Lagnagaath
मगरमिठी

(डॉ. श्री बालाजी तांबे)
त्वचेचा संबंध असतो वायुतत्त्वाशी. सर्व प्रकारचे स्पर्श त्वचेमुळेच कळतात. किंबहुना वायूचे अस्तित्वही त्वचेमुळेच कळते. त्वचेतील जीव निघून गेला तर स्पर्शच कळणार नाही. त्वचा संपूर्ण शरीराला व्यापून असल्याने कदाचित मिठी मारल्यावर एकमेकांना आश्‍वस्तता मिळते. त्वचेच्या स्पर्शज्ञानामुळे मिठीचे सुख मिळते परंतु त्वचारोगाचा स्पर्श झाल्यास ती मगरमिठीच ठरू शकते. .......
मध्यंतरी बर्लिनमध्ये एका मोठ्या शास्त्रज्ञाने भरविलेले एक प्रदर्शन पाहण्याचा योग आला. या शास्त्रज्ञाने असे एक तंत्रज्ञान शोधून काढले आहे की ज्यायोगे मेलेल्या मनुष्याचे शरीर गोठवून ठेवता येते, शरीराचे वेगवेगळे छेद घेऊन आत शरीर कसे दिसते हे पाहणेही शक्‍य होते. तेथे शरीराचे बाकी सर्व अवयव वितळवून शरीरातील फक्‍त मज्जासंस्था पाहता येईल असे शरीर तयार करून ठेवलेले होते. शरीराचा काही भाग अर्धवट कापून आतील शरीर पाहण्याची व्यवस्था केलेली होती. वैद्यकीय व्यवसायाला उपयोगी असणाऱ्या तसेच बाकीच्या सर्वांनाही परमेश्‍वराने बनविलेल्या चमत्कृतीपूर्ण शरीराचे संपूर्ण ज्ञान होऊ शकेल अशी व्यवस्था केलेली होती. या प्रदर्शनात माणसाच्या शरीराच्या आतले सर्व अवयव काढून टाकून, त्वचा शाबूत ठेवून टांगून ठेवलेली होती. ही टांगून ठेवलेली त्वचा पाहताना गंमत वाटली व मनात विचार आला जन्म घेताना मनुष्य त्वचेची पिशवी घेऊन परमेश्‍वराकडे जात असावा व परमेश्‍वर या पिशवीत सर्व शरीर भरून देत असावा. कारण प्रत्येकाच्या शरीराच्या आतले अवयव दिसायला सारखेच असतात. फरक असतो फक्‍त बाहेर असलेल्या त्वचेत. गोरी त्वचा, काळी त्वचा, गुळगुळीत त्वचा, पूर्वेच्या देशातील लोकांची त्वचा वेगळी तर पाश्‍चिमात्यांची त्वचा वेगळी असे त्वचेचे अनेक प्रकार बघायला मिळतात. बाजारात जाताना पिशवी लहान असून त्यात अनेक गोष्टी जशा ओढून ताणून कोंबल्या जातात तशी काही लोकांची ताणलेली त्वचा असते. काही लोक बाजारात जाताना मोठी पिशवी नेतात पण नंतर खूप वस्तू विकत घेण्याची ऐपत नसल्यामुळे मोठ्या पिशवीच्या तळाच्या कोपऱ्यात कलंडलेली एखादी व वर सगळी पिशवी सुरकुतलेली दिसते तसाच अवतार काही लोकांचा दिसतो. व्यक्‍तीनुसार त्वचेत फरक ठेवण्यासाठी कुणाच्या त्वचेवर चामखीळ लाव, कुणाच्या त्वचेवर तीळ तयार कर, कुणाच्य


त्वचेवर इतक्‍या प्रमाणात केस तयार कर की मनुष्य हा प्राणीच आहे हे पटावे. त्वचा बाह्य जगतासाठी संपर्काचे एक साधन आहे, पण त्वचारोग माणसाला एकटे पाडतो कारण त्वचेतून जंतू लवकर प्रवेश करू शकतात आणि रोगाचा संसर्ग इतर व्यक्‍तींना होतो.

