आहारकल्पना
 | | (डॉ. श्री बालाजी तांबे)
अन्नद्रव्यांपासून तयार केलेले काही पदार्थ अनुपान म्हणून, औषधाला पूरक म्हणून
अथवा उपचारांचा एक भाग म्हणूनही वापरले जातात. यालाच औषधशास्त्रामध्ये
"आहारकल्पना' असे म्हटले आहे. ....... औषधशास्त्राचा विकास होण्यामागची कारणे
आपण मागच्या वेळेला पाहिली. आता आपण औषधशास्त्रातील काही कल्पनांची कृती पाहणार
आहोत.
आयुर्वेदाच्या औषधशास्त्रामध्ये काही आहारकल्पनांचाही समावेश केलेला आहे, कारण या
आहारकल्पना औषधाला पूरक असतात, उपचारांचाच एक भाग असतात. उष्णोदक, मण्ड, पेया,
विलेपी, यवागू, भात, खिचडी, यूष या कल्पना आहार द्रव्यांपासून बनविल्या जात असल्या
तरी त्या शास्त्रात सांगितल्याप्रमाणे बनविल्या तर औषधाप्रमाणे काम करू शकतात.
"उष्णोदक' या शब्दाचा शब्दशः अर्थ गरम पाणी होतो. आयुर्वेदामध्ये अनेक ठिकाणी गरम
पाण्याचे महत्त्व सांगितले आहे. गरम पाणी हे एक श्रेष्ठ अनुपानही सांगितलेले आहे.
विशेषतः वात-कफदोषांचे असंतुलन झाले असता, हिवाळ्यात-पावसाळ्यात गरम पाणी पिणे
उत्तम असते. आयुर्वेदाला संमत असणारे गरम पाणी म्हणजे नेमके काय हे खालील
सूत्रावरून समजते,
अष्टमेनांशशेषेण चतुर्थेनार्धकेन वा ।
अथवा क्वथनेनैव सिद्धमुष्णोदकं वदेत् ।।
... शारंगधर संहिता
स्वच्छ भांड्यामध्ये स्वच्छ पाणी घ्यावे व ते अर्धे, एक चतुर्थांश वा एक अष्टमांश
उरेपर्यंत अग्नीच्या साहाय्याने उकळावे, गाळून घ्यावे व सोसवेल एवढे गरम असताना
पिण्यासाठी वापरावे.
अशा प्रकारे नुसते गरम केलेले नाही तर बराच वेळ उकळून आटवलेले पाणी म्हणजे उष्णोदक
होय. असे उष्णोदक पिण्याचे फायदे आचार्य याप्रमाणे सांगतात,
श्लेष्मामवातमेदोघ्नं बस्तिशोधनदीपनम् ।
कासश्वासज्वरहरं पीतमुष्णोदकं निशि ।।
... शारंगधर संहिता
असे उष्णोदक कफदोषाचे शमन करण्यास उत्तम असते. अनावश्यक मेद कमी करते, लघवी साफ
होण्यास मदत करते, अग्नी प्रदीप्त करते, पचनास साहाय्य करते व आमवात, खोकला, दमा,
ताप, जुलाब वगैरे रोगांवर औषधाप्रमाणे उपयुक्त असते.
ग्रंथात सांगितल्याप्रमाणे उष्णोदक बनवणे सर्वोत्तम होय यात काही शंका नाही, परंतु
रोज इतका वेळ पाणी उकळणे शक्य नसले तरी १५-२० मिनिटे पाणी उकळण्याचाही खूप चांगला
उपयोग होऊ शकतो. वात-कफप्रवृत्तीच्या व्यक्तींना, अग्नी मंद असणाऱ्या व्यक्तींना
गरम पाणी पिणे खूप फायद्याचे असते. पावसाळ्यात, हिवाळ्यातही गरम पाणी पिणे चांगले
असते. पित्तप्रकृतीच्या व्यक्तींनी, पित्ताचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी तसेच
उन्हाळ्याच्या दिवसात गरम पाणी प्याले नाही तरी याप्रकारे पाणी उकळून घेऊन, निवले
की किंवा माठाच्या साहाय्याने थंड करून प्यायला वापरणे उत्तम होय.
