चीन - भूकंपात अपत्य गमावलेल्यांना दुसऱ्या अपत्य प्राप्तीची सूट


बीजिंग - चीनमध्ये गेल्या १२ मे रोजी झालेल्या तीव्र भूकंपात अपत्य गमावलेल्या चीनी नागरिकांसाठी एक आनंदाचा निर्णय तेथील सरकारने घेतला आहे.

भूकंपात अपत्याला मुकलेल्या किंवा मुलगा-मुलगी गंभीर जखमी झालेल्या कुटुंबांना "एक मूल धोरणा'तून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भूकंपाची तीव्रता जास्त असलेल्या सिचुआन प्रांतातील चेंगदू लोकसंख्या आणि कुटूंब नियोजन समितीने नुकताच हा निर्णय घेतला. या कुटुंबांना दुसऱ्या अपत्य प्राप्तीसाठी आवश्‍यक प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

चीनमधील भूकंपात ६५ हजार लोक मृत्युमुखी पडले होते, त्यात लहान मुलांचे प्रमाण सर्वाधिक होते. त्यामुळे "एक मूल धोरणा'च्या नियमावलीत बदल करण्याची गरज होती. या सगळ्याचा विचार करूनच हा निर्णय घेतला असल्याचे समितीचे पदाधिकारी वॅंग यांनी सांगितले.

चीनमधील कायद्याप्रमाणे एकापेक्षा जास्त अपत्य असलेल्या कुटुंबांवर दडात्मक कारवाई केली जाते.


SapSakal