Update:   IST       वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  लॉग-इन  |  Bookmark

कसोटी फक्त गोलंदाजांचीच असते?
सकाळ वृत्तसेवा
Monday, November 23, 2009 AT 12:00 AM (IST)
Tags: sports,   cricket,   anil kumble

गेल्या काही महिन्यांपासून कसोटी क्रिकेटच्या अस्तित्वाची खूपच चर्चा सुरू आहे. त्यातील रस कायम राखण्यासाठी स्पोर्टिंग खेळपट्ट्या आवश्‍यक आहेत. अहमदाबादच्या कसोटीत माफक रस निर्माण झाला, कारण भारताने पहिल्या दिवशी पहिल्या तासात चार विकेटस्‌ गमावल्या. अन्यथा, तिसऱ्या दिवसापर्यंत कसोटीतील रसच संपला असता. याच मैदानावर काही महिन्यांपूर्वी भारत-आफ्रिका कसोटी झाली होती, त्यावेळी जशी खेळपट्टी होती त्याच स्वरूपाची खेळपट्टी होती. फक्त त्यावेळी सामन्याचा निकाल लागला होता, कारण भारतीय डाव पहिल्या दिवशी दोन तासांत संपला होता. या वेळी राहुल द्रविडच्या भक्कम खेळीमुळे त्याची पुनरावृत्ती घडली नाही; पण कसोटीचा कंटाळवाणा अनिर्णीत शेवट झाला.

या प्रकारच्या खेळपट्ट्या का तयार होतात, हेच मला अजून उमजत नाही. सध्याचे युग वेगवान आहे, त्यांना झटपट निकाल हवा असतो. या परिस्थितीत या प्रकारच्या खेळपट्ट्या तयार केल्यास पाच दिवसांच्या खेळानंतरही निकाल लागणार नाही आणि त्यातील नजाकत संपेल आणि कसोटीच संपुष्टात येईल. एक सर्वांनी समजून घ्यायची वेळ आली आहे. या प्रकारच्या क्रिकेटमध्ये कौशल्याची कसोटी लागते. त्यात बॅट व चेंडूचा संघर्ष असतो, म्हणून यास कसोटी क्रिकेट संबोधले जाते. आता त्यातून गोलंदाजच काढून टाकलेत, तर कसोटी होणारच कशी?
आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंनी सर्व प्रकारच्या परिस्थितीत सर्वोत्तम खेळ करणे अपेक्षित असते, मग खेळपट्टी पाटाही का असो! एकदम मान्य; पण जेव्हा कसोटीत सर्वाधिक बळी घेतलेल्या मुथय्या मुरलीधरनचे चेंडूही पाचव्या दिवशी कोणतीही फिरक घेत नाहीत, त्यावेळी त्यातून काय अर्थ घ्यायचा. त्याचाच अर्थ खेळाची सूत्रे असलेल्या व्यक्ती सापत्न वागणूक देत आहेत. आता संबंधितांनी या प्रश्‍नात तातडीने लक्ष घालून कठोर उपाययोजना करण्याची गरज आहे.

सध्याचा ट्रेंड हा कसोटी पूर्ण पाच दिवस चालेल, यास महत्त्व देणारा आहे. मला याबाबत काहीही बोलायचे नाही किंवा माझा यास विरोधही नाही; पण त्यानंतरही कसोटीतील कामगिरी कायम आव्हानात्मक हवी. अन्यथा पाच दिवस खेळ व्हावा या उद्देशास काहीही अर्थ राहणार नाही. या परिस्थितीत कोणीही मैदानावर येणार नाही किंवा कोणीही टीव्हीवरून मॅचही बघणार नाही. जेव्हा चांगली खेळपट्टी असावी, असा आग्रह मी धरतो, त्याचा अर्थ चेंडूने पहिल्या दिवसापासून फिरक घ्यावी असा कधीही नसतो. सुरुवातीस चेंडू काहीसा वेगाने यावा तसेच काही उसळून यावा ही अपेक्षा आहे. अर्थातच त्यावेळी खेळपट्टी वेगवान तसेच फिरकी गोलंदाजांना सारखीच साथ देईल. अहमदाबादला खेळपट्टी खूपच स्लो होती. त्यामुळे समजा फटका चुकला तरी फलंदाजांना सावरून बॅकफूटवरून येऊन पुन्हा चेंडू फटकावता येत असे. प्रत्येक सत्रागणिक खेळपट्टी स्लो होत जाणे समजू शकते; पण सुरुवातीपासूनच खेळपट्टी स्लो असणे नक्कीच चांगले नाही.

आता या प्रकारची खेळपट्टी असते, त्यावेळी गोलंदाजीत शिस्तबद्ध असणे जास्त महत्त्वाचे असते. किंबहुना त्यांनी कमालीचे शिस्तबद्ध असणे तसेच माऱ्यात अचूकता राखणे आवश्‍यक असते. भारतीयांनी गोलंदाजी केली, त्यावेळी अमित मिश्रासारख्या गोलंदाजांना सामन्याचा सराव नव्हता हे स्पष्टपणे दिसून आले. खरे तर अमित मिश्रालाही ईशांत शर्माप्रमाणेच एकदिवसीय संघातून "रिलीज' करणे आवश्‍यक होते. त्याने एक जरी रणजी लढत खेळली असती तरी त्याचा त्याला फायदा झाला असता.

केवळ काही रणजी लढती खेळल्याचा राहुल द्रविडला बघा किती फायदा झाला. त्याने त्या प्रतिकूल परिस्थितीतही सुरेख फलंदाजी केली. अर्थात तो कालावधी गेल्यावर गोलंदाजांना फारशी संधीच नव्हती. त्यावेळी आव्हान होते ते दडपण असताना खेळण्याचे. त्यावेळी गोलंदाज किंवा खेळपट्टी काहीही करामत दाखवत नव्हते. अर्थातच या परिस्थितीत आंतरराष्ट्रीय स्तरावर फलंदाज नक्कीच फायदा घेणार. आता अर्थातच क्रिकेट पदाधिकाऱ्यांनी संबंधितांना कसोटी क्रिकेट आव्हानात्मक होईल, याकडे लक्ष द्यायला हवे. आव्हान केवळ गोलंदाजांनासमोरच असू नये. (हॉकआय कम्युनिकेशन्स)


आजचा सकाळ...
About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
Powered By: