हे राज्य काय केवळ मराठी भाषिकांचे?
भाषावार प्रांतरचनेनुसार मराठी भाषिकांचे महाराष्ट्र राज्य स्थापन व्हावे, त्यात
मुंबईचाही समावेश असावा, या मागणीसाठी संयुक्त महाराष्ट्र समितीने आंदोलन पुकारले.
पण मराठी भाषिकांचे राज्य याचा अर्थ शब्दशः हे राज्य मराठी भाषिकांचेच असणार असा
होता का? तसे असते तर या आंदोलनात ज्या बिगरमराठी लोकांनी सहभाग घेतला, एवढेच
नव्हे तर महाराष्ट्र निर्मितीसाठी ज्या बिगरमराठी लोकांनी प्राणांची कुर्बानी
दिली, त्यांच्या त्यागाचा अन्वयार्थ आपण कसा लावणार?
वास्तविक महाराष्ट्राचा हा लढा केवळ मराठी भाषिकांचा नव्हता. त्यात असंख्य
बिगरमराठी लोकही सहभागी होते. आपली "महाराष्ट्री' ही एकच ओळख घेऊन ते या आंदोलनात
उतरले होते.
संयुक्त महाराष्ट्र समितीच्या राष्ट्रीय परिषदेचे अध्यक्षपद ए. के. गोपालन या
केरळातील कम्युनिस्ट नेत्याने भूषविले होते. खासदार चोथाईराम गिडवाणी यांनी
संयुक्त महाराष्ट्र समितीच्या दक्षिण मुंबई अधिवेशनाचे उद्घाटन केले होते. "मराठी
बंधूंनो आपण जो विश्वास व्यक्त केला तो सार्थ ठरवीन आणि मुंबईसह संयुक्त
महाराष्ट्र व्हावा यासाठी शर्थीचे प्रयत्न करीन,' असे गिडवाणी यांनी त्यावेळी
आपल्या भाषणात सांगितले. या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष होते शेठ गोविंदलाल शिवलाल
मोतीलाल. ""भाषिकदृष्ट्या मुंबई राज्यात तीन स्पष्ट प्रदेश सामावलेले आहेत. यात
मराठी भाषिकांची संख्या सर्वात जास्त आहे. मुंबईचे स्वतंत्र राज्य बनविल्याने मूळ
प्रश्न सुटण्याऐवजी नवे प्रश्न निर्माण होतील. भौगोलिकदृष्ट्या तर मुंबई शहर हा
महाराष्ट्राचाच भाग आहे. न तुटणाऱ्या प्राणरज्जूंनी तो जखडला गेला आहे,'' अशा परखड
शब्दांत शेठ गोविंदलाल यांनी मुंबई महाराष्ट्रापासून फोडण्यास विरोध दर्शविला
होता. हे शेठ गोविंदलाल हे गुजराती भाषक होते! त्या काळात सर्वात मोठे उद्योगपती
जे. आर. डी. टाटा यांच्याशी घनिष्ट संबंध असणारे जॉन मथाई (मूळचे केरळचे) यांनीही
स्वतंत्र मुंबई राज्याला विरोध दर्शविला होता. टाटांच्या वतीने त्यांनी मुंबईसह
संयुक्त महाराष्ट्राला पाठिंबाच व्यक्त केला. बिर्ला उद्योग समूहातर्फे पाठिंबा
असल्याचे सांगण्यात आले होते, हे सर्व मोठे लक्षणीय आहे.
दुसरीकडे मुख्यमंत्री मोरारजी देसाई, शांतीलाल शहा हेमंगी, काही मूठभर गुजराती
व्यापारी व उद्योगपती यांचा मात्र संयुक्त महाराष्ट्रास प्रखर विरोध होता. संयुक्त
महाराष्ट्र आंदोलनाला कॉंग्रेस मंत्रिमंडळात असलेले नरवणे यांनी पाठिंबा देताच
मोरारजींनी त्यांचा राजीनामा मागितला होता. नरवणे यांनी मंत्रीपद सोडून आंदोलनात
उडी घेतली. मुंबई महापालिकेत त्यावेळी स. का. पाटील यांचे वर्चस्व होते. त्यांनी
तर पाच हजार वर्षात मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही, असे वक्तव्य केले होते!
