जपा त्वचेच्या जंतुसंसर्गापासून
 | | (डॉ. अमित महाजन)
त्वचेवर अब्जावधी सूक्ष्मजीव सुखेनैव राहात असतात. शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी
झाली की त्यांचा उपद्रव वाढू लागतो. त्वचेचा असा जंतुसंसर्ग टाळण्यासाठी तिची
नित्य निगा राखणे हाच उत्तम प्रतिबंधक उपाय आहे. ........ त्वचा हा मानवी
शरीराचा सर्वांत मोठा अवयव आहे आणि तितकाच नाजूकसुद्धा. साधारणपणे निसर्गाने
त्वचेची जी रचना केली आहे, त्यात वातावरणीय घटकांपासून बचाव करणारी यंत्रणा आहे.
पण, जेव्हा वातावरणातील उष्णता, दाहकता, प्रदूषण वाढते त्यावेळेस त्वचेची विशेष
काळजी घेण्याची गरज असते. त्वचा प्रामुख्याने तीन स्तरांवर आपल्या शरीराचे संरक्षण
करीत असते. तापमान नियंत्रित करणे, आर्द्रता राखणे आणि आवश्यक क्षारांचे संतुलन
राखणे ही तिची तीन महत्त्वाची कार्ये म्हणता येतील. त्याचप्रमाणे धूळ, पाणी,
सूक्ष्म जीव-जंतू यांसारख्या बाह्य घटकांपासून शरीरातील अवयवांचे रक्षण करण्याचेही
मुख्य कार्य त्वचा करीत असते.
शरीराच्या इतर भागाला जसे विकार होतात, तसेच ते त्वचेलाही होतात. उन्हाळ्यात
येणारा घाम, त्यातच त्वचेवर वेगवेगळ्या ठिकाणी साठणारा मळ यामुळे त्वचाविकारांचे
प्रमाण वाढल्याचे आपल्याला दिसते. त्वचेवर अनेक सूक्ष्म जंतू वास करीत असतात.
त्यामुळे योग्य निगा राखली न गेल्यास या जंतूंची वाढ होण्यास सुरुवात होते आणि
त्वचेचे जंतुसंसर्ग निर्माण होतात. त्वचेच्या जंतुसंसर्गांची सर्वसाधारणपणे चार
प्रकारे वर्गवारी केली जाते. १) जीवाणूंमुळे (बॅक्टेरियल) निर्माण होणारे विकार,
२) बुरशी किंवा तत्सम जीवांमुळे (फंगल) निर्माण होणारे विकार, ३) विषाणूंमुळे
(व्हायरल) निर्माण होणारे विकार आणि ४) परोपजीव जंतूंमुळे (पॅरासायटिक) निर्माण
होणारे त्वचाविकार.
आपल्या त्वचेवर नेहमीच अब्जावधी सूक्ष्मजीव अगदी आरामात राहात असतात. मात्र, या
जीवांमुळे नेहमीच त्वचेचे विकार उद्भवतात असे नव्हे. कारण, सामान्यत- त्वचेची
नैसर्गिक प्रतिकारशक्ती म्हणजेच नियमित काळाने बदलणारा त्वचेचा स्तर, पीएच,
स्निग्धांश, वेळोवेळी त्वचेतून पाझरणारी काही द्रव्ये या सूक्ष्मजीवांपासून
शरीराचे संरक्षण करीत असतात.
जीवाणूजन्य त्वचाविकार
जीवाणूंमुळे निर्माण होणारे त्वचेचे विकार वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात. काही
वेळा ते अगदी साधे, एखाद्या पुळी किंवा मुरमासारखे त्वचेच्या छोट्या बागावर
मर्यादित असतात. तर काही वेळा काही तासांत मोठ्या भागावर त्यांच्या फैलाव होऊ
शकतो. असा फैलावलेला त्वचाविकार काही वेळा जिवावरही बेतू शकतो.
त्वचेला अनेक प्रकारच्या जीवाणूंचा संसर्ग होऊ शकतो. मात्र त्यात स्टेफॅलोकॉकस आणि
स्ट्रेप्टोकॉकस या दोन प्रकारच्या जीवाणूंमुळे निर्माण होणारे विकार आपल्याकडे
मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. या जीवाणूंव्यतिरिक्त अन्य जीवाणूंमुळे निर्माण
होणारे त्वचाविकार रुग्णालये अथवा नर्सिंग होम्स, बागकाम, नैसर्गिक जलस्त्रोतांत
पोहणे अशासारख्या कारणांमुळे झालेले असतात.
