Lagnagaath
त्वचारोग आणि रक्तशुद्धी

(डॉ. श्री बालाजी तांबे)
आयुर्वेदशास्त्रानुसार त्वचेचे रोग मुख्यत्वे रक्‍त दूषित झाल्यामुळे होत असतात. शरीराच्या आत असणाऱ्या रक्‍ताचा परिणाम बाह्यत्वचेवर जसा होतो तसाच त्वचेवर झालेला जंतुसंसर्ग उपेक्षित राहिला तर त्यामुळे रक्‍तही बिघडू शकते. त्वचेच्या माध्यमातून जंतू शरीरात प्रविष्ट झाले तर त्यामुळे अनेक समस्या उद्‌भवू शकतात. म्हणून त्वचा स्वच्छ व निरोगी राहील याकडे लक्ष देणे गरजेचे असते. .......
पंचज्ञानेंद्रियांपैकी संपूर्ण शरीराला व्यापून राहणारे एकमेव इंद्रिय म्हणजे त्वचा. स्पर्शज्ञानाची जबाबदारी त्वचेवर असतेच, पण बरोबरीने शरीरातील अवयवांना, मांस, मेद, शिरा यांना झाकण्याचे, त्यांच्या संरक्षणाचे आणि शरीर दर्शनीय करण्याचे कामही त्वचा करत असते. पाणी, धूळ, धूर, सूक्ष्म जीवजंतू त्वचारूपी संरक्षक आवरणामुळेच शरीरात सहज प्रवेश करू शकत नाहीत. संरक्षणासाठी जशी सुरक्षा व्यवस्था मजबूत, अभेद्य असणे भाग असते तशीच त्वचेद्वारे संरक्षण मिळण्यासाठी त्वचा निरोगी असणे गरजेचे असते. सामान्य डोळ्यांना त्वचा एकसंध दिसत असली तरी त्वचेवर असंख्य छिद्रे असतात. या छिद्रांमधूनच घाम त्वचेवर प्रकट होत असतो. औषधाचा स्वीकार होण्यासाठी त्वचा हा एक अतिशय प्रभावी मार्ग समजला जातो. कारण त्वचेतील छिद्रांमार्फत औषध सरळ शरीरात पोचू शकते. म्हणून लेप लावणे, अभ्यंग करणे हे आयुर्वेदिक उपचार अतिशय प्रभावी असतात.

रोगाचा संसर्ग, रोगाची लागण होण्याची जी कारणे आयुर्वेदात दिली आहेत त्यात स्पर्शाचा उल्लेख प्रथम केलेला सापडतो.

स्पर्शैकाहारशय्यादिसेवनात्प्रायशो गदाः ।
सर्वे सञ्चारिणो नेत्रत्वग्विकारा विशेषतः ।।
प्रसङ्‌गाद्‌ गात्रसंस्पर्शान्निःश्‍वासात्सहभोजनात्‌ ।
सहशय्यासनाच्चापि वस्त्रमाल्यानुलेपनात्‌ ।।

स्पर्श करण्याने, उष्टे अन्न खाण्याने, एका अंथरुणावर झोपण्याने, मैथुन करण्याने, श्‍वास-निःश्‍वासाचा परस्परसंयोग होण्याने, एका ताटात भोजन करण्याने, एकमेकांचे कपडे, माळा, गजरे वगैरे धारण करण्याने एका व्यक्‍तीच्या रोगाचा संसर्ग दुसऱ्या व्यक्‍तीला होऊ शकतो. ही कारणे बघितली की आयुर्वेदाने स्वस्थवृत्तात सांगितलेल्या दुसऱ्याचे उष्टे खाऊ नये, दुसऱ्याच्या ताटात जेवू नये, दुसऱ्याचे कपडे घालू नये, अनोळखी व्यक्‍तीजवळ झोपू नये, दुसऱ्याचे हार-गजरे घालू नयेत आदी नियमांचे महत्त्व कळते.

त्वचेवरील असंख्य सूक्ष्म छिद्रांत जंतू, दूषित द्रव्ये, साठून राहण्यास मोठा वाव असतो. म्हणूनच त्वचा स्वच्छ राखणे अत्यंत गरजेचे असते. यासाठी स्नान हा सर्वोत्तम उपाय. स्नानासाठी स्वच्छ पाणी हवेच, तसेच स्नानाच्या वेळेस अंगास उटणे लावणे उत्तम. उटण्यामध्ये त्वचेला हितकर वनस्पती असतातच, शिवाय सूक्ष्म चूर्णामुळे त्वचारंध्रात साचून राहिलेली अशुद्धी व साठून राहिलेला मळ सहजपणे सुटा होऊन धुतला जाऊ शकतो.

ओले केस बांधून ठेवणे, स्नानानंतर अंग नीट न पुसता कपडे घालणे, पूर्णतः न वाळलेले कपडे घालणे, घामाने वा पावसात भिजल्याने ओले झालेले कपडे वेळेवर न बदलणे वगैरे कारणांनी कोंडा, उवा-लिखा होणे, अंगावर खरूज, नायटा, घामोळी उठणे, त्वचेला कंड सुटणे वगैरे लक्षणे उद्भवू शकतात. विशेषतः फार कंड सुटणारे त्वचारोग खाजविल्याने पसरतात. काही त्वचारोगातून पाणी, लस वाहते, या पाण्याचा जेथे जेथे संसर्ग होईल तेथे तेथे त्वचारोगाचा संसर्ग होत जातो. असे त्वचारोग एका व्यक्‍तीकडून दुसऱ्या व्यक्‍तीकडे फैलावण्याची शक्‍यताही अधिक असते. अशावेळी घरात सकाळ संध्याकाळ धूप जाळण्याचा, जंतुसंसर्गास प्रतिबंध म्हणून नियमितपणे उटण्याचा वापर करण्याचा, रक्‍तशुद्धिकर द्रव्यांचे सेवन करण्याचा उत्कृष्ट उपयोग होतो.

