सोळा षटकांत दोनशे दिल्यावर काय होणार?
सकाळ वृत्तसेवा
Thursday, December 10, 2009 AT 02:07 PM (IST)
नागपूर - श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या ट्वेंटी-२० लढतीतील भारताविरुद्धच्या पराभवाकरिता महेंद्रसिंह धोनीने गोलंदाजांनाच जबाबदार धरले. चांगली सुरुवात केल्यावर आम्ही खूपच जास्त धावा दिल्या. त्याचबरोबर आम्ही फटकावलेले चेंडू क्षेत्ररक्षकांच्या हाती गेले, अशी खंत भारतीय कर्णधाराने व्यक्त केली. दरम्यान, दुसरा टी-२० सामना उद्या मोहाली येथे होईल.
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या ट्वेंटी-२० लढतीत भारतास २९ धावांनी हार पत्करावी लागली. ""आम्ही चांगली सुरुवात केली होती. पहिल्या चार षटकात सोळा ते अठराच धावा दिल्या होत्या; पण त्यानंतर दोनशेच्या आसपास धावा दिल्या. त्याचा फटका आम्हाला बसला,'' असे सांगतानाच धोनीने श्रीलंकेने या लढतीत भारतावर पूर्णपणे हुकमत गाजवली हे मान्य केले.
तो म्हणाला, ""संगकाराने चमकदार खेळी केली. अखेरपर्यंत मैदानात राहत त्याने धावसंख्येस आकार दिला. त्यातच आम्ही काही झेलही सोडले. अर्थातच आम्हाला नक्कीच चांगली कामगिरी करता आली असती. आम्ही त्यांना १९० च्या आसपास रोखले असते तर नक्कीच वेगळे चित्र दिसले असते.''
काही क्रिकेटतज्ज्ञ या पराभवाकरिता मधल्या अपयशी फळीस जबाबदार धरत आहेत. मात्र धोनीला हे पूर्ण मान्य नाही. ""मधली फळी अपयशी ठरली हे मान्य; पण तुम्ही जर सामना नीट पाहिला असेल तर आवश्यक धावगती सातत्याने उंचावत होती. या परिस्थितीत फटकेबाजीशिवाय पर्यायच नव्हता. आम्ही फटकावलेले चेंडू क्षेत्ररक्षकांच्या हातात गेले. मी आणि युवराज याच प्रकारे बाद झालो,'' असे भारतीय कर्णधाराने सांगितले.
""सामन्याची सर्व षटके खेळपट्टी फलंदाजीस अनुकूल राहतील याची आम्हाला खात्री होती. या परिस्थितीत गोलंदाजांवर दडपण आणण्यास आम्ही तयार नव्हतो. ट्वेंटी-२० मध्ये काही षटकात चित्र बदलते. बारा-तेरा षटकांनंतर फलंदाज अधिक आक्रमक होतात. या अखेरच्या षटकात भारतीय गोलंदाजांची कामगिरी चांगली झालेली नाही,'' असे तो म्हणाला.
भारत-श्रीलंका मालिका दुसरी टी-२० लढत
ठिकाण ः पीसीए स्टेडियम, मोहाली
थेट प्रक्षेपण ः संध्याकाळी ५.३० पासून निओ क्रिकेट