भाषावार प्रांत रचनेचा पुरस्कार करणारा ठराव १९२० मध्ये कॉंग्रेसने संमत केला
होता. परंतु संयुक्त महाराष्ट्र आंदोलन सुरू झाले त्यावेळी कॉंग्रेस नेतृत्वाने
विरोधाची भूमिका घेतली. मुख्यमंत्री मोरारजींनी तर सूड घ्यावा तसे वर्तन केले.
आंदोलन चिरडण्याचे प्रयत्न
१० ऑक्टोबर १९५५ रोजी राज्य पुनर्रचना समितीचा (फाझल अली) अहवाल बाहेर पडला. तीन
कोटी मराठी भाषिकांची आकांक्षा आणि न्याय्य मागणी फाझल अली कमिशनने पायदळी
तुडविली. हा अहवाल बाहेर पडण्यापूर्वीच टाइम्स ऑफ इंडियात काही भाग उद्धृत केले
होते. मोरारजी सरकारने दहशत आणि दडपशाही वाढेल अशी भीती पसरविण्याचा प्रयत्न केला.
सरकारच्यावतीने एक पत्र व्यापारी-उद्योपतींकडे पाठविण्यात आले होते. "दंग्या
विरोधातील विमा उतरवला आहे किंवा नाही' अशी विचारणा या पत्राद्वारे करण्यात आली
होती. त्यामुळे गुजराथी जनतेत व व्यापारी वर्गात घबराट निर्माण झाली. पण शांततामय
मार्गानेच लढा केला जाईल असे समितीने स्पष्ट केले होते. तरीही १० ऑक्टोबरपासून
मिरवणूक बंदी लागू करण्यात आली. समितीने द्विभाषिक राज्य योजना फेटाळली.
कॉंग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने त्रिराज्य मुंबईचे स्वतंत्र व महाराष्ट्र
आणि विदर्भाचे स्वतंत्र या योजनेचे स्वागत केले होते. १८ नोव्हेंबर रोजी विधानसभेत
त्रिराज्य योजनेवर चर्चा होणार होती. त्यादिवशी विधानसभेवर मोर्चा नेण्याचे
संयुक्त महाराष्ट्र समितीने ठरविले. निर्बंध तोडून शांततेने मोर्चे निघाले. मोर्चा
निघू नये यासाठी सरकारने धोंबी तलावच्या दक्षिणेकडील भागात मिरवणूक व जमावबंदी
लागू केली. हजारो पोलिस, होमगार्ड तैनात करण्यात आले होते. गुप्त पोलिसांचा
सुळसुळाट झाला होता. दुपारी १ वाजता चर्चगेट स्थानकातून सेनापती बापट, आचार्य
अत्रे कम्युनिस्ट पक्षाचे सेक्रेटरी व नंतर मुंबईचे महापौर झालेले सावळराम मिरजकर
यांच्या नेतृत्वाखाली एक जथ्था रस्त्यावर आला. मोर्चा शांततेत सुरू असतानाच
नेत्यांना पकडण्यात आले. २०० जणांना ताब्यात घेण्यात आले. अश्रुधूर, लाठीमाराच्या
फैरी पोलिस झाडीत होते. चार तास निदर्शने सुरू होती. १८ च्या या दडपशाहीचा निषेध
करण्
यासाठी एक दिवसाचा संप पुकारण्याचे नरे पार्कवर झालेल्या ९० ट्रेड युनियनच्या सभेत
संपाची हाक देण्यात आली. बॅंक, विमा कर्मचारी, गिरणी कामगार, इंजिनिअरिंगपासून
सर्व धंद्यातील मराठी-बिगर मराठी कामगार संपात उतरला.
पोलिसांनी दडपशाही केली तरी कामगार दबला नाही. शेवटी मोरारजींनी डाव्या पक्षाच्या
नेत्यांना बोलावून सभेची परवानगी देत असल्याचे जाहीर केले. २० नोव्हेंबरपासून
हरताळ पाळम्यात आला. २१ नोव्हेंबर ५५ रोजी मिरवणुकीवर गोळीबार केला गेला. १५
जणांचे बळी गेले. १५ ते २० जानेवारी १९५६ दरम्यान मुंबईत आणि महाराष्ट्रात
पोलिसांनी अनेकांचे बळी घेतले. १०५ जणांनी हौतात्म्य पत्करले.
