Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

साईनाला मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत अनुकूल "ड्रॉ'
वृत्तसंस्था
Wednesday, December 02, 2009 AT 12:00 AM (IST)

जोहर बाहरू (मलेशिया) - भारताची अव्वल बॅडमिंटनपटू साईना नेहवाल हिला उद्यापासून (ता. 2) सुरू होत असलेल्या प्रतिष्ठेच्या वर्ल्ड सुपर सीरिज मास्टर्स फायनल्स बॅडमिंटन स्पर्धेसाठी अनुकूल ड्रॉ मिळाला असून, तिची साखळीतील पहिली लढत मलेशियाच्या वॉंग म्यू चू हिच्याशी होईल. गेल्या वर्षी याच स्पर्धेत साईना आणि वॉंग आमनेसामने आल्या होत्या. त्या साखळी सामन्यात वॉंगवर मात करीत साईनाने उपांत्य फेरी गाठली होती.

जागतिक क्रमवारीत साईना आठव्या क्रमांकावर आहे. या स्पर्धेच्या महिला एकेरीत सहभागी झालेल्या खेळाडूंमध्ये साईना क्रमवारीतील सर्वांत वरच्या क्रमांकाची खेळाडू आहे. आघाडीच्या काही खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे साईनाला स्पर्धेत विजेतेपद मिळविण्याची नामी संधी आहे. महिला एकेरीत आठ खेळाडूंची "अ' आणि "ब' अशा दोन गटांत विभागणी करण्यात आली असून, साईनाचा "अ' गटात समावेश आहे. याशिवाय या गटात मलेशियाची वॉंग म्यू चू, थायलंडची पोर्नटीप बुराणाप्रासरत्सुक आणि कॅनडाची रीड चार्मेन यांचा समावेश आहे. वॉंग क्रमवारीत 20 व्या, पोर्नटीप 37 व्या, चार्मेन 55 व्या क्रमांकावर आहे. हे पाहता साईनाने लौकिकाला साजेसा खेळ केल्यास तिचा उपांत्य फेरीतील प्रवेश निश्‍चित असेल. त्या तुलनेत "ब' गटातून उपांत्य फेरी गाठण्यासाठी जास्त चुरस असणार आहे. या गटात ज्युलियन शेंक, निकोल ग्रेथर (जर्मनी), जिए याओ (हॉलंड) आणि पोन्साना सालाक्‍जीत (थायलंड) यांचा समावेश आहे. क्रमवारीत शेंक नवव्या, जिए तेराव्या, पोन्साना चौदाव्या, तर ग्रेथर अडतिसाव्या क्रमांकावर आहे.

या स्पर्धेतील मिश्र दुहेरीत व्ही. दीजू आणि ज्वाला गुट्टा ही भारतीय जोडीही कौशल्य पणाला लावणार असून, त्यांचा "ब' गटात समावेश करण्यात आला आहे. दीजू-ज्वाला यांची सलामीला अँथनी क्‍लार्क आणि डोना केलॉक (इंग्लंड) यांच्याशी गाठ पडणार आहे.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: