मराठी प्रतिभेचा दिल्लीवर झेंडा सुरेखा टाकसाळ - सकाळ न्यूज नेटवर्क  | | नवी दिल्ली, ता. १० - ५४ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये "पुलिजन्मम्' हा
मल्याळी चित्रपट आज सर्वोत्कृष्ट ठरला, तरी पुरस्कारांवर ठाशीव मोहोर उमटली, ती
मराठी प्रतिभेची.
मराठी जयते... व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
ऑडिओ ऐकण्यासाठी इथे क्लिक करा पुरस्काराचा
आनंद काही और! - दिलीप प्रभावळकर उत्साह
वाढलाय! - अमोल पालेकरनवा जोश आलाय!
- अशोक पत्कीकष्टाचे फळ
मिळाले! - स्वानंद किरकिरेजबाबदारी
वाढलीय! - मधुर भांडारकरअपेक्षा नसतानाचा
आनंद - नीना कुलकर्णीआनंद गगनात
मावेना! - अनिल पालांडे "लगे रहो मुन्नाभाई' सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट
ठरला. त्यात दिलीप प्रभावळकर यांची "गांधीगिरी' प्रभावी ठरली. याची पावती त्यांना
मिळाली सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्याच्या पुरस्काराच्या रूपाने. मधुर भांडारकर
यांच्या सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाला पुन्हा "ट्रॅफिक सिग्नल' मिळाला. या
दिग्गजांच्या जोडीने गोव्याची; परंतु आता शिक्षणासाठी पुण्यात आलेली बालकलाकार
दिव्या चाफाडकरसह इतर नऊ मराठी कलाकारांच्या प्रतिभेचा "अंतर्नाद'ही राष्ट्रीय
पातळीवर उमटला.
न्यायालयीन वादामुळे लांबलेल्या २००६च्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा
निवड समितीचे अध्यक्ष बुद्धदेव दासगुप्ता यांनी आज पत्रकार परिषदेत केली. सौमित्र
चटर्जी (पोदोखेप, बंगाली चित्रपट) यांना सर्वोत्तम अभिनेते आणि प्रियामणी (पारूती
वीरन, तमीळ चित्रपट) यांची सर्वोत्तम अभिनेत्री म्हणून निवड झाली. "मुन्नाभाई'ला
एकूण चार पुरस्कार मिळाले. त्यांतील "बंदे मे था दम'च्या रचनेबद्दल स्वानंद
किरकिरे यांना सर्वोत्तम गीतकाराचा पुरस्कार (रौप्यकमळ आणि ५० हजार रुपये) मिळाला.
सर्वोत्कृष्ट पटकथेबद्दलचा पुरस्कार राजकुमार हिरानी, विधू विनोद चोप्रा आणि
अभिजात जोशी यांना जाहीर झाला. संजय दत्तची भूमिका असलेल्या "मुन्नाभाई
एमबीबीएस'लाही २००३ मध्ये असे चार पुरस्कार मिळाले होते.
मराठी विभागात नीना कुलकर्णी यांची निर्मिती असलेला "शेवरी' सर्वोत्कृष्ट चित्रपट
(रौप्यकमळ व एक लाख रुपये) ठरला. प्रभावळकर यांना पुरस्कारासाठी "मुन्नाभाई'बरोबरच
"शेवरी'तील भूमिकेचाही विचार झाला, तर अमोल पालेकर यांचा "क्वेस्ट' सर्वोत्तम
इंग्रजी चित्रपट ठरला. मराठी विभागात "बयो', "दिवसेंदिवस', "माती माय', "मायबाप',
"मातीच्या चुली', "मिशन चॅम्पियन', "नितळ' व "थांग' हे चित्रपटही स्पर्धेत होते.
"मायबाप' व "नितळ' यांचीही अंतिम निवडीसाठी चर्चा झाल्याचे समजते.
