SAKAL
Last Update 7/4/08 21:27 PMआषाढ शु. २ शुक्रवार,  04 July 08 Google
मुख्य पानपुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराविदर्भखानदेशमागील अंक

Om_Developers
मल्टिमीडिया
महाराष्ट्र
कोकण
गोवा
राष्ट्रीय
आंतरराष्ट्रीय
क्रीडा
अर्थविश्‍व
सकाळ विशेष
वारी
भविष्य
संपादकीय
News_Bulleting
प्रॉपर्टी
जागर
सप्तरंग
बालमित्र
मल्टिप्लेक्‍स
मुक्तपीठ
फॅमिली डॉक्‍टर
पंचांग |

पंचांग
शुक्रवार - आषाढ शु. २ रा. ११.४०, चंद्रनक्षत्र पुनर्वसू स. ९.२१, चंद्रराशी कर्क, भारतीय सौर आषाढ १३, शके १९३०.(उद्या आषाढ शु. ३)

सुविचार
क्षणाची कुसंगतीही भयानक ठरू शकते.

दिनमान
मेष - महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. प्रवास सुखकर होतील. गुंतवणुकीस चांगला.
वृषभ - जिद्द वाढणार आहे. तुमचे कार्यक्षेत्र वाढेल. आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
मिथुन - आर्थिक कामे उरकून घ्यावीत. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. महत्त्वाची बातमी समजेल.
कर्क - रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. मनोबल वाढेल.
सिंह - काहींना प्रकृतीच्या तक्रारी. फारसा उत्साह वाटणार नाही. काहींना निराशाजनक परिस्थिती.
कन्या - अनेकांशी सुसंवाद साधाल. अपेक्षित गाठीभेटी पडतील. आर्थिक लाभ समाधानकारक.
तूळ - इतरांवर प्रभाव राहील. सार्वजनिक क्षेत्रात मानमरातब वाढेल. अनेकांशी सुसंवाद.
वृश्‍चिक - भाग्यकारक घटना. मनोबलाच्या जोरावर कार्यरत राहाल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी.
धनू - वाहने चालवताना दक्षता हवी. बेकायदेशीर गोष्टी टाळाव्यात. एखादा मनस्ताप संभवतो.
मकर - खर्चाचे प्रमाण कमी होईल. महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल. दैनंदिन कामे यशस्वी.
कुंभ - प्रवासामध्ये काळजी घ्या. खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींची आध्यात्मिक प्रगती.
मीन - मनोबल वाढविणारी घटना घडेल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. संततिसौख्य लाभेल.

- प्रा. रमणलाल शहा

दिनविशेष - ४ जुलै
कालिदास दिन
१७२९ - मराठी आरमाराचे दर्यासारंग सरदार कान्होजी आंग्रे यांचे निधन.
१९०२ - स्वामी विवेकानंद यांचे निधन.
१९९६ - रहस्यकथाकार चंद्रकांत सखाराम चव्हाण ऊर्फ बाबूराव अर्नाळकर यांचे निधन.
१९९७ - अमेरिकेचे "पाथ फाईंडर' हे यान मंगळावर उतरले.
१९९९ - कारगिलमधील "टायगर हिल्स' हा महत्त्वाचा टापू भारतीय लष्कराने मुक्त केला.
२००४ - प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते अजित सरदार यांचे निधन.

सहज - फिटनेस.....
सर्व आमदारांनी विधानभवनाला फेऱ्या माराव्या व शारीरिक वजन घटवावं असं दोन वर्षांपूर्वी जाहीर झालं होतं. त्याचा अंतस्थ हेतू मला तर असा वाटला की विधानसभेत प्रश्‍नोत्तराच्या तासाला अनेक आमदार गोंधळ घालतात. विधानभवनाला दोन-तीन चकरा धावत मारल्या की सारं सभागृह शांत राहील...

आता पोलिसांनी "फिटनेस' ठेवावा असं ऐकलं. पोलिस, होमगार्ड, सैनिक यांना संकटकाळी मदतीसाठी बोलावलं जातं, त्याचं कारण त्यांची शारीरिक क्षमता सर्वसामान्यांपेक्षा चांगली असते त्यामुळे, असंच आजवर वाटत होतं... पण पोलिसांकडे पाहिलं की शंका यायला लागते. पुण्यातली आकडेवारी पाहिली तर सहा हजारांपैकी हजार-बाराशे पोलिसच योग्य शरीरयष्टी सांभाळून आहेत.

