धावांचा सुपरमॅन
सकाळ वृत्तसेवा
Saturday, November 21, 2009 AT 02:32 AM (IST)
सचिन बोलतो ते बॅटीनेच. तीस हजार धावांचा टप्पा ओलांडणाऱ्या सचिनची कामगिरी तर प्रेरणादायी आहेच; परंतु खेळाकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोनही महत्त्वाचा आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तीस हजार धावांची कामगिरी करून सचिन तेंडुलकरने आपल्या देदीप्यमान कारकिर्दीला आणखी एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. या खंडप्राय देशाला आणि जगातल्या तमाम क्रिकेटप्रेमींना अभिमान वाटावी अशी ही कर्तबगारी आहे.
आंतरराष्ट्रीय खेळपट्टीवर त्याची बॅट अशी काही चालली आहे, की त्याने आपल्या भात्यातील फटक्यांनी क्रिकेटरसिकांना भरभरून आनंद दिला. त्यामुळे त्याच्याबद्दल कुणी काही म्हटले, तरी चाहत्यांच्या मनःपटलावरून त्याचे स्थान कधी हटले नाही आणि तो "रनआऊट'ही होणार नाही. याचे कारण मैदानाबाहेरही त्याचे वर्तन सभ्य गृहस्थाच्या खेळाला अनुसरूनच असते. आपण फक्त क्रिकेटसाठीच जन्माला आलो आहोत, अशा भावनेतून तो खेळतो. क्रिकेट हेच आपले सर्वस्व आहे, ही त्याची धारणा आहे. त्यामुळेच वीस वर्षांच्या कारकीर्दीत त्याला उत्तरोत्तर चांगली कामगिरी करता आली. "वंडरबॉय' म्हणून तो आला आणि धावांचा "सुपरमॅन' अशी ख्याती त्याने प्राप्त केली.
कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने उभा केलेला तीस हजार धावांचा हिमालय अचंबित करणारा आहे. दोन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये शतकामागून शतके झळकावीत त्याने प्रत्येक टप्प्यावर कळस चढविणारी कामगिरी केली. सध्या सुरू असलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतील दुसऱ्या कसोटीत त्याने अहमदाबादच्या मैदानावर इतिहास लिहिला. या मैदानावर चारच दिवसांपूर्वी राहुल द्रविडने कसोटी कारकिर्दीतील अकरा हजार धावांचा टप्पा पार केला होता. हे मैदान भारतीय क्रिकेटपटूंसाठी संस्मरणीय ठरले आहे. या मैदानावरच कपिलदेव, सुनील गावसकर यांनी आपल्या कारकिर्दीतील महत्त्वाचे टप्पे गाठले होते.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत सचिनने पाच नोव्हेंबर रोजी हैदराबादच्या मैदानावर एकदिवसीय सामन्यांतील सतरा हजार धावा पूर्ण केल्या. पंधरा नोव्हेंबरला त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला वीस वर्षे पूर्ण झाली आणि वीस नोव्हेंबरला त्याने कसोटीतील तीस हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. त्यामुळे २००९मधील नोव्हेंबर महिना सचिन आणि त्याच्या चाहत्यांसाठी विशेष ठरला. हा अलौकिक खेळाडू स्वतःच एक विशेषण म्हणून उभा राहिला आहे. दैवी देणगीला कठोर परिश्रमाची जोड देऊन किती मोठे योगदान देता येते, हेच सचिनने दाखवून दिले आहे. तो "वंडरबॉय' होता, तेव्हा सर्वांचे "रोल माडेल' झाला; परंतु नंतर तो इतका पुढे गेला, की त्याच्यासारखे होणे कुणाच्याच आवाक्यात राहिले नाही. कोट्यवधी भारतीयांचा तो देव असला, तरी अधूनमधून त्याला मानवी भावभावनांचा प्रहार सहन करावाच लागला. त्याला मिळालेली फेरारी मोटार वादग्रस्त ठरली होती, तेव्हा बरीच टीका झाला; मात्र त्याचा परिणाम त्याच्या खेळावर, वागण्यावर, संस्कारांवर झाला नाही. त्याची विश्वासार्हता टिकून राहिली आणि ती पुढेही राहणार, यात शंका नाही. सचिनच्या खेळाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याने बहुतेक विक्रमी टप्पे संस्मरणीय खेळाने साजरे केलेत.
