वेगळ्या तेलंगणासाठी आंध्रात हिंसाचार सुरूच
सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, December 07, 2009 AT 12:00 AM (IST)
हैदराबाद - वेगळ्या तेलंगण राज्याच्या मागणीसाठी तेलंगण राष्ट्र समितीने (टीआरएस) पुकारलेल्या दोन दिवसांच्या तेलंगण "बंद'दरम्यान आंध्र प्रदेशात रविवारी मोठ्या प्रमाणात हिंसक घटना घडल्या. "टीआरएस'च्या कार्यकर्त्यांनी चित्रपटगृह, मॉल्स, मल्टिप्लेक्सची मोडतोड केली. तेलंगण क्षेत्रात हिंसाचाराच्या घटना, सार्वजनिक मालमत्तेची जाळपोळ, आत्महत्यांचा प्रयत्न आदी प्रकार सुरूच आहेत.
मेडक आणि वारंगळ जिल्ह्यात राज्य परिवहन मंडळाच्या शंभर बसगाड्यांची नासधूस करण्यात आली. त्यानंतर सरकारने या भागातील बससेवा तातडीने बंद करण्याचा निर्णय घेतला. हैदराबाद शहरात खबरदारीचा उपाय म्हणून परिवहन सेवा बंद ठेवण्यात आली. तेलंगण प्रदेशातील सहा जिल्ह्यांत आंदोलनकर्त्यांनी काही बसगाड्यांवर आंध्र प्रदेश खोडून "तेलंगण' असे रंगविण्यात आले. शहरातील काही बॅंकांच्या "एटीएम' केंद्रांना आंदोलकांनी लक्ष्य केले. दिलसुखनगर भागात एका हॉटेलची जाळपोळ करण्यात आली. करीमनगर जिल्ह्यात "भाग्यनगर एक्स्प्रेस' रेल्वे रोखून धरण्यात आली. वारंगळ जिल्ह्यात एका आंदोलक विद्यार्थ्याने पाण्याच्या टाकीवरून उडी मारून आत्महत्या केली.
दुसरीकडे "टीआरएस'चे प्रमुख के. चंद्रशेखर राव यांनी आपले बेमुदत उपोषण सुरूच ठेवले आहे. मुख्यमंत्री के. रोसय्या यांनी उपोषणाची सांगता करून तसेच हिंसाचार थांबवून चर्चा करण्याचे दिलेले निमंत्रण त्यांनी फेटाळून लावले आहे. तेलंगणा क्षेत्रातील अनेक कॉंग्रेस नेत्यांनी चंद्रशेखर यांची "निम्स' रुग्णालयात भेट घेऊन त्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र, कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी तेलंगणच्या मुद्द्यावर ठोस आश्वासन देत नाहीत, तसेच त्यासंबंधीचे विधेयक संसदेत सादर केले जात नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याच्या भूमिकेचा त्यांनी पुनरुच्चार केला.