मधुमेही व्यक्तींमध्ये त्वचेचा, विशेषत- हाता-पायांच्या, रक्तपुरवठा खूपच कमी
झालेला असतो. तसेच एचआयव्ही बाधित व्यक्तींमध्ये शरीराची एकूणच प्रतिकारशक्ती कमी
झालेली असते. अशा व्यक्तींमध्ये जीवाणूजन्य त्वचाविकार निर्माण होण्याची शक्यता
इतरांपेक्षा जास्त असते. तसेच त्वचा उन्हाने किंवा खाजवल्याने हुळहुळी झालेली
असेल, तीवर भेगा पडलेल्या असतील अशावेळीही जीवाणूजन्य त्वचाविकार होण्याची शक्यता
अधिक असते.
काही सर्वसामान्य जीवाणूजन्य त्वचाविकार पुढीलप्रमाणे आहेत.
१) फोड किंवा इंपेटिगो - स्ट्रेप्टोकॉकस किंवा स्टेपॅलोकॉकस जीवाणूंमुळे निर्माण
होणाऱ्या या विकारात पुवाने भरलेले छोटे फोड हे मुख्य लक्षण असते. याचेही दोन
प्रकार असतात. अ) नॉबुलस हा प्रकार लहान मुलांमध्ये साधारण सहा ते दहा या वयोगटात
आढळतो. यात त्वचेवर लालसर चट्टा आणि छोटे फोड येतात. ब) बुलस हा त्वचाविकार
साधारणत- तान्ह्या बाळांमध्ये दिसतो. यात फोड तुलनेने मोठे असतात. पण लालसरपणा कमी
असतो. दोन ते पाच वयोगटातील मुलांमध्ये आंब्याचा चीक उतण्याने होणारा इंपेटिगो
अतिशय "कॉमन' आहे.
२) इक्थायमा - हा इंपेटिगोचाच थोडा वेगळा, पुढचा प्रकार. यात त्वचेच्या अधिक
खालच्या स्तरावर जीवाणूंचा संसर्ग होतो. आहारातील प्रथिने, जीवनसत्वे यांची कमतरता
याला हातभार लावणारी ठरते. वसतिगृहात राहणाऱ्या लहान मुलांमधे हा त्वचाविकार
दिसतो. हात आणि पायावर मोठ्या खपल्यांसारखे याचे स्वरूप असते. जखम भरल्यावरसुद्धा
याचे व्रण राहू शकतात.
३) केसतूड किंवा फॉलिक्युलायटिस - त्वचेवर असलेल्या केसांच्या मुळाशी हा आजार
होतो. याचा संसर्ग किती खोलवर आहे यानुसार याचे "सुपरफिशिअल' आणि "डीप' असे दोन
प्रकार पडतात. अनेकदा राठ केस वळून पुन्हा आत गेल्याने त्वचादाह वाढतो. जुना
त्वचारोग असलेल्या व्यक्ती किंवा ऑईल, पेट्रोलिअम पदार्थांशी त्वचेचा संपर्क सतत
येणाऱ्यांमध्ये याचा धोका जास्त असतो. वेळीच उपचार केले नाहीत तर हाच आजार पुढे
"क्रॉनिक फॉलिक्युलायटिस'चे स्वरूप धारण करू शकतो. त्यामुळे यावर वेळीच उपचार
करणे आवश्यक असते.
४) गळू किंवा बॉइल्स अथवा फरंकल - पुळीसारख्या छोट्या सुजेने या आजाराची सुरवात
होते. साधारणत- पौगंडावस्थेत असणाऱ्या मुलांमध्ये किंवा मोठ्या माणसांमध्येही हा
झाल्याचे आढळते. त्वचेच्या एपिडर्मिस किंवा डर्मिस या नावाने ओळखल्या जाणाऱ्या
स्तरांमध्ये किंवा त्याखालच्या स्तरांमध्ये सुद्धा हा आजार होऊ शकतो. जेथे गळू
झालेले असते तेथे ठणकते. गळू अनेकदा पुवाने भरलेले असते. काहीवेळा त्यातून
रक्तमिश्रित पू बाहेरही येतो. काहीवेळा गळू वारंवार होत असल्याचे दिसून येते.