"खोसला का घोसला' उत्कृष्ट दिग्दर्शनाचा इंदिरा गांधी पुरस्कार "एकांतम्' या
मल्याळी चित्रपटासाठी मधू कैतप्रम् आणि "काबूल एक्स्प्रेस'साठी कबीर खान यांना
विभागून देण्यात आला. माहितीपटासाठीचा पुरस्कार अमिताभ चक्रवर्ती यांच्या "बिशर
ब्ल्यूज'ला जाहीर करण्यात आला आहे.
विशाल भारद्वाज यांना "ओंकारा' चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी परीक्षकांचा विशेष
पुरस्कार जाहीर झाला. याच चित्रपटातील भूमिकेबद्दल कोंकणा सेनला सहायक अभिनेत्रीचा
पुरस्कार देण्यात आला, तर सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक गुरुदास मान (इश्क दा वारिस,
पंजाबी) ठरले. सर्वोत्कृष्ट चित्रीकरणाचा पुरस्कार गौतम घोष (यात्रा, हिंदी) यांना
जाहीर करण्यात आला.
सर्व चित्रपटांसाठी समान नियम लागू असावेत, अशी याचिका याआधीच्या निवड समितीच्या
दोन सदस्यांनी न्यायालयात दाखल केली होती. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने पुरस्कार
निवडीच्या संपूर्ण प्रक्रियेला स्थगिती दिली होती. त्यामुळे २००६चे पुरस्कार उशिरा
जाहीर झाले, असे या वेळी सांगण्यात आले.
"नॉनफिचर फिल्म' विभागाच्या समितीचे अध्यक्ष विक्रमसिंह म्हणाले, ""सेन्सॉरचे
प्रमाणपत्र असलेल्याच चित्रपटांची दखल घेण्याच्या आदेशामुळे, "फिल्म ऍण्ड
टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया' (पुणे) आणि "सत्यजित रे फिल्म
इन्स्टिट्यूट'मधील (कोलकता) विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचा विचार करता आला नाही.
२००५ पर्यंत या संस्थांमधील विद्यार्थ्यांनी तयार केलेले चित्रपट स्पर्धेत असत. ते
पुन्हा निवडीमध्ये यावेत, यासाठी काही मार्ग शोधायला हवा, असे मत श्री. दासगुप्ता
यांनी व्यक्त केले.
मधुर यश - मधुर भांडारकर
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (ट्रॅफिक सिग्नल, हिंदी)
- दिलीप प्रभावळकर
सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेते
(लगे रहो मुन्नाभाई व शेवरी (मराठी)
- स्वानंद किरकिरे
सर्वोत्तम गीतकार
(लगे रहो मुन्नाभाई)
कोकणी अंतर्नाद
राजेंद्र तालक दिग्दर्शित "अंतर्नाद'ला सर्वोत्कृष्ट कोकणी चित्रपटाचा पुरस्कार
जाहीर झाला. त्यातील दिव्या चाफाडकर सर्वोत्कृष्ट बालकलाकार ठरली. याच
चित्रपटाबद्दल अशोक पत्की यांना सर्वोत्कृष्ट संगीत आणि आरती अंकलीकर- टिकेकर
यांची सर्वोत्कृष्ट गायिका म्हणून निवड झाली.
- दिव्या चाफाडकर
सर्वोत्कृष्ट बालकलाकार
(अंतर्नाद, कोकणी)
- अशोक पत्की
सर्वोत्कृष्ट संगीत (अंतर्नाद)
- आरती अंकलीकर- टिकेकर
ृसर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका (अंतर्नाद)
- नीना कुलकर्णी
"शेवरी' सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट
- अमोल पालेकर
"क्वेस्ट' सर्वोत्तम इंग्रजी चित्रपट
- रवींद्र प्रभाकर भोसले आणि मृणालिनी भोसले
(जैविक खेती- सर्वोत्कृष्ट कृषिचित्रपट)
- अनिल पलांडे
सर्वोत्कृष्ट रंगभूषा (ट्रॅफिक सिग्नल) |
|