पण या त्वचेची तेवढीच काळजी घेणेसुद्धा आवश्‍यक असते. कारण त्वचेवाटे संसर्ग पसरून त्वचारोग जलद रीतीने पसरू शकतात. साधारणतः घरातल्या एखाद्या मुलाला खरूज हा त्वचाविकार झाला असता, इतर मुलांची खूप खूप काळजी घ्यावी लागते. कारण हा विकार संसर्गजन्य असल्याने व लहान मुले इकडे तिकडे एकमेकंना हात लावत असल्याने इतरांना खरजेचा संसर्ग लवकर होऊ शकतो.

त्वचा संवेदनशील असल्याने उन्हात गेल्याने त्वचा लाल होते. दोन-चार दिवस समुद्रकिनारी जाऊन आल्यास गोरी माणसे पण काळवंडतात. भारतीयांना जसे गोरेपणाचे अप्रूप तशीच परदेशीयांना काळ्या त्वचेची आवड असल्याचे दिसते. भारतातील सूर्य अति तीव्र असल्याने भारतात त्वचा लगेच काळवंडते व अशी टॅन झालेली त्वचा परदेशीयांना आवडते. पण त्यांच्या हे लक्षात येत नाही की अशा तऱ्हेने त्वचेवर सूर्यकिरण पडले तर नंतर सूर्याच्या प्रखर किरणांमुळे त्वचेचा कॅन्सर होऊ शकतो. सकाळच्या वेळच्या कोवळ्या उन्हात बसणे वेगळे आणि भर दुपारी रखरखीत उन्हात समुद्राच्या वा नदीच्या किनाऱ्यावर उघडेबंब होऊन झोपणे वेगळे. असे सूर्यस्नान शरीराच्या दृष्टीने अजिबात चांगले नाही.

त्वचेवर गांधी येणे, खाज सुटणे, त्वचेवर पुरळ येणे हे सर्व त्रास संसर्गजन्य म्हणता येणार नाहीत. पण काही विकार मात्र संसर्गजन्य असू शकतात किंवा त्यांचा दुसऱ्यांना उपसर्ग होऊ शकतो. "सोरायसिस' ह्या त्वचारोगाच्या अति अवस्थेत म्हणजे अंगावर माशाप्रमाणे खवले येण्याचा व कोंड्याच्या रूपात त्वचा गळून पडण्याचा विकार झालेला रोगी सोफ्यावर बसल्यास सोफ्यावर व जमिनीवर कोंड्याचा सडा पडल्यामुळे रोगी उठून गेल्यावर सोफा व खालची जमीन पुसून घ्यायची वेळ येते.

त्वचाविकारातील संसर्गजन्य विकार भारतासारख्या उष्ण कटिबंधाच्या देशात जास्ती येऊ शकतात. कारण त्वचेवर असणारे विकार किंवा घाम हस्तांदोलन करत असताना दुसऱ्याला त्रासदायक होऊ शकतो. म्हणून आपल्याकडे दुरूनच नमस्कार करण्याची पद्धत रूढ आहे. हस्तांदोलन करण्याची प्रथा थंड हवेच्या ठिकाणी असलेली दिसते. बर्फ पडणाऱ्या देशात तर मिठी मारणे हाच प्रकार रूढ दिसतो.

उष्णता त्वचेला त्रास देणारी व त्वचेवर काही विकार असल्यास विकार पसरविणारी ठरते. म्हणून उष्ण कटिबंधातील लोकांनी त्वचाविकाराच्या संसर्गापासून अधिक काळजी घेणे आवश्‍यक असते. त्वचा साधारणतः अनेक आवरणांनी बनलेली असते. एखाद्या कठीण वस्तूवर त्वचा घासली गेली तर लाल होऊ शकते किंवा वरवरची त्वचा फाटू शकते अशा वेळी साधारणतः कोरफडीचा रस, तेल-हळद लावली तरी काम भागते. परंतु, त्वचेवर खोलवर जखम झाली तर मात्र त्यावर इलाज करणे आवश्‍यक ठरते.