पाणी उकळताना शेवटी शेवटी वाळा, अनंत यासारख्या सुगंधी, शीतल, विषनाशक
द्रव्यांपासून बनविलेले "जलसंतुलन' टाकले, पाणी उकळताना त्यात शुद्ध सोन्याची
अंगठी वा सोन्याचा पत्रा टाकला तर त्यामुळे उष्णोदकाचे वर उल्लेखिलेले फायदे अजूनच
वृद्धिंगत होतात. सुवर्णसंस्काराने मेंदू, हृदय वगैरे महत्त्वाच्या अवयवांची ताकद
वाढते, एकंदर जीवनशक्ती व प्रतिकारशक्तीही वाढते.
मण्ड, पेया, विलेपी व यवागू या चारही कल्पना बहुतेक वेळा तांदळापासून, क्वचित जव,
लाह्या यांच्यापासून बनविल्या जातात. वेगवेगळ्या ग्रंथात या कल्पनांचे अर्थ व
बनविण्याची पद्धत यात थोडा फार बदल झालेला आहे. याठिकाणी आपण त्यातल्या त्यात
सर्वांना मान्य असणारा अर्थ व पद्धत पाहणार आहोत.
मण्ड म्हणजे पेज.
नीरे चतुर्दशगुणे सिद्धो मण्डस्त्वसिक्थकः ।
शुण्ठीसैन्धवसंयुक्तः पाचनो दीपनः स्मृतः ।।
... शारंगधर संहिता
तांदळाच्या चौदापट पाणी घ्यावे व मंदाग्नीवर शिजविण्यास ठेवावे. तांदूळ व्यवस्थित
शिजले की गाळून घ्यावे व मिळालेल्या पेजेत चवीनुसार सैंधव मीठ व सुंठ चूर्ण
मिसळावे.
याप्रकारे बनविलेल्या मंडाचे गुणधर्म खालीलप्रमाणे होत,
मण्डस्तु दीपयत्यग्निं वातं चाप्यनुलोमयेत् ।
मृदु करोति स्रोतांसि स्वेदं सञ्जनयत्यपि ।।
लंघितानां विरिक्तानां जीर्णे स्नेहे च तृष्यताम् ।
दीपनत्वाल्लघुत्वाच्च मण्डः स्यात् प्राणधारणः ।।
... चरक सूत्रस्थान
मण्ड अग्नीला दीप्त करतो, वाताचे अनुलोमन करतो, सर्व शरीरस्रोतांना मृदुता देतो,
लंघन करण्यासाठी, विरेचन झाल्यावर व स्नेहपानानंतर मण्ड घेणे अतिशय तृप्तिकारक
असते. मण्ड पचायला हलका व अग्नीदीपक करणारा असल्याने प्राण धारण करतो.
तांदळाप्रमाणे जवाचाही मण्ड करतात, याला वाट्यमण्ड म्हणतात. वरचे टरफल काढलेले जव
जरासे भरडून घ्यावेत व कढईमध्ये थोडे शेकावेत. भांड्यामध्ये जव व जवाच्या चौदा पट
पाणी घेऊन मंदाग्नीवर शिजवावे. जव पूर्णपणे शिजले की गाळून घ्यावे व मिळालेल्या
पेजेत चवीनुसार साखर, सैंधव मीठ, मिऱ्याची पूड, सुंठीचे चूर्ण, पिंपळीचे चूर्ण
टाकावे व सेवन करावे. हा वाट्यमण्ड पचायला हलका असतोच, विशेषतः कफ व पित्तनाशक
असतो, चवीला रुचकर असतो, कंठासाठी हितकर असतो व रक्तपित्तनाशक असतो.
- डॉ. श्री बालाजी तांबे |
|