अनेकदा अस्वच्छ जागी दाटीवाटीने राहणाऱ्या पौगंडावस्थेतील मुलांमध्ये हा
त्वचाविकार वारंवार होताना दिसून येतो.
५) कारबंकल - एकाच जागी अनेक लहान पुळ्या असल्या आणि त्यामुळे त्वचेवर मोठा चट्टा
निर्माण झालेला असेल तेव्हा त्याला कारबंकल असे म्हणतात. या विकारात मोठी जखम होते
. ती कोळशासारखी दिसते. ही जखम दुखते देखील. फरंकलकडे वेळीच लक्ष द्यावे, अन्यथा
त्याने रौद्ररूप धारण केले तर ताप येण्यासारखी लक्षणेही आढळून येतात.
स्टेपॅलो कॉकस आणि स्ट्रेप्टोकॉकस जीवाणूंमुळे होणाऱ्या त्वचाविकारांशीवाय अन्य
काही प्रकारच्या जीवाणूंमुळेही त्वचाविकार होतात. त्यांत हायड्राअडेनायटीस
सपरीटीवा, बॅक्टेरॉईडस यांचा समावेश असतो. घाम आणि हे जीवाणू यांच्या संयोगाने
त्वचाविकार होतात. अनेकदा काखेत, स्त्रियांमध्ये, लहान मुलांना, मुलांच्या
पायाखाली तळव्यांना किंवा मेद जास्त असलेल्या शरीराच्या भागात हे दिसून येतात. असे
त्वचाविकार दूर ठेवण्यासाठी घट्ट कपडे घालू नयेत. त्वचेच्या विकारासाची काही
लक्षणे दिसली की डॉक्टरांचा सल्ला त्वरीत घ्यावा, जेणेकरून या आजाराचे गंभीर
स्वरूप टाळता येते.
जीवाणूंमुळे होणाऱ्या त्वचाविकारांमध्येच व्याप्ती आणि गांभीर्य मोठे असणारेही
काही विकार आहेत. या विकारांत रुग्णालयात दाखल होण्याचीही आवश्यकता भासू शकते.
इरिसिपेलास, लिंफॅंजायटिस, सेल्यालायटिस या नावांनी हे विकार ओळखले जातात.
१) इरिसीपेलास - सर्वसाधारणपणे स्ट्रेप्टोकॉकस जीवाणूंमुळेच हा आजार होतो. यात पाय
आणि चेहरा यांच्यावरच अधिक परिणाम झाल्याचे दिसते. यात गडद लालसर किंवा किंचित
"मरून' रंगासारखा उठून दिसणारा मोठा चट्टा त्वचेवर उमटतो. त्याठिकाणी दुखरेपणा
जाणवतो. तापही येतो. यावर शीरेतून औषध द्यावे लागते.
२) लिंफॅंजायटिस - त्वचेतील लसिका वाहिन्या (लिंफॅटिक व्हेसल्स) सबक्युटेनस
प्रकारच्या उतींमध्ये असतात. त्या प्रथिने आणि अभिसरणासाठी आवश्यक असतात. त्यांना
सुज आली (अक्यूट लिंफॅंजायटीस) तर त्यात प्रतिजैविकेही घ्यावी लागतात.
३) सेल्युलायटिस - अधस्त्वचेच्या उतींमध्ये (सबक्युटेनस टिश्यूज) या प्रकारचा
संसर्ग होताना दिसते. साधारणत- पायांवर हा होतो. जुना त्वचाविकार जसे
सोरायसीसमध्ये संसर्गित होऊन काही लक्षणे यात दिसतात जसे पाय भरपूर सुजणे, ताप
येणे इत्यादी. यात रुग्णाला दवाखान्यात दाखल करण्याचा सल्ला दिला जाऊ जातो.
शिरेतून प्रतिजैविके घेण्याची उपाययोजनाही डॉक्टर सुचवितात.
याशिवाय इंटरट्रिगो आणि पॅरोनायकिया हे आणखी काही सर्वसामान्य त्वचाविकार आहेत.