बोटांच्या बेचक्‍यात येणारे किंवा पाण्यासारखे दिसणारे फोड पसरू शकतात किंवा दुसऱ्याला त्रास देऊ शकतात. म्हणून त्यांची खूप काळजी घ्यावी लागते, त्यातून येणारे पाणी व्यवस्थित टिपून घेऊन शरीराच्या इतर भागाला वा दुसऱ्याला लागणार नाही याची काळजी घेणे आवश्‍यक असते.

डोक्‍यात होणारा कोंडा, उवा हे त्रासही त्वचाविकारात मोजायला हरकत नाही. त्यांचाही संसर्ग फार लवकर होऊ शकतो व दुसऱ्याला त्रास होऊ शकतो. शाळेत जाणाऱ्या लहान मुली एकमेकांजवळ बसतात, खेळतात त्यामुळे संसर्ग होऊ शकतो. यासाठी मुलींना काळजी घ्यायचे योग्य ते शिक्षण देणे आवश्‍यक आहे.

संसर्गजन्य त्वचारोग असलेल्या व्यक्‍तीशी संपर्क आला असता सर्वांना त्याचा संसर्ग होतोच असे नाही. रोगप्रतिकारशक्‍ती कमी झालेली असल्यास लागण लगेच होते, शिवाय प्रज्ञापराध घडलेला असल्यास कर्माची फळे भोगावी लागावी यासाठीही रोग झालेला दिसतो.

सध्या त्वचेचा कर्करोग मोठ्या प्रमाणावर पाहण्यात येतो. हाही संसर्गजन्य नाही व तो इतर सर्व कर्करोगाच्या तुलनेत बरा करण्यास सुलभ असतो. त्वचारोगात जळवात हा एक मोठा रोग आहे. शरीरात उष्णता वाढल्यामुळे हातापायाची आग होणे, हातापायाला भेगा पडणे, एका पायाच्या भेगांमुळे दुसऱ्या पायाला कापले जाईल एवढ्या धारदार भेगा पडणे हे प्रकार त्वचारोगात समाविष्ट केलेले दिसतात परंतु ते संगर्जजन्य नसतात, त्वचाविकाराशी संबंधित सर्वात मोठा विकार म्हणजे महारोग-कुष्ठरोग. याच्या नावातच महा आहे.

हा केवळ त्वचाविकार नाही व तो संसर्गजन्यही नाही. या रोगात शरीरात मोठ्या प्रमाणावर विकृती उत्पन्न होत असल्यामुळे बीभत्सता वा एक प्रकारचा ओंगळपणा त्याच्यात तयार झाल्यामुळे अशा रोग्यांपासून दूर राहण्याची वृत्ती असलेली दिसते. या रोगावर रामबाण औषधे सापडलेली नव्हती तोपर्यंत अशा रोग्याला वाळीत टाकले जात असे, पण सध्या या रोगावर औषधोपचार मिळत असल्यामुळे रोगाला न घाबरता विकार बरा करता येण्यासारखा आहे.

त्वचेचा संबंध असतो वायूतत्त्वाशी त्यामुळे सर्व प्रकारचे स्पर्श त्वचेमुळेच कळतात. किंबहुना वायूचे अस्तित्वसुद्धा त्वचेमुळेच कळते. वेगवेगळी इंद्रिये पृथ्वी, जल वगैरे तत्त्वांशी निगडित असतात व त्यांची व्याप्ती शरीरातील स्थान मर्यादित असते. त्या मानाने त्वचा सर्व शरीरभर व्यापलेली असते. त्यामुळे पुढून, मागून , बाजूने कुठूनही कोणी जवळ आले तर त्वचेला लगेच जाणवते. त्वचेतील जीव निघून गेला तर स्पर्शच कळणार नाही. त्वचा संपूर्ण शरीराला व्यापून असल्याने कदाचित एकमेकाला मिठी मारल्यावर एकमेकांना आश्‍वस्तता मिळते. त्वचेच्या स्पर्शज्ञानामुळे मिठीचे सुख मिळते परंतु त्वचारोगाचा स्पर्श झाल्यास ती मगरमिठीच ठरू शकते.

- डॉ. श्री बालाजी तांबे


SapSakal