एकदिवसीय सामन्यांतील तो सतरा हजारांचा मनसबदार झाला, तेव्हा तो डाव १७५ धावांनी सजला होता, तर आंतरराष्ट्रीय तीस हजार धावांनाही त्याने शतकाचा साज दिला. कसोटीतील त्याचे हे ४३वे, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ८८वे शतक आहे. अबब... असे म्हणण्यासारखीच त्याची ही मुलुखगिरी आहे. भारतीय क्रिकेटला अनेक महान खेळाडूंची परंपरा आहे. स्वतंत्र भारताचे पहिले शतकवीर लाला अमरनाथ, परदेशात पहिले शतक झळकावणारे मुश्ताक अली यांच्यासह कर्नल सी. के. नायडू, विनू मांकड, विजय हजारे, सुनील गावसकर, गुंडाप्पा विश्वनाथ, कपिलदेव यांच्यामुळे या देशाचा क्रिकेट इतिहास नटलेला आहे. सचिन हा त्यातला नटराज आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. अलिकडच्या काळात जागतिक क्रिकेट ऍलन बोर्डर, ब्रायन लारा, स्टीव वॉ, रिकी पॉंटिंग या दिग्गजांनी गाजविले.
आकडेवारीच्या हिशेबात सचिनने त्यांना मागे टाकलेच; परंतु त्यात महत्त्वाचे राहिले ते त्याच्या कामगिरीतील सातत्य. त्यामुळेच तो इथपर्यंत मजल मारू शकलेला आहे. इतर खेळाडूंप्रमाणे त्यालाही दुखापतीने त्रस्त केले होते; परंतु त्यानंतरही त्याची बॅट कायमच धावांची बरसात करीत राहिली. मध्यंतरी त्याला "टेनिस एल्बो'ची दुखापत झाली होती. त्या वेळी अनेकांना असे वाटत होते, की सचिनची कारकीर्द संपुष्टात येणार; मात्र या जिद्दी फलंदाजाने मेहनतीच्या जोरावर त्यावर मात केली. त्याची एकाग्रता वाखाणण्याजोगी आहे. एकाग्रता ही काय चीज आहे, हे गावसकरने दाखवून दिले होते, तर मोठी मजल मारण्यात एकाग्रतेचा किती महत्त्वाचा वाटा असतो, हे सचिनने सिद्ध करून दाखविले आहे. भारतीय संघ जेव्हा अडचणीत असतो, तेव्हा सचिनची बॅट हमखास मदतीसाठी धावून येते, हे आजपर्यंत अनेकदा दिसलेले आहे. त्यामुळेच श्रीलंकेविरुद्ध पराभवाचा धोका असताना त्याने केलेले शतक बहुमोल आहे.
या चॅंपियनचा सर्वत्र कायमच सन्मान होतो. कानपूर येथे २४ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटीच्या वेळी त्याचा अनोख्या पद्धतीने गौरव केला जाणार आहे. सचिनला खिचडी फार आवडते, म्हणून तेथील पंचतारांकित हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी त्याच्यासाठी खास महाराष्ट्रीय पद्धतीची खिचडी बनविण्याचे ठरविले आहे. याद्वारे हे कर्मचारी त्याच्या कामगिरीला कुर्निसातच करतील. सचिनने हे प्रेम मिळविले आहे, ते धावांचा सुपरमॅन ठरल्यामुळे तर आहेच; परंतु मैदानाबाहेरील त्याचे साधे-संयमी व्यक्तिमत्त्वही त्याला कारणीभूत आहे. त्याची कारकीर्द सर्वच खेळाडूंसाठी प्रेरणादायी आहे.