आपण एखादी नोकरी करतो, तेव्हा वेळेवर येणे, आपली कामे बिनचूकपणे करणे, हे अध्याहृत म्हणजे मूलभूत समजतो. पोलिसांच्या नोकरीत मूलभूत गोष्ट म्हणजे उत्तम शरीरयष्टी असं आजपर्यंत मी तरी समजत होतो, ही आकडेवारी पाहिल्यावर मात्र "इतर' गोष्टी महत्त्वाच्या, शारीरिक क्षमता ही "ऑप्शनल' असावी असं वाटतं. शिवाय भत्ते हा या क्षेत्रातला महत्त्वाचा शब्द, पण शारीरिक क्षमता वाढविण्यासाठी असलेला भत्ता घ्यायला मात्र फारसं कोणी उत्सुक नाही...

- मोहन

माझ्या मना - बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी !
समुपदेशनाबाबतीत सगळ्यांच्याच केव्हा ना केव्हा कमी-जास्त तक्रारी असतात. त्यातल्या अगदी सहज दिसणाऱ्या तक्रारींपैकी एक म्हणजे वरील म्हण होय. "ते काय सांगणार, मला माहिती आहे! नुसते शब्दांचे बुडबुडे अन्‌ मनाचे खेळ! बाकी काय?' हे तर खरेच, की नुसता कढीभात करायला फार कष्ट आणि वेळ लागत नाही; पण कुठल्याही वेळेला अवचित पाहुण्यालाही एवढे निश्‍चितच देता येते. त्यामागची अगत्याची भावना ही खरी श्रीमंती.

एकदा माणसाच्या अगदी साध्या शारीरिक गरजा भागल्या अन्‌ सुरक्षितता अनुभवाला आली, की नंतर दुसऱ्याबद्दल आपलेपणा, स्वतःविषयी इतरांना वाटणारी आपुलकी, वाढणारा आत्मविश्‍वास अशा गरजा दिसून येतात. आपल्यातल्या सुप्त क्षमतांचा विकास व्हायला हवा, अशी आचही बऱ्याच जणांना वाटते. या सगळ्या गोष्टींच्या मागे धावताना जर दुसऱ्याने साथ केली, तर हा प्रवास आनंदाचा होतो; पण काही जणांची जीभच काटेरी असते किंवा शब्द हे शस्त्र आहे याचा त्यांना विसर पडू शकतो. मग कुणाच्या तरी लागट बोलण्याने मन घायाळ होऊन जाते. कुणाच्या वाईट बोलण्याने मानसिक त्रास किंवा आजारही उद्‌भवू शकतात किंवा बळावू शकतात, तसे हे त्रास अन्‌ आजार कुणाच्या चांगल्या बोलण्याने बरेही होऊ शकतात; पण समुपदेशन किंवा मानसोपचार मात्र कायद्याने सक्ती करून देता येत नाहीत आणि हे जसे दुसऱ्या मनाला संजीवनी ठरू शकतात; तसेच ते दुखावणाऱ्या माणसासाठीही आवश्‍यक असतात.

म्हणून आधी शब्दाला महत्त्व द्यायला हवे. शब्द हा पवित्र आहे, याचे भान ठेवायला हवे. शब्दालाच महत्त्व दिले नाही, तर आपल्याकडे महत्त्व परत येणार नाही, हे निश्‍चित; कारण आपल्याबाहेरचे वास्तव हे आपण आधी मनात उभे करत असतो, किंवा ते बदलण्याचीही प्रक्रिया आतच सुरू होत असते. उपचारांदरम्यानसुद्धा पूर्वीच्या वास्तवाला शब्दात पकडूनच पुन्हा उभे केले जाते अन्‌ मग त्यात योग्य ते बदल घडवता येतात. शब्दांचे जसे बाण होऊ शकतात, किंवा बोलाचेच कढीभात होऊ शकतात; तसेच काही महामानवांकडून शब्दांची रत्ने, बोलांचे अमृतही होऊ शकते, हे लक्षात ठेवले तरी खूप झाले !

- डॉ. वासुदेव परळीकर

गीत ज्ञानेश्‍वर - कशी मी होऊ पुत्रवती ?
आपले सौभाग्य, आपल्या कुंकवाचा धनी आपल्याला परत मिळावा, म्हणून रुख्मिणीनं आई जगदंबेलाही साकडं घातलं.

एके दिवशी सिद्धेश्‍वर मंदिरात आलेल्या एका महासिद्ध योगीपुरुषाच्या दर्शनास रुख्मिणी गेली.

समोर एक सुवासिनी उभी असलेली पाहून त्या सिद्घपुरुषानं रुख्मिणीला "पुत्रवती भव' असा आशीर्वाद दिला. हा आशीर्वाद ऐकताच रुख्मिणीच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या.