इंटरट्रिगो म्हणजे हाता-पायाच्या बोटांच्या बेचक्यांत होणारा संसर्ग. यात जीवाणू
किंवा बुरशी अशा दोन्ही प्रकारचा संसर्ग होऊ शकतो. साचणारा घाम, बूट आणि सॉक्सचा
अतिवापर आदींमुळे हा होतो. हात-पाय वारंवार धूवून स्वच्छ ठेवणे प्रतिबंधासाठी
आश्यक असते. पॅरोनायकियामध्ये हात आणि पायांच्या नखांमध्ये संसर्ग होतो. अंगावर
लावण्याची मलमे आणि पोटात घ्याची औषधे यावर सुचविली जातात.
बुरशीजन्य त्वचाविकार
ज्यांच्यामुळे त्वचाविकार निर्माण होतात, असे बुरशीचे प्रकार त्वचेच्या सर्वांत
वरच्या मृत थरामध्येच वाढतात. ते त्वचेत खोलवर शिरत नाहीत. काहीवेळा बुरशीजन्य
विकार किंवा "फंगल इन्फेक्शन'मुळे कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसून येत नाहीत.
क्वचित प्रसंगी त्वचा लालसर होणे, किंचित खाज सुटणे एवढ्यापुरतीच लक्षणे मर्यादित
राहतात. तर या प्रकारातील अन्य काही त्वचाविकारांत सतत खाज सुटणे, सूज येणे,
खपल्या सुटणे अशीही लक्षणे दिसून येतात.
शरीराच्या सांध्यांच्या भागात जिथे दमटपणा अधिक अतो, अशा जवळजवळ सर्वच ठिकाणी
बुरशी घर करते. त्यामुळे हाता-पायांच्या बोटांची बेचकी, जांघा, स्तनांच्या खालील
भाग ही बुरशीजन्य विकारांची नेहमीची स्थाने आहेत. लठ्ठ व्यक्तींच्या त्वचेवर अधिक
वळ्या पडत असल्याने त्यांच्यात बुरशीजन्य विकारांची शक्यता अधिक असते. काहीवेळा
बुरशीचा संसर्ग एका भागात आणि त्वचेवर लक्षणे दुसरीकडेच असा प्रकारही दिसून येतो.
हा प्रकार ऍलर्जीमुळे घडून येतो. टिनिया आणि कॅंडीडा या प्रकारच्या बुरशीचा संसर्ग
आपल्याकडे सर्रासपणे आढळून येतो. इसब, नायटा, गजकर्ण अशा नावांनी हे त्वचाविकार
आपल्याकडे ओळखले जातात. दमट हवामान, तंग कपड्यांचा वापर, शारिरीक स्वच्छतेची
पुरेशी काळजी न घेणे किंवा तिच्याकडे होणारे दुर्लक्ष यामुळे हे त्वचाविकार
उद्भवतात. उन्हाळ्यात शरीराला येणाऱ्या घामामुळे असा बुरशीजन्य विकारांचे प्रमाण
अधिक असते. शरीराच्या कोणत्या भागावर त्वचाविकार दिसून येतात, यावर कोणत्या
प्रकारच्या बुरशीमुळे हा संसर्ग झालेला आहे, हे निश्चित केले जूा शकते. उदा.
टिनीया क्रुरिसच्या संसर्गामुळे जांघेत लालसर चट्टा येतो तर, टिनिया कॉर्पोरिसमुळे
अंगावर इतरत्र काखेत, पोटावर, छातीवर चट्टे दिसतात. टिनिया बार्बरे या बुरशीचा
संसर्ग प्रामुख्याने अस्वच्छतेमुळे होतो. बाहेर दाढी करणाऱ्यांमध्ये याचा आढळ अधिक
असतो. तर, टिनिया कॅपायटिसचा संसर्ग मुलांच्या आहारातील कमतता, अस्च्छता यामुळे
झालेला दिसून येतो. यात डोके खाजण्यापासन, फोड आणि पू येईपर्यंत वेगवेगळी लक्षणे
आढळतात.
