तेलंगणबाबत विधेयक मांडण्याची सूचना
सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, December 08, 2009 AT 12:00 AM (IST)
हैदराबाद - वेगळ्या तेलंगण राज्य मागणीसंदर्भात मते जाणून घेण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारने आज सर्व राजकीय पक्षांची एकत्रित बैठक बोलावली. दरम्यान, राज्य विधानसभेत वेगळ्या तेलंगण राज्यासंदर्भात एक विधेयक मांडण्याबाबत कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींनी मुख्यमंत्री के. रोसय्या यांना सूचना केल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
सरकारने बोलाविलेल्या बैठकीत तेलंगणबाबत मुख्यमंत्र्यांनी ठोस भूमिका घ्यावी, असे मत व्यक्त करण्यात आले. तेलगू देसम पक्षाचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांच्यासह कॉंग्रेसच्या काही मंत्र्यांनी तेलंगण राष्ट्र समितीचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव यांची रुग्णालयात भेट घेऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. दरम्यान, उस्मानिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचा खासदार आणि अभिनेत्री मेडाक विजयालक्ष्मी यांनी निषेध केला. त्यांनी उस्मानिया विद्यापीठात जाऊन विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला; तसेच "प्रजाराज्यम' पक्षाचे अध्यक्ष आणि अभिनेते चिरंजीवी यांनी सरकारने तेलंगणबाबत जनतेच्या भावना जाणून घेत त्याचा आदर राखायला हवा, असे मत नोंदविले.