कोण होते हे हुतात्मे?
नरेंद्र प्रधान हा चाकरमाना १८ जानेवारी रोजी आपल्या पाहुण्यांना पोचवून घरी परतत
असताना घराच्या जवळच त्याच्यावर गोळी झाडण्यात आली. तो बळी पडला.
बालण्णा उतण्णा हा कामगार संपावर होता. पण घराजवळ (एका बिल्डिंग) उभा होता.
पोलिसांच्या गोळीने त्याच्या मेंदूचा चेंदामेंदा केला.
लालबागच्या सुपारी बाग रोड, तेजूकाया, हाजी कासम या इमारतींच्या परिसरात १८
जानेवारी १९५६ रोजी रात्री दहा वाजेपर्यंत पोलिस गोळीबाराच्या फैरी झाडत होते.
बाहेर सर्वत्र शांतता होती. फक्त इमारतींच्या आवारातून "मुंबईसह संयुक्त
महाराष्ट्र झालाच पाहिजे' या घोषणा निनादत होत्या.
यशवंत आबाजी वीरमहल या इमारतीत राहात होता. या इमारतीतून घोषणा दिल्या जात होत्या.
रात्री ११ वाजता यशवंत घराच्या गच्चीवर नळ बंद करण्यासाठी गेला होता. समोरच्या
इमारतीतून पोलिसांनी यशवंत आबाजीच्या दिशेने गोळी झाडली. धावत पोलिस आले त्यांनी
प्रेत ताब्यात घेतले. त्याच गल्लीत राहणारा विष्णू साने घराच्या समोरच्या मोकळ्या
जागेत उभा होता. गोळीने त्याचा बळी घेतला.
गोविंद जोगल परळच्या नाक्यावर चालत होता. गोळीबाराचा वर्षाव चालू होता. गोविंद
मरण पावला. नायगाव, केसरबागेत पोलिसांनी गोळ्यांचा वर्षाव केला. चार जण हुतात्मा
झाले.
बाबू दाते (२०) दादर पेट्रोल पंपाजवळ मारला गेला. अनूप महाबीर शिवडीच्या नाक्यावर
पोलिसांचा बळी ठरला. अनेक गल्ल्यांतून पोलिस बेछूट गोळीबार करीत होते. अश्रुधुराची
नळकांडी फोडली जात होती. अश्रुधुरामुळे श्रीमती मसुरकर या महिलेच्या दीड वर्षाच्या
मुलाचा श्वास रोखला जात होता. श्रीमती इटकर या महिलेचे एक महिन्याचे मूल बेशुद्ध
पडले, सुंदराबाई देवलोके या बाईसुद्धा बेशुद्ध पडल्या. तरीही या महिला धैर्याने
आपल्या लहानग्यांना खांद्यावर घेऊन संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा देत होत्या.
महिलांच्या आव्हानाने चिडलेल्या पोलिसांनी कृष्णनगरच्या मोकळ्या जागेत भाऊ कदमचा
बळी घेतला.
याच सुमारास संयुक्त महाराष्ट्र समितीचे नेते कॉंम्रेड श्रीपाद डांगे यांना अटक
केली. १९ जानेवारी रोजी पोलिस, होमगार्ड, एसआरपींनी गोळीबार, लाठीमार अश्रुधुराचा
बेछूट वापर केला.
भवानी शंकर रोड, गोखले रोड येथे काही लोक जमा झाले होते. पोलिसांनी त्यांच्यावर
गोळ्या झाडल्या. ९ वर्षांचा सुभाष बोरकर हा गोळीबारात मेला. चिंचपोकळी पुलावर गणपत
तानकर, तावरापाड्यात परशुराम देसाई, घनःश्याम कोतार (२०) हे पोलिसांचे बळी ठरले.
शिवाजीनगर ते लोअर परळ भागात गोळ्यांचा वर्षाव सुरू होता. वरळीत धोंडू सुतार आणि
मोठ्या रस्त्यावर १५ जण मारले गेले. त्यात ९ ते १८ वर्षे वयाचे विद्यार्थी होते.
