॉस्फेट (एटीपी) या रेणूच्या माध्यमातून साठवणूक करून ठेवली जाते.
ही साठवलेली शक्ती दैनंदिन कार्ये, व्यायाम किंवा संकटाच्या वेळी इंद्रियांना
आवश्यक असलेली ऊर्जा पुरवीत राहते. शरीर स्थिर स्थितीत विश्रांती घेत असले तरी
श्वासोच्छ्वास, हृदयक्रिया, मेंदूचे कार्य, यकृतातील चयापचय क्रिया आणि मूत्रपिंड
या सर्वांच्या क्रियांमध्ये शक्तीचा वापर केला जातो. तसेच अतिरिक्त शक्ती
उष्णतेच्या रूपात शरीराबाहेर पडते. बाहेर पडणारी उष्णता शरीरातील तापमान कायम
ठेवण्यास मदत करते. हा समतोल राखण्याचे कार्य करणारे मुख्य केंद्र मेंदूतील
अधश्चेतक पेशीपुंजात (हायपोथॅलॅमस) आढळते.
उष्णता बाहेर पडण्याच्या क्रिया
सभोवतालचे तापमान शरीराच्या तापमानापेक्षा कमी असेल तर, आपले शरीर संपर्कात
येणाऱ्या प्रत्येक निर्जीव वस्तूला आपले शरीरातील उष्णता कंडक्शन पद्धतीने प्रदान
करीत राहते. खुर्ची, सोफा, बिछाना यांवरून उठल्यानंतर त्यांचे तापमान किंचित
वाढलेले आढळते ते त्यामुळेच. खोलीत निश्चल बसून राहिलेली व्यक्ती आपल्या
आजूबाजूच्या भिंती आणि शरीराशी संपर्क न येणाऱ्या प्रत्येक वस्तूला प्रारण
(रेडिएशन) या प्रक्रियेद्वारे उष्णता प्रदान करीत असते.
अंगावर कपडे असले, तर कपडे आणि शरीर यामध्ये जमलेली हवा त्वचेच्या तापमानामुळे गरम
होऊन वजनाने हलकी झाल्याने वरच्या पातळीला सरकून आपल्यासोबत थोड्याफार प्रमाणात
उष्णताही काढून नेते.
या सर्व क्रियांमध्ये घाम निर्मिती आणि त्यामधील द्रवाच्या बाष्पीभवनाच्या
प्रक्रियेमुळे शरीरातील उष्णता बाहेर टाकली जाण्याचे प्रमाण सर्वाधिक असते.
व्यायामामुळे ऐच्छिक स्नायूंचे आकुंचन होऊन शरीरात वाजवीपेक्षा अधिक उष्णता
निर्माण होते. त्यामुळे शरीराचे तापमान काही क्षण वाढते. या क्षणिक तापमानवाढीमुळे
मेंदूच्या अधश्चेतक भागातील तापमान नियंत्रणाचे केंद्र उत्तेजित होते आणि
त्यामधील संदेश त्वचेतील रक्तवाहिन्या आणि असंख्य घर्मग्रंथींपर्यंत पोचतात. या
संदेशामुळे रक्तवाहिन्या रुंदावतात आणि घर्मग्रंथी उत्तेजित होऊन त्यामधून होणारी
घामाची निर्मिती वाढते. व्यायाम तीव्र स्वरूपाचा असला तर घामाची निर्मिती प्रत्येक
तासाला १६०० मिली पर्यंत पोचू शकते.
घर्मग्रंथी आणि उष्णताक्षती
त्वचेच्या अस्तरामध्ये घाम बाहेर टाकणाऱ्या घर्मग्रंथी आढळतात. एकेक ग्रंथी वेटोळे
घातलेल्या नलिकेसारखी दिसते. या ग्रंथींतून निघालेल्या घर्मनलिका त्वचेच्या बाह्य
स्तरापर्यंत पोचतात. घर्मग्रंथींतील द्रवरूप घाम नलिकेच्या मार्गाने त्वचेच्या
बाहेरील भागापर्यंत आणला जाऊन नलिकेच्या तोंडाजवळ आल्यावर या द्रवाचे बाष्पीभवन
होते. बाष्पीभवनाच्या क्रियेत एक ग्रॅम पाण्याबरोबर ०.६ किलो कॅलरी उष्णता
शरीराबाहेर पडते. या क्रियेमुळे शरीरातील तापमान सर्वसाधारण पातळीवर राहण्यास खूप
मदत होते.
