हे तर कष्टाला आलेले फळ!
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, December 08, 2009 AT 12:00 AM (IST)
नंबर वन, अव्वल बनणे ही फार छान कामगिरी आहे. हा सर्वोच्च प्रतिष्ठेचा क्रमांक भारतीय संघाने पटकावल्यामुळे मला फार आनंद झाला आहे. याबद्दल संपूर्ण संघाला श्रेय द्यावे लागेल. सुमारे दोन वर्षांपूर्वी आम्ही या घडीसाठी नियोजन केले होते. त्यामुळे आता ही ध्येयपूर्ती झाल्याबद्दल सर्वांनाच किती आनंद झाला असेल, याची कल्पना येईल.
तेव्हा वर्षा-दीड वर्षाच्या काळात मायदेशात किंवा परदेशात जवळपास प्रत्येक संघाविरुद्ध आपल्याला खेळायला मिळेल, याची आम्हाला कल्पना होती. त्यामुळेच आम्ही एकत्र येऊन अव्वल क्रमांक पटकावण्यासाठी योजनाबद्ध प्रयत्न करण्याचा संकल्प सोडला. वेस्ट इंडीज आणि बांगलादेश यांचा अपवाद सोडल्यास आम्ही सर्व संघांविरुद्ध खेळणार होतो.
पाकिस्तानविरुद्ध पाकमध्ये मालिका होणार होती. तो दौरा होऊ शकला नाही, पण 2007 मध्ये मायदेशात पाकिस्तानलाच हरवून आम्ही "नंबर वन'च्या दिशेने वाटचाल सुरू केली.
संघाचे ध्येय साधेसोपे होते. तेव्हा आम्ही क्रमवारीत पाचच्या आसपास होतो. "आता यानंतरची प्रत्येक मालिका जिंकायची. अव्वल बनण्याचा हाच एक मार्ग आहे. संघाची आगेकूच होण्यास अनेकांनी हातभार लावला. काही जणांच्या विलक्षण वैयक्तिक कामगिरीमुळे लक्ष्य साध्य करणे सुकर झाले. अर्थात ही वाटचाल सोपी अजिबात नव्हती. अनेकदा संघाला दडपणाच्या स्थितीतून मार्ग काढावा लागला. काही वेळा झगडून कसोटी अनिर्णित राखावी लागली, तर काही सामन्यांत संघर्षपूर्ण खेळ करून विजय खेचून आणावा लागला.
न्यूझीलंडविरुद्ध नेपियर कसोटीत गौतम गंभीरने सुमारे दोन दिवस किल्ला लढविला. चेन्नईत इंग्लंडविरुद्ध वीरेंद्र सेहवागने झंझावाती सुरवात केली आणि त्याच कसोटीत सचिन तेंडुलकर आणि युवराजसिंग यांनीही चमकदार खेळ केला. राहुल द्रविड, सौरभ गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी अनेकदा डाव सावरला. संघाने झुंजार खेळ केल्याची ही ठळक उदाहरणे आहेत.
आम्ही सर्वांनी सांघिक खेळ केला. काही वेळा फलंदाजांनी गोलंदाजीत योगदान दिले, तर गोलंदाजांनी उपयुक्त धावा फटकावल्या. सलामीची भागीदारी हासुद्धा यशातील महत्त्वाचा घटक असतो आणि त्या आघाडीवर "वीरू' आणि गंभीर यांनी बुलंद सलामी दिली. तीन आणि चार नंबरच्या फलंदाजांना लवकर खेळणे भाग पडले नाही तर चांगल्या सलामीच्या जोरावर वर्चस्व मिळविता येते. गोलंदाजीत झहीर खान याचा मारा मोलाचा ठरला. मी कर्णधार असताना त्याला बहुतांश काळ दुखापतीमुळे खेळता आले नव्हते.
संघासाठी सातत्य राखणे आवश्यक होते. हे सातत्य केवळ मैदानावर असून चालत नसते. धोरणातही सातत्य लागते. येथेच नेतृत्व निर्णायक ठरले. महेंद्रसिंह धोनी कर्णधार झाल्यानंतर संघाने यशोमालिका उंचावत नेली. निर्णयप्रक्रियेत सातत्य आणि विचारांमध्ये स्पष्टता असल्यास अगदी नाणेफेकीसारख्या बाबतीतही नशिबाची साथ मिळू लागते. यष्टिरक्षण आणि फलंदाजीतील धोनीचे योगदान कौतुकास्पद आहे. अवघड झेल घेण्यात आलेले यशसुद्धा महत्त्वाचे ठरले.
संघाच्या "सपोर्ट स्टाफ'लासुद्धा शाबासकी द्यावी लागेल. यातील वेंकटेश प्रसाद आणि रॉबिनसिंग यांना काढण्यात आले असले तरी त्या दोघांनीही हातभार लावला. गॅरी कर्स्टन आणि पॅडी अप्टॉन यांच्या कल्पनांचा संघाने चांगला अवलंब केला आहे. अलीकडच्या काळात राखीव खेळाडूंची फळीसुद्धा भक्कम बनली आहे. कसोटी खेळण्यापूर्वी बहुतेक खेळाडूंना अनेक वन-डे सामन्यांचा अनुभव मिळाला होता. त्यामुळे दडपणाच्या स्थितीला सामोरे जाण्याची सवय त्यांना होती.
आता भविष्याचा विचार केल्यास हा संघ अव्वल स्थान नक्कीच राखू शकेल, असा विश्वास मला वाटतो. काही वेळा इतर संघ भारताला मागे टाकतील, याचे कारण प्रत्येक संघाचे कसोटी खेळण्याचे प्रमाण कमी-जास्त आहे. असे असले तरी प्रत्येक कसोटी आणि मालिका जिंकण्यावर लक्ष केंद्रित करण्याची कल्पना उत्तम आहे. मुख्य म्हणजे फार पुढचा विचार करण्याची काहीही गरज नाही. ही कामगिरी एखादी "फायनल' जिंकून झालेली नाही, तर अव्वल स्थान पटकावण्यासाठी एक प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. ती सफल होण्यासाठी मेहनत करण्यात आली आणि हे कष्टाला मिळालेले फळ आहे. त्यामुळे हा क्षण आहे तो जल्लोषाचा!
(हॉकआय कम्युनिकेशन्स)