गोरखनाथ जगताप (१४) आपल्या आईला जेवणाचा डबा देऊन परतत असताना मारला गेला. मारुती
म्हस्के (१८) हाही मारला गेला. नायगावमध्ये १७ रोजीच पोलिसांनी अनेक घरात घुसून
घरातील लहान मुलांना बेदम मारहाण केली. पोलिस मुख्यालयाजवळ व्यापाऱ्याचे दुकान
पोलिसांनी लुटले. लोकांनी आरडाओरडा करताच गोळीबार करण्यात आला. रस्त्यावर रक्तांचा
सडा पडला होता.
पोलिसांच्या रिपोर्टप्रमाणे गोळीबारात ७६ मृत, ७२ जखमी, अश्रुधुराचे २ बळी,
भोसकाभोसकीत दोन मृत. जखमी ३२० पोलिस.
मुंबईतील या ७६ हुतात्म्यांशिवाय बेळगावमध्ये चार, कोल्हापूर दोन, नाशिक दोन आणि
निपाणीमध्ये १ याप्रमाणे हुतात्मे झाले. अर्थात अनेकांची नावे पोलिसांच्या यादीत
नव्हती. लहान मुलांना ठार करण्याचे कृत्य पोलिसांनी या आंदोलनाच्या वेळी केले.
दहशत व दडपशाहीचा कहर झाला होता. ९ वर्षांचा सुभाष बोरकर, १० वर्षाचा विजय बेडेकर,
१४ वर्षाचा गोरखनाथ, १६ वर्षाचा एडवीन.
संयुक्त महाराष्ट्राचा लढा हा मराठी भाषकांचा आहे त्यातून अन्य भाषकांवर अत्याचार
केले जात आहेत असा अपप्रचार सरकारकडून कॉंग्रेस नेत्याकडून केला जात होता. पण
"मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे' यासाठी लढणाऱ्या या लढ्याला पाठिंबा
देणाऱ्यात आणि हुतात्म्यात बिगर मराठी होते.
२१ नोव्हेंबर १९५५ च्या लढ्यात जे हुतात्मे झाले त्यात जोसेफ डेव्हीड, के. जे.
झेव्हियर, पी. एस. जॉन, वेदीसिंग, रामचंद्र भाटिया, चिमणलाल सेठ या बिगर मराठी
भाषकांचा समावेश होता. १५ जण या दिवशी हुतात्मे झाले. यात सीताराम पवार, भास्कर
नारायण, रामचंद्र सेवाराम, शंकर खोटे, मिनाक्षी मोरेश्वर, धर्माजी नागवेकर,
चंद्रकांत लक्ष्मण, शरद वाणी, गंगाराम गुणाजी या मराठी भाषकांनी हौतात्म्य
पत्करले. या हुतात्म्यात एक ज्यूही होता.
१५ ते २० जानेवारीदरम्यान पोलिसांचे बळी ठरले ९८ जण. हे मुंबईतले हुतात्मे
बेळगावमधील चार हुतात्मे झाले, तर नाशिकमध्ये दोन यात मराठी भाषकांबरोबरच गुजराती,
उर्दू, हिंदी, तेलुगू, मल्याळम भाषकही होते. ख्रिस्ती, मुस्लिमांचाही समावेश होता.
महमद अली, सय्यद कासम, मनुशी वझीर अळी हे तीन उर्दू भाषक मुस्लिम धर्मीय हुतात्मे
झाले. दौलत राम मधुरदास पुलवरी, मगरू, रत्नू गोविंदरे, चुलाराम मुंबराज, सुखलाल
रामलाल, शामलाल जेठानंद, हृदयसिंग दारजेसिंग या अन्य भाषकांनी हौतात्म पत्करले.
रुपैय्या, देवेंद्र, बालण्णा, कामाठी हे तेलुगू भाषक हुतात्मे ठरले.
संयुक्त महाराष्ट्रासाठी ज्यांनी हौतात्म्य पत्करले त्याची ही नावे सर्वांच्याच
डोळ्यांत अंजन घालणारी ठरावीत.
- प्रकाश देशमुख |