Lagnagaath
उद्योगी

(डॉ. श्री बालाजी तांबे)
पातंजल योगसूत्रे हा मानसशास्त्राची प्रत्यक्षाबरोबर, प्रमाणाबरोबर व प्रयोगाबरोबर सांगड घालणारा आद्य ग्रंथ. निखळ आनंद ज्यामुळे मिळत नाही त्या वृत्ती. त्यांना ताब्यात आणण्यासाठी म्हणजेच जीवन ऊर्ध्वगामी, उत्क्रांतीयुक्‍त करण्यासाठी तयार केले गेले योगशास्त्र. मुक्तीचा मार्ग दाखविणाऱ्या त्या गुरुवर्य पतंजलींना गुरुपौर्णिमेनिमित्त नमन. ........
जीवन ऊर्ध्वगामी, उत्क्रांतीयुक्‍त करण्यासाठी उदरनिर्वाहाचे साधन म्हणजे उद्योग किंवा कामधंदा असा समज होतो. पण खरा उद्‌-योग म्हणजे पातंजल योग - उत्थापनाचे शास्त्र, की ज्याच्या आचरणाने संपूर्ण एकत्वाचा आनंद अनुभवता येतो.

भारतीय परंपरेतील सहा शास्त्रांपैकी (षड्‌दर्शन) एक शास्त्र "पातंजल योगदर्शन' हे होय. "योग' हा शब्द "युज्‌' या धातूपासून तयार झालेला आहे. समाधीपर्यंतची अनुभूती व आनंद चित्ताच्या सर्व वृत्तींचा निरोध झाल्यावर मिळतो. त्या अवस्थेला पोचण्यासाठी जे शास्त्र विकसित झाले ते "पातंजल योगशास्त्र'.

पतंजलि महामुनी हे व्याकरण महाभाष्याचे कर्ते, योगदर्शनाचे प्रणेते व आयुर्वेदातील चरक परंपरेचे जनक. भर्तृहरींनी पतंजलींना खालीलप्रमाणे नमन केले आहे,

योगेन चित्तस्य पदेन वाचां मलं शरीरस्य च वैद्यकेन ।यो।पाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतो।स्मि ।।

योगाने चित्ताचा, व्याकरणाने वाणीचा (संभाषणाचा) व वैद्यकाने शरीराचा मल दूर करणाऱ्या पतंजलि मुनींना मी अंजली बंध (हात जोडून) नमस्कार करतो. पतंजलींनी अगदी बाल्यावस्थेतच अध्ययन करून भगवान शिवाला प्रसन्न करून घेण्यासाठी तप सुरू केले. असे म्हणतात की त्यांनी प्रत्यक्ष श्री शंकरांचे तांडवनृत्य पाहिले आणि परम सदाशिवांच्या आज्ञेवरून पदशास्त्रावर भाष्य लिहिले. योगशास्त्राचे, चरक संहितेचे व महाभाष्याचे पुनर्संस्करण केल्यामुळे देह, मन व वाणी ह्यांच्यात उत्पन्न होणारे दोष निरसन करण्याच्या विज्ञानाचा पाया रचणाऱ्या पतंजलींना नमस्कार करणे ओघानेच येते. पतंजलींनी व्याकरण महाभाष्य लिहिले नसते तर आजची संस्कृत भाषा सर्वांना उपलब्धच झाली नसती. अनेकांनी अनेक भाष्ये लिहिली पण पतंजलींचे भाष्य हे महाभाष्य ठरले. मुख्य म्हणजे दर्शनशास्त्राप्रमाणे वा इतर अद्वैत दर्शनाची चर्चा ही चर्चा न राहता प्रत्यक्ष प्रयोगाने तिचा अनुभव घेता यावा, असे पतंजलींनी प्रतिपादन केले. मन, चित्त या संबंधीचे अत्यंत शास्त्रोक्‍त, शुद्ध विचार सूक्ष्मपणे मांडून पतंजलींनी जणू काही सर्व भारतीय संस्कृतीचा पुनरुद्धार केला, असे म्हणायला हरकत नाही.

