Lagnagaath
वटी

(डॉ. श्री बालाजी तांबे)
औषध कल्पनेतील सर्वाधिक वापरात असणारी कल्पना म्हणजे "वटी' किंवा गोळी. गोळ्या घेणे सहज शक्‍य होते. त्या जवळ बाळगणे सोपे असते. तसेच, टिकण्याच्या दृष्टीनेही गोळ्या चूर्णापेक्षा अधिक चांगल्या असतात. .......
घटकद्रव्यांनुसार गोळीचा आकार, वजन तर बदलत असतेच पण ती बनविण्याची पद्धतही बदलत असते. गोळी बनविण्यासाठी द्रव्यांचे चूर्ण जितके बारीक, सूक्ष्म असले तितके चांगले असते अन्यथा गोळी बनविणे अवघड होते आणि शरीरात गेल्यावर औषधाचा पूर्णतः स्वीकारही होऊ शकत नाही. बऱ्याच गोळ्या तयार करताना मुख्य घटकद्रव्यांना विशिष्ट स्वरसाची वा काढ्याची भावना दिली जाते. यामुळे द्रव्ये अधिक सूक्ष्म होतात. भावनेसाठी वापरलेल्या द्रव्याचे गुण गोळीमध्ये येतात. शिवाय, गोळी बनविणेही सोपे जाते. गोळ्या करण्यासाठी ज्यामुळे गोळी बांधली जाईल असे एखादे द्रव्य लागते. यासाठी मध, गूळ, साखरेचा पाक, गुग्गुळ यासारखी स्निग्ध, चिकटपणा असणारी द्रव्ये वापरतात. गूळ, गुग्गुळासारखी द्रव्ये पाण्यासह उकळून पाक केला जातो व पाण्याला योग्य चिकटपणा आला की त्यात गोळीची मुख्य घटकद्रव्ये मिसळून, व्यवस्थित मळून गोळ्या तयार केल्या जातात. पाक करायचा नसला तर गूळ किसून घेऊन, गुग्गुळ कुटून घेऊन त्यात थोड्या थोड्या प्रमाणात गोळीची चूर्णे टाकत, मध्ये मध्ये थोडे तूप टाकत मिश्रण खलबत्त्यात खलून गोळी बनवता येते. या पद्धतीने गोळीचे मुख्य मिश्रण तयार झाले की आजकाल मशिनच्या साहाय्यानेही गोळ्या पाडता येतात.

गोळी बांधण्यासाठी घालण्यात येणारी द्रव्ये किती प्रमाणात घालायची, पाक किती प्रमाणात करायचा हे खरे कौशल्य असते. कारण, ती कमी पडली तर गोळी बांधता येत नाही, जास्त झाली वा पाक कडक झाला तर गोळी इतकी कडक बनते की पोटात गेल्यावरही विरघळू शकत नाही. नीट बांधली न गेलेली म्हणजेच ठिसूळ गोळी फार काळ गोळी या स्वरूपात राहात नाही. लांबच्या प्रवासानंतर वगैरे तर अशा गोळीचे चूर्ण झालेले दिसते. त्यामुळे तयार झालेल्या गोळीचा ठिसूळपणा व कडकपणा यंत्रांच्या साहाय्याने तपासणे गरजेचे असते. गोळीचे विरघळणे व गोळीचा ठिसूळपणा यांचा अंदाज घेण्यासाठी सर्वसाधारणपणे खालील दोन यंत्रे वापरली जातात.

टॅबलेट डिसइंट्रिग्रेशन मशिन - गोळी पोटात गेल्यावर किती वेळात विरघळते (फुटते) हे शोधण्यासाठी टॅबलेट डिसइंट्रिग्रेशन मशिन नावाचे एक यंत्र असते. यात काचेच्या परीक्षानळीपासून बनविलेल्या संचात गोळ्या टाकून, त्यात पाणी भरतात. यंत्र सुरू केल्यावर हा संच एका विशिष्ट गतीने खाली वर होत राहतो. त्यामुळे गोळी विरघळण्यास सुरुवात होते. किती वेळात विरघळते आहे यावरून ती योग्य प्रमाणात बांधली गेली आहे किंवा नाही हे कळते. शंखवटीसारखी मुख्यत्वे क्षारांपासून, लिंबाच्या रसाच्या भावना देऊन बनविलेली गोळी १३-१५ मिनिटात विरघळते. एखादी गोळी, विशेषतः गुग्गुळापासून बनविलेली गोळी फार घट्ट व कडक झाली असेल तर तिला विरघळायला तीन-चार तास लागू शकतात. अशी गोळी योग्य समजली जात नाही.

टॅबलेट फ्रायाबिलिटी मशिन - गोळी खूप ठिसूळ झाली आहे का योग्य तेवढी घट्ट झालेली आहे हे पाहण्यासाठी एक वेगळे यंत्र वापरले जाते. यात गोल डब्याप्रमाणे दिसणाऱ्या पारदर्शक रचनेमध्ये थोड्या गोळ्या ठेवायच्या असतात. ही रचना चाकाप्रमाणे उभी करून एका विशिष्ट वेगाने गोलाकार फिरवली जाते, अर्थातच आत असलेल्या गोळ्याही फिरू लागतात. यावरून गोळ्यांची ठिसूळता कळू शकते.

बहुतेक गोळ्या पाण्यासह घेतल्या जातात पण काही गोळ्या दुधासह, ताकासह किंवा अमुक एका काढ्यासह घ्यायच्या असतात. लहान मुलांना गोळ्या गिळता येत नसल्याने त्या पाण्यासह वा दुधासह उगाळून किंवा पुन्हा बारीक करून मधासह, दुधासह देता येतात.

आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये असंख्य गोळ्यांचे पाठ सांगितले आहेत. उदाहरणादाखल एक-दोन पाठ या ठिकाणी पाहू.

एलादि गुटिका
एलापत्रत्वचो।र्द्धाक्षाः पिप्पल्यर्द्धपलं तथा ।
सिताखर्जुरमृद्वीकाश्‍च पलोन्मिताः ।।
सञ्चूर्ण्य मधुना युक्‍ता गुटिकाः कारयेत्‌ भिषक्‌ ।
... भैषज्यरत्नावली

वेलची, तमालपत्र, दालचिनी ही तीन द्रव्ये प्रत्येकी सहा-सहा ग्रॅम; पिंपळी २४ ग्रॅम; खडीसाखर, खजूर, मनुका ही द्रव्ये प्रत्येकी ४८-४८ ग्रॅम घ्यावीत. खजूर व मनुका सोडून इतर सर्व द्रव्यांचे बारीक चूर्ण करून घ्यावे, खजुरातील बी काढून टाकावी. मनुका आणि खजूर पाटा-वरवंट्याच्या किंवा खलबत्त्याच्या साहाय्याने कुटून घ्यावे. इतर द्रव्यांचे चूर्ण त्यात मिसळून, आवश्‍यक तेवढा मध मिसळून नीट मळावे व गोळ्या करून ठेवाव्यात.

ही एलादि गुटी उलटी, खोकला, ताप, आवाज बसणे, चक्कर येणे वगैरे तक्रारींवर वापरतात. मुख्य म्हणजे ही गोळी चवीलाही छान असल्याने चघळूनही खाता येते.

लवंगादि वटी
तुल्यालवंत्वचः स्युः।
सर्वैः समो निगदितः खदिरस्य सारः ।।
बब्बुलवृक्षजकषाययुतञ्च चूर्णम ।
कासिान्नहन्ति गुटिका घटिका।ष्टकान्ते ।।
... वैद्यकजीवन

लवंग एक भाग, मिरी एक भाग, बेहडा एक भाग, खैराचे सार तीन भाग हे सर्व बारीक करून घ्यावे. बाभळीच्या सालीचा काढा तयार करावा. खलामध्ये चूर्ण घ्यावे. चूर्ण भिजेल एवढ्या प्रमाणात काढा टाकावा व घोटावे. काढा चूर्णामध्ये पूर्ण जिरला की चूर्ण काढून घेऊन सावलीमध्ये वाळवावे. ही एक भावना झाली. अशा एकूण तीन भावना देऊन २५० मिलीग्रॅमच्या गोळ्या करून ठेवाव्यात. ही गोळी तोंडात धरून चघळल्यास खोकला दूर होतो.

- डॉ. श्री बालाजी तांबे


SapSakal