"किती सुंदर रंग दिसतात वारीमध्ये ! आपण
कोणत्या रंगाचे कपडे वापरतो, कसे राहतो, कसे दिसतो, यापैकी कशाचाच विचार
वारकऱ्यांच्या मनात येत नसावा. त्यांना फक्त विठ्ठलाला भेटायचं असतं. म्हणूनच
बहुधा वारीच्या वेळी सरमिसळ झालेले सारे रंग मनमोहक दिसतात. मला जर वारीतलं काही
भावलं असेल तर ते म्हणजे...रंग...' चित्रकार मिलींद ठाकूर सांगत होते. मिलींदनी
आत्तापर्यंत फक्त वारी या विषयावर शंभरावर पेंटिंग्ज काढली आहेत.
त्यांच्या चित्रांमधून वारीचं वातावरण तर आपल्यापर्यंत पोहोचतच पण त्याचबरोबर
त्यांची चित्र केवळ चित्र न राहता वारकऱ्यांची श्रद्धा, भक्ती, विठ्ठलाची ओढ...
सारं काही आपल्यापर्यंत घेऊन येतात.
पुण्यात नारायण पेठेत राहणाऱ्या मिलींद
ठाकुरांनी शालेय शिक्षणानंतर मुंबईच्या जे जे आर्ट स्कूलमधून फाईन आर्टस्मध्ये
पदव्युत्तर शिक्षण घेतलं. सध्या मुंबीत राहणाऱ्या मिलींदनी चित्रकाराच्या
स्वभावाला रुचेल, भावेल तशी कामं करायला सुरूवात केली. "नोकरी करायची नाही हे मनात
पक्कं होतं. कारण तो माझा पिंड नाही. सुरूवातीला मी न्यायालयात घडणाऱ्या घटनांवर
काही वृत्तपत्रांसाठी स्केच करायचो, पोट्रेट करायचो. पण त्यानंतर मला माझी वाट
सापडत गेली.
विविध विषयांवर चित्र काढायचो. दिल्लीतल्या कलादालनांमध्ये ठेवायचो. त्यांना
उत्तम प्रतिसाद मिळू लागला. मुंबईतही जहांगीर कलादालनात फक्त माझी चित्र असलेलं
पहिलं प्रदर्शन भरलं. आणि त्यालाही खूप चांगला प्रतिसाद मिळाला.'
"आणि
वारीच्या प्रतिमा कागदावर उतरवाव्या असं कधी वाटलं ?' वारीची पेंटींग्ज समोर होती,
ती खूप खरी, थेट आणि भिडणारी होती. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्यालाच
हवं होतं. रंगांचा वापर तर विशेष भावत होता.
"खूप वर्ष वारीला जायचं होतं. मला
फिरायला खूप आवडतं. पण बहुधा योग येत नव्हता. मी दोन वर्ष पुणे -आळंदी, पुणे सासवड
चाललो आणि तेव्हा मला वारकरी जवळून दिसले-भेटले. इतकं चालणं, इतक्या भक्तीनं,
विठ्ठलाच्या ओढीनं प्रवास करणं सोपं नाही. त्यांच्या मनात काय असतं, ते किती
विठ्ठलमय झालेले असतात, हे अगदी जवळून अनुभवलं. आणि खरंच, मला त्या वातावरणातले
रंग कागदावर उतरवताना त्यांची भक्ती उमजत गेली. वारकऱ्यांना कोणाचकडून काही नको
असतं. त्यांना ना प्रसिद्धी हवी असते ना कसली अभिलाषा असते.
वारी करताना फक्त विठ्ठल असतो त्यांच्या मनात. वारी मला खूपशी आपल्या
आयुष्यासारखी वाटते. सुख-दुःखाचे प्रसंग येतातच, पण आपण त्यातही काही आनंद शोधतो,
कशावर तरी श्रद्धा ठेवत आयुष्य चालत राहतो...हा सारा जीवनाचा प्रवास मला वारीमध्ये
दिसला. आपण सारेच आयुष्य फार अवघड करत असतो. खरं तर ते किती साधं, सोपं असू शकतो
हे त्या वारकऱ्यांकडे पाहून कळतं.
वारीच्या या पेंटीग्जमुळे महाराष्ट्रीची
शान असणारी ही वारी महाराष्ट्राबाहेर आणि देशाबाहेरही जाऊन पोचली आहे.
उत्तरेकडच्या बऱ्याच जणांनी, दिल्लीतल्या प्रदर्शनात बघून वारीची पेंटिंग्ज घेतली
आहेत. एका पंजाबी मुलीनं तिच्या आई-वडिलांना वारीवर काढलेली दोन पेंटिंग्ज भेट
दिली. आणि आता ती स्वतःकरताही हॉंगकॉंगला काही पेंटिंग्ज घेऊन जाते आहे. इतकंच
नाही तर अमहाराष्ट्रीय व्यक्तींना या पेंटिंग्जबद्दल जास्त माहीत करून घ्यायची
उत्सुकताही आहे.
कित्येक जणांनी पेंटिंग्ज घेताना माझ्याकडून वारीची पार्श्वभूमीही जाणून घेतली
आहे. देशाबाहेरही वारीची ही पेंटिंग्ज लोकांना आवडतात. त्या निमित्तानं वारी
जगभरात पोहोचते याचा आनंद होतो. आत्ताही ऍमस्टरडॅमला भरलेल्या एका प्रदर्शनात माझी
वारीवर काढलेली तीन पेंटिंग्ज ठेवलेली आहेत.'
ऍक्रेलिक ऑन कॅनव्हास या
प्रकारात पेंटिंग करणाऱ्या मिलींदची खासियत आहे व्हर्टिकल लाइन्स हा पॅटर्न.
त्यांनी वारीची काही पेंटिंग्ज कॅनव्हासवर वॉटरप्रुफ इंक वापरूनही केली आहेत.
"मी कधी ठरवलं की आता दहा पेंटिंग्ज विकायची, आणि चित्र काढायला बसलो तर
माझ्या हातातून ते येतच नाही. मुक्तपणानं मी जेवढा चित्र काढेन तितकी कला माझ्यावर
प्रसन्न होते. त्यामुळे मी मनात आहे तोवरच आणि तेव्हाच कॅनव्हासला ब्रश लावतो.
अगदी वारीबद्दल सांगायचं, तरी वारीवर यापूर्वी कोणी पेंटिंग्ज केली नाहीत असं
नाही, पण मला दिसलेली वारी म्हणून मला हीच थिम वापरण्यात काही वावगं वाटलं नाही.'
तीस वर्षांचा हा तरूण कलाकार बोलत होता, ते किती खरं होतं हे त्यांची
पेंटिंग्ज बघून कळतच होतं. या कलंदराला निराळ्या पावतीची गरजच नव्हती.
-
चित्रा वाळिंबे
pailteer@esakal.com
चित्रकार मिलींद ठाकूर यांची चित्रे
पाहण्यासाठी क्लिक करा - www.milindthakur.com