स्त्री-पुरुषांनी केलेल्या अहितकर आहार-आचरणाचा परिणाम म्हणून जेव्हा आर्तव व शुक्र दूषित होतात तेव्हा त्वचारोगाचा संसर्ग नवजात बालकालाही झालेला आढळतो. जन्मजात त्वचारोग आई-वडिलांकडून संक्रामित झालेले आणि बरे होण्यास अवघड असतात.

आयुर्वेदशास्त्रानुसार त्वचेचे रोग मुख्यत्वे रक्‍त दूषित झाल्यामुळे होत असतात. शरीराच्या आत असणाऱ्या रक्‍ताचा परिणाम बाह्यत्वचेवर जसा होतो तसाच त्वचेवर झालेला जंतुसंसर्ग उपेक्षित राहिला तर त्यामुळे रक्‍तही बिघडू शकते. त्वचेच्या माध्यमातून जंतू शरीरात प्रविष्ट झाले तर त्यामुळे अनेक समस्या उद्‌भवू शकतात. म्हणून त्वचा स्वच्छ व निरोगी राहील याकडे लक्ष देणे गरजेचे असते. चेहऱ्यावरील पिंपल्स, अंगावर उठलेले गळू, त्वचेवर आलेला रॅश वगैरे प्रकार त्रासदायक असतातच, शिवाय दिसायलाही वाईट दिसतात, त्यामुळे बऱ्याचदा यातून त्वरित सुटका मिळविण्याच्या नादात तीव्र औषधे, दुष्परिणाम होऊ शकणाऱ्या द्रव्यांपासून बनविलेले मलमे वापरली जातात, यांचा परिणाम त्वरित होत असला तरी या उपायांमुळे रक्‍तातील दूषित द्रव्ये, त्वचेवरील जंतू यांचा मुळापासून नाश होत नाही, उलट हा जंतुसंसर्ग किंवा दुष्टी आतमध्ये खोलपर्यंत रुजून घर करून राहू शकते आणि संधी मिळताच वर येऊन अधिकच त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे जंतुसंसर्गावर, त्वचारोगावर वेळेवर योग्य उपचार करणेच श्रेयस्कर.

त्वचारोगाचा त्रास असणाऱ्यांना, त्वचेवर जंतुसंसर्ग होण्याची प्रवृत्ती असणाऱ्यांना रक्‍तशुद्धिकर द्रव्यांनी तयार केलेल्या उटण्याचा वापर करता येतोच किंवा अंघोळीच्या पाण्यात कडुनिंबाची पाने टाकण्याचा वा निर्गुडी, त्रिफळा, तुळशी वगैरेंचा काढा अंघोळीच्या पाण्यात मिसळून स्नान करण्याचाही उपयोग होताना दिसतो. काही विशिष्ट जंतुसंसर्गात, विशेषतः पाणी-लस वाहणाऱ्या त्वचारोगात, पायाच्या बोटांच्या बेचक्‍यात चिखल्या वगैरे झाल्यास धुरी घेण्याचाही उपयोग होताना दिसतो. वेखंड, कडुनिंब, राळ वगैरे जंतुसंसर्ग दूर करण्याची क्षमता असणाऱ्या द्रव्यांचा किंवा तयार "संतुलन प्युरिफायर' धुपाची धुरी त्या त्या विशिष्ट जागेवर घेण्याने जंतुसंसर्ग दूर होऊ शकतो. त्वचारोगांवर पंचकर्मापैकी विरेचन व बस्ती या उपचारांचाही उपयोग होत असतो. रक्‍तशुद्धिकर वनस्पती द्रव्यांच्या काढ्याची किंवा सिद्ध तेलाची बस्ती घेण्याने त्वचा शुद्ध होण्यास, रक्‍त शुद्ध होऊन जंतुसंसर्ग नाहीसा होण्यास मदत मिळते.

या सर्व बाह्य उपचारांबरोबर रक्‍तशोधक औषधे सेवन करणे, रोगप्रतिकारकशक्‍ती वाढविणारे योग घेणे उत्तम असते. ही औषधे आपापल्या प्रकृतीनुरूप घेणे उत्तम असल्याने वैद्यांच्या सल्ल्याने मंजिष्ठा, अनंतमूळ, हळद, अर्जुन, चोपचिनी, त्रिफळा वगैरे द्रव्ये, "संतुलन शांती रोझ', धात्री रसायन घेणे उत्तम. जंतुसंसर्गाची प्रवृत्ती समूळ नाहीशी होण्यासाठी "संतुलन आत्मरस', "मंजिष्ठा सॅन', महामंजिष्ठादि काढा वगैरे योगही प्रभावी असतात.

- डॉ. श्री बालाजी तांबे


SapSakal