स्वामींना आश्‍चर्यच वाटलं. त्यांनी याचं कारण विचारल्यावर रुख्मिणी त्यांना आपली जीवनकथा सांगू लागली...

पतीविणा मी असे एकटी ।
कशी होऊ मी पुत्रवती।।धृ.।।
आपण असता थोर महंत।
विद्याविभूषित महान पंडित।
जीवन माझे सारे खंडित।
कैसी होईल आशीष पूर्ती।।१।।
सदैव मग्न ते ईश्‍वरचरणी ।
सदा विरक्त संसारातुनी।
चित्त भरकटले देहापासुनी ।
नाही लाभली
मजला शांती।।२।।
एके दिनी ते मला सांगती।
संन्यासाची विनंती करती।
नाही दिली मी त्यास संमती।
नाही लाभली त्यांना शांती।।३।।
त्याच रात्रीला त्यागून गेले।
काशी क्षेत्री संन्यासी झाले।
नाही अजुनी गृही परतले।
पाठी लागली
अशी का नियती।।४।।
नाव पतीचे विठ्ठलपंत।
घरादाराची नाही खंत।
वेदनेसही नाही अंत।
सतत राहते मी एकान्ती।।५।।

- रमाकांत देशपांडे

ग्रहगोलांचे विश्‍व - पृथ्वी सूर्यापासून दूर
आज ४ जुलै रोजी सूर्य पृथ्वीपासून दुरात दूर अशा अंतरावर म्हणजेच १५,२१,०४,१६० किलोमीटर अंतरावर असेल. हे अंतर जानेवारी महिन्यातील अंतरापेक्षा सुमारे तीन टक्‍क्‍याने जास्त असणार आहे. सूर्याच्या या दुरात दूर असणाऱ्या स्थितीला अपसूर्य बिंदू (ऍपहेलियन) तर जवळात जवळ असणाऱ्या बिंदूला उपसूर्य बिंदू (पेरिहेलियन) म्हणतात. पृथ्वी उपसूर्य बिंदूत ४ जानेवारी रोजी असते.

पृथ्वीच्या सूर्याच्या जवळ दूर जाण्याच्या कारणाची आता आपण माहिती घेऊ या. सूर्याभोवती फिरणाऱ्या पृथ्वीची कक्षा गोल असावी, असे पूर्वी खगोलशास्त्रज्ञांना वाटे. मात्र चंद्र आणि मंगळाच्या कक्षांचा अभ्यास केल्यावर हे ग्रहगोल गोलाकार कक्षेत फिरत नसावेत असे दिसून आले. जर्मनीमधील योहान केप्लर या खगोलविदाने टायको ब्राहे नावाच्या प्रख्यात खगोल निरीक्षकाबरोबर पंधरा-वीस वर्षे काम केले. या काळातील निरीक्षणांच्या साह्याने त्याने ग्रहांच्या गतीचे कोडे सोडवले. त्याने दाखवून दिले, की सूर्याभोवती ग्रह गोलाकार कक्षेत फिरत नसून त्यांच्या कक्षा किंचित पसरट म्हणजेच दीर्घ वर्तुळाकार (विवृत्त किंवा इलिप्स) असतात.

केप्लरच्या नियमानुसार पृथ्वी सूर्याभोवती दीर्घवर्तुळाकार फिरते. ती जानेवारीमध्ये सूर्याजवळ म्हणजे उपसूर्यबिंदूत असते, तर सहा महिन्यांनी जुलैमध्ये ती सूर्यापासून दूर अशा अपसूर्य बिंदूत पोचते. केप्लरच्या नियमानुसार ती सूर्याजवळ असताना वेगाने प्रवास करते.

यामुळे जानेवारीमध्ये सूर्य किंचित वेगाने हलत असल्याचे दिसते. याचाच परिणाम म्हणजे आपल्याकडचा हिवाळा किंचित कमी कालावधीचा असतो. जुलैमध्ये पृथ्वी सूर्यापासून दूर असल्याने ती काहीशा मंद गतीने सूर्य प्रदक्षिणा करते. यामुळे या काळात चालू असणारा उन्हाळा किंचित जास्त कालावधीचा वाटतो.

