उपचार त्वचेच्या ऍलर्जीवर
(डॉ. अपर्णा पित्रे)
आपल्या सभोवताली असणाऱ्या अनेक घटकांमुळे त्वचेवर लालसर चट्टे उठत असतात.
त्वचेच्या अतिसंवेदनशीलतेमुळे होणाऱ्या या व्याधीवर उपचारही हळूवारपणे करावे
लागतात. ........ त्वचा ही आरोग्याचा आरसा आहे. आरोग्य जितके चांगले, त्वचेची
सतेजता तितकीच अधिक. पचनप्रक्रिया जेवढी चांगली तितकी त्वचा नितळ; पण वातावरणातील
आणि खाद्यपदार्थातील काही घटक त्वचेची संवेदनशीलता वाढवण्यास व त्वचेच्या
सौंदर्याला बाधा आणण्यास कारणीभूत ठरतात. त्वचेची ऍलर्जी किंवा पित्त उठणे
(अर्टिकॅरिआ) ही अशाच प्रकारची एक समस्या, बऱ्याच लोकांमध्ये आढळते.
अनेक प्रकारच्या गोष्टींशी- विशेषतः वासातून, खाण्यातून संपर्क आला की अंगावर
पुरळ, चट्टे उठू लागतात. मोठ्या गांधी उठून खाज येऊ लागते. यालाच वैद्यकीय भाषेत
"अर्टिकॅरिआ' आणि सर्वसामान्यतः "ऍलर्जी' किंवा "पित्त उठणे' असे म्हटले जाते.
त्वचेची ही तक्रार पेनिसिलीनसारखी औषधे, काही नॉन स्टेरॉईडल ड्रग्ज (एनएसएआयडीएस)
सागरी खाद्ये, अंडी, मांस, काही ठराविक प्रकारचे मसाले आणि भाज्या यांच्या सेवनाशी
निगडीत असते. याखेरीज वातावरणातील काही घटक, जसे फुलांचे गंध, कीटकदंश यामुळेही हा
विकार उद्भवू शकतो. लक्षणांची सुरवात छोटे पुरळ उठल्याने होते. थोड्या वेळाने हे
पुरळ मोठे होतात व त्याचे चट्टे बनतात, खाज येऊ लागते. हे चट्टे शरीराच्या
कुठल्याही भागात उठू शकतात, पण त्यांचे प्रमाण पोठावर, पाठीवर, हातापायांवर,
मानेवर जास्त आढळते. काही व्यक्तींमध्ये या प्रकारच्या ऍलर्जीबरोबरच ऍलर्जिक
सर्दी, दम लागणे यांसारख्या तक्रारीही सोबतीला असतात. त्वचेची ऍलर्जी कुठल्या
गोष्टीची यावी याला तसा काहीच नियम नाही. कुणाला गवारीची भाजी खाल्ल्यामुळे चट्टे
उठतात, तर कुणाला कोबीची भाजी खाल्ल्यामुळे त्रास होतो. अलीकडे पुळांवर निरनिराळी
विषारी औषधे कीड नाहीशी करण्यासाठी फवारली जातात. अशी फळे विशेषतः सालीसकट खाल्ली
जाणारी फळे नीट न धुता खाल्ली गेली तर त्वचेची ऍलर्जी होऊ शकते. त्वचेची ही
तक्रार त्वचेच्या अतिसंवेदनशीलतेमुळे असते. वातावरणातील घटकांशी जेव्हा संवेदनाशील
त्वचेचा संपर्क येतो तेव्हा रक्तातील हिस्टॅमिनचे प्रमाण वाढते. पुरळ, रॅश येणे,
त्वचेचे सुजणे, खाज येणे हा सर्व परिणाम हिस्टॅमिनमुळे असतो.
बऱ्याच वळा या तक्रारींसाठी अँटीऍलर्जिक (ऍन्टीहिस्टॅमिनिक) औषधांखेरीज दुसरा उपाय
काय? असा प्रश्न पडतो. या प्रश्नाला होमिओपॅथी समर्पक उत्तर देऊ शकते.होमिओपॅथीत
त्वचेच्या अतिसंवेदनाशीलतेवर परिणामकारक अशी अनेक औषधे आहेत, अशी वेळोवेळी प्रचिती
येते. उदा. एपिस मेल, कॅल्केरिआ सल्फ, क्लोरॅलम्, कोपायव्हा, हिस्टॅमिनम्, ऱ्हस
टॉन्स मैट्रम म्यूर इ. या औषधांनी त्वचेची खाज, चट्टे वगैरे कमी होतातच, पण
त्वचेची अतिसंवेदनाशीलता कमी होते. नेहमी त्रास देणारे पदार्थसुद्धा हळूहळू कमी
त्रास द्यायला लागतात.
अर्थात, ऍलर्जी ही मुळात खूपच खोलवर रुजलेली, जुनी प्रवृत्ती असल्यामुळे या
औषधांव्यतिरिक्त व्यक्तीच्या प्रकृतीसाधर्म्याशी संबंधित अशी होमिओपॅथिक औषधे
तज्ज्ञांच्या सल्ल्याने घेणे जरुरीचे ठरते.
सरतेशेवटी इतकंच म्हणता येईल, पेशंटने दाखवलेला "पेशन्स', डॉक्टरचे कौशल्य आणि
स्वतःच्या पेशावरील निष्ठा आणि होमिओपॅथिक शास्त्राची व्यापकता- वैद्यकशास्त्रातील
अनेक अवघड समस्यांची उत्तरे निश्चितच शोधून काढू शकतात.
- डॉ. अपर्णा पित्रे
होमिओपॅथी तज्ज्ञ, पुणे. |