कॅंडिडा ही बुरशी ओलसर आणि कोमल त्वचेवर वाढताना दिसते. तोंडाचा किंवा योनीचा
अंतर्भाग यांवर ती दिसून येते. अशा नाजुक ठिकाणी असल्याने काहीवेळा हा संसर्ग
त्वचेच्या खालील थरांत आणि क्वचित प्रसंगी रक्तवाहिन्यांपर्यंत पोचतो. अशावेळी
त्याने जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. सर्वसाधारणपणे कोणत्याही प्रकारचा त्रास न
होता ही बुरशी शरीराच्या या भागांत असते. मात्र, शरीराची प्रतिकारशक्ती कमी
झाल्यावर तिची वाढ होते.
विषाणूजन्य त्वचाविकार
नागीण या नावाने ओळखला जाणारा हर्पिस झोस्टर या विषाणूमुळे होणारा त्वचाविकार हा
विषाणूजन्य त्वचाविकारांतील मुख्य रोग. पॅपिलोमा विषाणूचा संसर्ग असेल तर,
उन्हामुळे आग होणे, ओठांवर वारंवार येणारे फोड अशी लक्षणे दिसून येतात. यावर
क्रीम, गोळ्या, सनस्क्रीन्सचा वापर आदी उपचार डॉक्टरांकडून सुचविले जातात. हर्पिस
विषाणूच्या वेगवेगळ्या प्रजाती शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर परिणाम घडवून आणतात.
कांजिण्या याच विषाणूंमुळे होतात.
पॅरासायटिक त्वचाविकार
त्वचाविकारांचा एक विशीष्ट वर्ग असाही आहे, जो परोपजीवींमुळे (पॅरासाईट) होतो.
खरूज (स्केबीज) किंवा पेडीक्युलोसिस यासारखे विकार यात मोडतात. हे खऱ्या अर्थाने
संसर्गजन्य विकार होत. यात प्रामुख्याने रात्रीच्या वेळी प्रचंड खाज सुटणे, अंगावर
पुरळ आल्यासारखे फोड उठणे, त्यात पुन्हा जंतूसंसर्ग होऊन जखमा चिघळणे, अशी लक्षणे
दिसून येतात. हे त्वचाविकार संसर्गजन्य असल्यामुळे कुटुंबातील सर्वच सदस्यांचा
उपचारात सहभाग आवश्यक असतो. सर्व कपडे गरम पाण्यात धुवून घ्यावे लगतात. यात गॅमा
बेंझाईन हेक्झाक्लोराईडसारखी औषधे सुचविली जातात तर स्त्रिया व लहान मुलांसाठी
पर्मिथ्रीनसारखी वेगळी औषधे डॉक्टर सुचवितात. पेडिक्युलोसिसला इंग्रजीमध्ये
व्हॅगॅबॉंड डिसीज असे म्हणतात. शारीरिक स्वचछतेची काळजी न घेणाऱ्या उनाड
व्यक्तींमध्ये आढळणारा त्वचाविकार म्हणूनच हा विकार प्रसिद्ध आहे. डोके,
जननेंद्रिये या भागांत हा त्वचाविकार आढळतो.
उन्हाळ्यात त्वचेची काळजी
उन्हाळ्यात त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण घाम, शुष्कपणा, साचणारा मळ
यापासून तिचा बचाव करणे सर्वांनाच गरजेचे आहे. विशेष- लहान मुले, वृद्ध य्ामध्ये
(वयाच्या दोन टोकांमध्ये) त्वचेची प्रतिकारशक्ती, आर्द्रता राखू शकण्याची शक्ती
खूपच कमी असते. त्यमुळे त्यांनी काळजी घ्यावी. ज्या व्यक्तींना व्यवसायामुळे सतत
बाहेर फिरावे लागते त्यांनीही, अगदी गाडीतूनच फिरणे होत असेल तरीही, काळजी घेणे
आवश्यक आहे. तसेच, स्वत-च्या त्वचेबाबत म्हणजेच सौंदर्याबाबत जागरूक असणाऱ्या
युवक-युवतींनीही जाहिरातींमधून दाखवली जाणारी, घेतली जाणारी काही सौंदर्यप्रसाधने
वापरण्याआधी शक्यतो डॉक्टरचा सल्ला घेतल्यास उत्तमच.
- डॉ. अमित महाजन
त्वचारोगतज्ज्ञ, औरंगाबाद. |
|