आपल्या त्वचेच्या आंतरस्तरामध्ये अंदाजे २० लाख घर्मग्रंथी असाव्यात. प्रत्येक
ग्रंथीला केशवाहिन्यांमधून सतत रक्तपुरवठा होत असतो. तसेच, स्वायत्त
मज्जासंस्थेच्या अनुकंपी भागातील चेतातंतू घर्मग्रंथीभोवती आढळतात. अधश्चेतकातील
संदेश या चेतातंतूंच्या जाळ्यामधून घर्मग्रंथीमध्ये पोहोचतात आणि घर्मग्रंथींना
उत्तेजित करतात. शरीर विश्रांती घेत असताना त्वचेतील केशवाहिन्या आणि
श्वसनसंस्थेद्वारे दर दिवशी ६०० मिलिलिटर पाणी शरीराबाहेर पडते. त्यायोगे देखील
शरीरातून उष्णता बाहेर पडते. हे पाणी आपल्या नकळत बाहेर पडत असून त्यावर
अधश्चेतकाचा ताबा नसतो. अशा प्रकारच्या नकळत निर्माण होत असलेल्या घामनिर्मितीला
"इन्सेन्सिबल' घाम निर्मिती असे म्हणतात. घर्मग्रंथील निर्माण होणाऱ्या घामाला
निराळे महत्त्व प्राप्त झाले आहे. हा स्राव अधश्चेतकातील पेशीपुंजाला उत्तेजना
देऊन कमी-अधिक करता येतो. शरीरातील उष्णता उत्सर्जित करण्यासाठी उपयोगी पडणाऱ्या
तीन क्रियांपैकी बाष्पीभवनाचे महत्त्व खूपच मोठे आहे. बाहेरील वातावरणाचे तापमान
३७ अंश सेल्सिअस किंवा ९८ अंश फॅरनहीटपेक्षा जास्त असले तर कंडक्शन, कन्व्हेक्शन
आणि रेडिएशन (वहन, प्रेषण आणि प्रारण) या क्रियांमुळे आपल्या त्वचेचे आणि त्यावर
वापरण्यात येणाऱ्या कपड्यांचे तापमान वाढते. हे तापमान प्रमाणित पातळीवर
ठेवण्यासाठी त्वचेमधून घामावाटे आणि थोड्याफार प्रमाणात नकळत स्रवणाऱ्या
इन्सेन्सिबल घामावाटे पाण्याची वाफ होऊन शरीरातील उष्णता त्वचेमार्गे बाहेरील
वातावरणात सोडली जाते. वातावरणातील बाष्पाचे प्रमाण आणि व्यक्तीच्या अंगावरील
कपड्यांचे प्रमाण व प्रकार यामुळे देखील उष्णता बाहेर पडण्याची प्रक्रिया कमी-अधिक
होते. दुर्दैवाने एखाद्या व्यक्तीच्या त्वचेमध्ये घर्मग्रंथी विकसित झालेल्या
नसल्या
किंवा कपडे वा अन्य काही कारणाने त्यांचे कार्य पुरेशा प्रमाणात होऊ शकले नाही,
तर बाहेरील गरम वातावरणात या व्यक्तीच्या शरीरातून उष्णता बाहेर पडण्याचा हा
महत्त्वाचा मार्ग बंद राहतो आणि अशा व्यक्तीला "हीट स्ट्रोक' अर्थात उष्माघात
होण्याचा धोका असतो.
भावनिक वर्तन आणि घामाची निर्मिती
काम, क्रोध, भीती यासारख्या भावना उद्दिपीत झाल्या की व्यक्तीच्या वर्तनात बदल
आढळून येतो. त्याचबरोबर शरीरात घाम निर्मिती वाढलेली असते. हा वर्तनातील बदल घडवून
आणणारी केंद्रे मेंदूतील अधश्चेतक आणि त्याच्या जवळील चेतापेशीपुंजामध्ये आढळतात.
ही केंद्रे उत्तेजित झाली की स्वायत्त मज्जासंस्थेतील चेतातंतूंद्वारे
घर्मग्रंथींपर्यंत त्याचे संदेश पोचतात आणि घामाची निर्मिती होते.
जंतूसंसर्ग आणि तापमानवाढ
"ताप आला' म्हणजेच शरीराचे तापमान वाढले की सर्वसाधारणपणे जिवाणू किंवा विषाणूंचे
आक्रमण झाले आहे, असे समजले जाते. अंगात ताप भरण्याचे कारण म्हणजे जिवाणूंपासून
विषारी रसायनांचे रेणू निर्माण होऊन ते अधश्चेतकांतील उष्णता नियंत्रण केंद्रांत
बदल घडवून आणतात. त्यामुळे ही केंद्रे शरीराचे तापमान नेहमीपेक्षा वरच्या पातळीवर
आणून ठेवतात. याने शरीरात साठवलेली शक्ती अधिक प्रमाणात वापरली जाते. अधश्चेतक
आणि इतर केंद्रांच्या माध्यमातून शरीरातील उष्णता वाढविण्याच्या प्रयत्नांत ताप
असलेल्या व्यक्तीच्या त्वचेतील रक्तवाहिन्या निमुळत्या होतात आणि काही व्याधींमुळे
अंगात हुडहुडी देखील भरते. व्याधी झालेल्या इंद्रीयांत निर्माण होणाऱ्या
प्रॉस्टॉग्लॅंडिन्समुळे ताप हे लक्षण रुग्णाला भासू लागते. रुग्ण डॉक्टरांकडे
गेला की डॉक्टर ताप उतरविण्यासाठी उपलब्ध असलेल्या असंख्य औषधांपैकी एखादे औषध
देतो आणि त्यामुळे रुग्णाला दरदरून घाम येतो. ही औषधे प्रोस्टॅग्लॅंडिन्सच्या
निर्मितीवर नियंत्रण ठेवतात.
- डॉ. म. गो. गोगटे
शरीरक्रियातज्ज्ञ, पुणे. |
|