Update: 
      वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  लॉग-इन  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font

डेक्कन इलेव्हन अ संघाला विजेतेपद
-
Monday, November 30, 2009 AT 12:00 AM (IST)

पुणे - फैझल रझाकने सुधीर पवारच्या पासवर पूर्वार्धात खेळाच्या सातव्या मिनिटास केलेल्या निर्णायक गोलमुळे डेक्कन इलेव्हन "अ'ने चेतक क्‍लब "अ'चा पराभव करून रुपी करंडक फुटबॉल स्पर्धेच्या प्रथम व अव्वल श्रेणी गटात विजेतेपद मिळविले. द्वितीय-तृतीय श्रेणी गटात एक्‍सट्रिम वॉरिअर्स, तर महिला गटात गो स्पोर्टस क्‍लब विजेते ठरले.

केशव माधव प्रतिष्ठान व के.पी. इलेव्हन क्‍लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेच्या अंतिम फेरीचे तीनही गटातील सामने रंगतदार झाले. प्रथम व अव्वल श्रेणी गटातील डेक्कन इलेव्हन व चेतक क्‍लब या सामन्यात खेळाच्या तिसऱ्याच मिनिटास चेंडूवर ताबा मिळविण्याच्या नादात डेक्कनच्या अभिजित शिंदेने चेंडू हाताळल्याने पंच संदील पिल्ले यांनी चेतकला पेनल्टी किक बहाल केली. या संधीचा फायदा त्यांना उठवता आला नाही. मनविंदरने मारलेली किक डेक्कनचा गोलरक्षक प्रतीक शहाने सुरेख अडवली.

त्यानंतर जोरदार आक्रमण करणाऱ्या डेक्कनच्या फैझल रझाकने सुधीर पवारच्या पासवर सातव्या मिनिटास केलेला गोल निर्णायक ठरला. खेळाच्या 52 व्या मिनिटास डेक्कनच्या समीर चव्हाणला पंचांना शिवीगाळ केल्याने लाल कार्ड दाखवून बाहेर काढले. त्यामुळे डेक्कनला अखेरची अठरा मिनिटे केवळ दहा खेळाडूंसह खेळावे लागले. चेतक संघाच्या मानवेंद्र मिश्रा, मंगेश शिंदे व गोलरक्षक आशिष चक्के यांचा खेळ चांगला झाला. विजेत्या डेक्कन इलेव्हन संघाला 55 हजार 555 रुपये व करंडक तर उपविजेत्या चेतक क्‍लबला 22 हजार 222 रुपयाचे पारितोषिक देण्यात आले.

द्वितीय-तृतीय श्रेणी गटात एक्‍सट्रिम वॉरिअर्स संघाने अशोका इलेव्हनचा टायब्रेकरमध्ये 5-3 असा पराभव केला. निर्धारित वेळेत सामना गोलशून्य बरोबरीत सुटला. टायब्रेकरमध्ये एक्‍सट्रिम वॉरिअर्सच्या मंगेश वीरमणी, नेव्हील वर्गीस, जेरी जॉर्ज, आनंद विनोद, व्हिन्सेंट लुके या पाचही जणांनी गोल केले. अशोका इलेव्हनकडून सचिन परदेशी वगळता श्‍यामल मोंडल, जशन जॉन या तिघांना गोल करण्यात यश आले. विजेत्या एक्‍सट्रिम वॉरिअर्सला 22 हजार 222 रुपये तर उपविजेत्या अशोका इलेव्हन संघास11 हजार 111 रुपयाचे पारितोषिक मिळाले.

महिला गटात गो स्पोर्टस क्‍लबने वाडिया इलेव्हनचा चार गोलने पराभव केला. एकतर्फी झालेल्या या सामन्यात दीपिका मासुरकरने सातव्या मिनिटास गोल करून संघाचे खाते उघडले. दहाव्या मिनिटास मोरालिन ऍडमने दुसरा, तर सिबा फकीने तिसाव्या मिनिटास तिसरा गोल नोंदवून पूर्वार्धातच संघाची बाजू भक्कम केली. उत्तरार्धात 38 व्या मिनिटास अकिला पॉलने चौथा गोल केला. विजेत्या संघाला 11 हजार 111 रुपये तर उपविजेत्या संघाला 5 हजार 555 रुपयाचे बक्षीस देण्यात आले.

या स्पर्धेत प्रथम व अव्वल श्रेणी गटात स्पर्धेतील "सर्वोत्तम खेळाडू'चे पारितोषिक वासिमखान (डेक्कन इलेव्हन) याने मिळविले. "उत्कृष्ट गोलरक्षक' म्हणून आशिष चक्कने (चेतक क्‍लब) याची निवड करण्यात आली. याशिवाय द्वितीय-तृतीय श्रेणी गटात विष्णू तमंग (सांगवी क्‍लब) व सुरेश बहादूर (डेक्‍ट्रॉईट्‌स), तर महिला गटात सालवी गुजर (विद्याभवन) व पूजा घोरपडे (वाडिया इलेव्हन) यांनी वैयक्तिक पारितोषिक मिळविले.

या स्पर्धेचा बक्षीस समारंभ गृह (शहर), अन्न, औषध प्रशासक विभागाचे राज्यमंत्री रमेश बागवे यांच्या हस्ते झाला. या वेळी पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष विश्‍वजित कदम, रुपी बॅंकेचे प्रवीण चोरबले, नितीन कोतवाल, सुभाष जेऊर नगरसेवक अविनाश बागवे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक प्यारेलाल परदेशी यांनी केले, तर आभार प्रदीप परदेशी यांनी मानले.


आजचा सकाळ...
About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
Powered By: