अत्याचारित चिमुरडी भोगतेय नरकयातना मुरलीधर कराळे - सकाळ वृत्तसेवा नगर - एका युवकाने वयाच्या पाचव्या वर्षी तिच्यावर पाशवी बलात्कार केला... या
अत्याचारामुळे तिच्या आंतरेंद्रियांना जबर इजा झाली... दैव बलवत्तर म्हणून
रक्ताच्या थारोळ्यात पडलेली ही चिमुरडी वाचली... मात्र, गेली तीन वर्षे ती
नरकयातना भोगते आहे. या मुलीवर दोन शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे. घरच्या
फाटक्या संसारामुळे तिच्या पित्याला ते शक्य नाही.
देवगाव (ता. नगर) येथील या चिमुरडीच्या नशिबात पुन्हा आशेचे किरण खुलू शकतात;
परंतु सुमारे एक लाख रुपयांच्या शस्त्रक्रियेनंतर. आर्थिक मदत मिळाली तरच या
शस्त्रक्रिया होऊ शकतात. पैशांची जमवाजमव झाल्यानंतर पुण्यातील "रुबी हॉल'मध्ये
तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.
ऑगस्ट २००५ मध्ये देवगावमधील एका पडक्या वाड्यात गावातीलच २० वर्षांच्या एका
युवकाने या पाच वर्षे वयाच्या मुलीवर पाशवी बलात्कार केला. तो मुलगा सध्या
तुरुंगात आहे. मुलीचे वडील एका हाताने अपंग. आई मोलमजुरी करून कुटुंबातील सात
जणांच्या पोटांची खळगी भरते. कुटुंबाला मजुरीशिवाय पर्याय नाही. लहानसं घर. मीठ
आहे, तर मिरची नाही, अशी स्थिती. कोवळ्या मुलीवरील अत्याचारामुळे कुटुंब हतबल
झालेलं. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या चिमुरडीची अवस्था उपस्थितांना पाहवेना.
उपचारांसाठी पैसे नाहीत. अशा अवस्थेत गावातील काही जणांच्या मदतीने तिला
औषधोपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील उपचार नगरचे आनंदऋषीजी
हॉस्पिटल, पुण्यातील ससून रुग्णालय व नंतर रुबी हॉलमध्ये करण्याची वेळ आली.
बुऱ्हाणनगरचे केंद्रप्रमुख तुकाराम कातोरे, वर्गशिक्षक कासम शेख यांनी इतर
शिक्षकांकडून, गावातून तिला थोडी मदत मिळवून दिली. सध्याही तिच्यावर औषधोपचार सुरू
आहेत. मलमूत्र विसर्जनासाठी पोटाला छिद्र पाडून नलिका टाकण्यात आली आहे. त्या
नलिकेला प्लॅस्टिकची पिशवी लावली आहे.
असे असले, तरी ती मुलगी शाळेत जाते. सध्या ती जिल्हा परिषदेच्या शाळेत चौथीत
शिकते. तिसरीत तिला ९० टक्के गुण मिळाले. कधी थंडी-ताप येतो, कधी पोट दुखते. तिखट
खाता येत नाही. रडून रडून तिच्या डोळ्यांतील अश्रू कधीच आटले आहेत. धैर्याने
जगण्याचा मात्र तिचा प्रयत्न आहे. ""मला लई त्रास होतोय. कायम दुखतं; पण मी शाळा
शिकणार. मोठी होणार. कॉंप्युटर शिकणार,'' अशी दुर्दम्य इच्छा तिने "सकाळ'शी
बोलताना व्यक्त केली.
--------------------------------
दात्यांना आवाहन
गेल्या आठवड्यात या बालिकेला पुण्यातील "रुबी हॉल'मध्ये उपचारांसाठी नेण्यात आले
होते. तेथे डॉक्टरांनी दोन अवघड शस्त्रक्रिया करण्यास सांगितल्या. शस्त्रक्रिया
झाल्या नाहीत, तर जिवाला धोका होऊ शकतो. समाजाने हातभार लावला, तर तिचे जीवन
पुन्हा फुलू शकेल. मदत करण्याची इच्छा असणाऱ्यांनी "अकाउंट नंबर ०८५०२०६, ग्रॅंट
मेडिकल फाउंडेशन, रुबी हॉल क्लिनिक, पुणे' येथे निधी जमा करावा. धनादेशाद्वारेही
मदत देता येऊ शकेल. अधिक माहितीसाठी तिचे वर्गशिक्षक श्री. शेख (९८८१२२७८९६),
श्री. कातोरे (९८५०९३५३२१) यांच्याशी संपर्क साधता येऊ शकेल.
-------------------------------- |