भगवान शंकरांनी पतंजलींना पदशास्त्रावर भाष्य लिहिण्याची आज्ञा दिली यावरूनच पतंजलींच्या कामातला वैज्ञानिक भाग (दृष्टिकोन) दिसून येतो. भगवान शंकर मनुष्यशरीरातील अति महत्त्वाची शक्‍तिसंकल्पना वा ग्रंथी आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये. शरीरातील मज्जासंस्था, शरीरातील चलनवलन व सर्व नाड्या यांवर शरीरातील शिवग्रंथीचा ताबा असतो. शरीराची प्राणवाहिनी व तिच्या सूक्ष्म वाहिन्या असलेली सर्किटरी (प्रवाह ज्या आकृतिबंधातून वाहतो) अशांची प्रत्यक्ष अनुभूती भगवान शंकरांनी पतंजलींना दिली आणि शरीराचा प्राणाधार असलेल्या श्‍वासावर आधारित नाद व नादाच्या माध्यमातून तयार झालेला शब्द आणि पद यांचे सर्वांना समजेल असे संपूर्ण विज्ञान लिहून काढण्याची आज्ञा केली. त्याच पदशास्त्राच्या जोरावर पुढे संपूर्ण मंत्रशास्त्र उभे राहू शकले. पतंजली महामुनींना प्रथम शारीरिक आरोग्य व सरतेशेवटी मोक्ष हे सर्वच महत्त्वाचे वाटत असल्यामुळे त्यांनी या सर्व विज्ञाननिष्ठ वाङ्मयाची निर्मिती केली. मानसशास्त्र या विषयात आजकाल सर्वत्र पाश्‍चिमात्य मानसशास्त्रज्ञांचाच अधिकार मानला जातो. परंतु, पातंजल योगसूत्रे हा मानसशास्त्राची प्रत्यक्षाबरोबर, प्रमाणाबरोबर व प्रयोगाबरोबर सांगड घालणारा आद्य ग्रंथ आहे.

प्रत्येकाला हवे असणारे सुख मनाच्याच माध्यमातून मिळते. निखळ आनंद व निखळ अनुभूती ज्या कारणांमुळे मिळू शकत नाही ते अडथळे म्हणजे चित्तावर अविरतपणे येणाऱ्या वृत्ती व त्या वृत्तींना ताब्यात आणण्यासाठी तयार केले योगशास्त्र. म्हणूनच या योगशास्त्राची आजपर्यंत उपासना होत राहिलेली दिसते. इतकेच नव्हे तर मनुष्यमात्रात भीती, रोग, व्यथा व मानसिक दुर्बलता वाढत गेली तसतसे योगशास्त्राचे पुन्हा उत्थान झालेले दिसते. महामुनी पतंजलींनी सांगितलेल्या योगशास्त्रात शरीरव्यापार, मेंदूचा त्यावर असलेला अधिकार, मेंदूचे चार विभाग आणि त्यांचा सर्व शरीराशी असलेला संबंध, तसेच, मनाचा या व्यवहाराशी असलेला सबंध आणि त्यामुळे उमटलेल्या वृत्ती कशा अडचणीच्या ठरतात, त्या वृत्तींचा निरोध केल्यानंतर मनुष्याला शांती व आनंद कसा मिळू शकेल या सर्वाचा शास्त्रोक्‍त विचार केलेला आहे. सांप्रतच्या काळात पातंजल महामुनींनी सांगितलेले योगशास्त्र मागे पडून नुसताच आसन, प्राणायामावर भर दिला जातो व त्यातही जणू पतंजलींचा अधिकार न मानता काहीतरी वेगवेगळी नावे देऊन, अमुक- तमुकयोग असे नाव देऊन त्याकडे करमणुकीचे व वेळ घालविण्याचे साधन म्हणून योग प्रचलित केला जात आहे. योगाने रोगनिवारण इथपर्यंत सर्व ठीक आहे. यम, नियम, सत्य अहिंसा या गोष्टींकडे यथावकाश लक्ष दिले तरी एक वेळ चालूू शकते. पण पतंजलींनी सांगितल्यानुसार आसन प्राणायामाचे महत्त्व का टिकवू नये?

चांगल्या शास्त्राचा विपर्यास होऊ नये या हेतूने शास्त्रे गुरुकडून शिकावीत, असे भारतीय परंपरेत म्हटले जाते. गुरुंचे महत्त्व वादातीत आहे. योगशास्त्रात सर्वांत श्रेष्ठ आहेत "शेषावतार पतंजलि महामुनी'. जोपर्यंत पतंजलींच्या चरणी त्यांच्या कार्याच्या चरणी, त्यांनी मानवतेवर केलेल्या उपकाराच्या आठवणीसाठी नतमस्तक होता येत नाही तोपर्यंत खरी योगविद्या मिळूच शकणार नाही. आषाढ शुद्ध पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा आहे. त्या निमित्ताने, नुसते जीवनाचे तत्त्वज्ञान न सांगता प्रात्यक्षिक दाखवून जीवन सुखी करणाचा मार्ग ज्या योगशास्त्राद्वारे दाखवला त्याचे जनक असलेल्या महामुनी पतंजली सद्‌गुरुंना नमस्कार करू या.

- डॉ. श्री बालाजी तांबे
www.ayu.de


SapSakal