- डॉ. प्रकाश तुपे

बोधकथा - पर्याय
जपानमध्ये १९३० च्या सुमारास मंदी होती. उद्योगांची विक्री व नफा कमी झाला होता. विद्युत उपकरणे बनविण्याच्या एका उद्योगाचा मालक होता ताकाशी खाकरा! त्याचा धंदाही अडचणीत आला होता. ताकाशीने शाळेचे शिक्षण अर्धवट सोडून वडिलांचा व्यवसाय पाहणे सुरू केले होते. विद्युत उपकरणे बनविणाऱ्या उद्योगात त्याच्या उद्योगाचा क्रमांक उलाढाल व नफा या दृष्टीने १९० वा होता. त्याच्याकडे दहा व्यवस्थापक व ४०० कामगार होते. मंदी आल्याने खर्च कमी करणे आवश्‍यक होते. यासाठी त्याने व्यवस्थापकांचा सल्ला विचारला. त्यांनी एकमुखाने सांगितले, ""निम्मे कामगार काढून टाका किंवा सर्वांचा पगार निम्मा करा.''

ताकाशीला हे दोन्ही उपाय पसंत पडले नाहीत. आपला तोटा होणार नाही व कामगार अडचणीत येणार नाहीत, असा उपाय शोधावा म्हणून त्याने खूप विचार केला व व्यवस्थापकांना आदेश दिला. ""कामगारही काढू नका व पगारही कमी करू नका. प्रत्येक कामगाराचे कामाचे तास आठऐवजी चार तास करा व उरलेल्या चार तासांत त्यांना शहरात घरोघर आपला माल विकायला पाठवा.''

आपली नोकरी व पगार वाचला म्हणून सर्व कामगारांनी उत्पादन व विक्री दोन्ही कामे पार पाडली. मंदी संपताना ताकाशीचा उद्योग १९० व्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर आला होता.

तात्पर्य - परिस्थिती कितीही "वाईट' असली, तरी "पर्याय' निघतोच.

- प्रा. अनिल गोरे

ज्ञानवंत - चार्ल्स एडवर्ड गेयोम (स्विस पदार्थविज्ञानशास्त्रज्ञ)
चार्ल्स एडवर्ड गेयोम यांचा जन्म १५ फेब्रुवारी १८६१ रोजी फ्लेअरिअर येथे झाला. इन्वार (खर्पींरी) या निकेल स्टील-मिश्रित धातूचा शोध चार्ल्स एडवर्ड गेयोम यांनी लावला. सूक्ष्म वजनांच्या निर्मितीसाठी या धातूचा उपयोग केला जातो. न्यूशॅटेल येथे शिक्षण पूर्ण करून ब्युरो ऑफ इंटरनॅशनल वेट्‌स अँड मेझर्सचे प्रमुख म्हणूनही गेयोम यांनी काम पाहिले. चार्ल्स एडवर्ड गेयोम यांना सन १९२० चे पदार्थविज्ञानशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले. वयाच्या ७७ व्या वर्षी १३ जून १९३८ रोजी गेयोम यांचे निधन झाले.

प्रश्‍नमंजूषा - प्रश्‍नसंच ११
१) श्रीकृष्णावर कोणता मणी पळवल्याचा आरोप होता?
२) अक्षौहिणी सैन्याची सर्वांत लहान तुकडी कोणती?
३) स्वच्छ पाण्याने तुडुंब वाहणारी कुरुक्षेत्रावरील नदी कोणती?
४) इंद्राने अर्जुनास दिलेल्या स्वर्गीय शंखाचे नाव काय?
५) शाण्व राजाच्या प्रसिद्ध विमानाचे नाव काय?

प्रश्‍नसंच ११ चे उत्तर
१) स्यमंतक, २) पत्ती, ३) हिरण्यवती, ४) देवदत्त, ५) शौभ.

- भालचंद्र कोल्हटकर


व्हिडिओ गॅलरी
चिंटू
व्यंगचित्र
पैलतीर
पैलतीर डायरी
नवा चित्रपट
नवे नाटक
एज्यूमंत्रा
मदर्स डे
मैत्रिण
वसंतोत्सव
जब वुई मेट
महाराष्ट्र दर्शन
शिदोरी
मराठी टायपिंग
ई-संदर्भ
वाहिन्यांवरील रिऍलिटी शोसाठी सरकारने नियमावली करावी का?
होय
नाही


मागील निकाल
आपल्या प्रतिकि"या




पुणेमुंबईकोल्हापूरनाशिकऔरंगाबादसोलापूरसाताराखानदेशनागपूरमहाराष्ट्रराष्ट्रीयक्रीडा
लग्नगाठऍग्रोवनसकाळ टाईम्स

Sakal Media Group | About us | Contact us | Privacy Policy | Ad Rate Card | Font Problem
Sakal Paper Limited, Pune, India.
All Information and pictures on this site are copyrighted material and owned by their respective creators or owners publication, copying, broadcasting or retransmission of the information or pictures without the written permission of the copyright holder is prohibited.

Developed by Sansui Software Pvt. Ltd.
Best viewed in 800 x 600