केंद्राची मान्यता केवळ तेलंगणासाठीच : कॉंग्रेस
सकाळ वृत्तसेवा
Friday, December 11, 2009 AT 12:00 AM (IST)
नवी दिल्ली - वेगळ्या तेलंगण राज्याला केंद्र सरकारने दिलेल्या होकारामुळे विदर्भासह बुंदेलखंड, गोरखालॅंड या लहान राज्यांच्या निर्मितीची मागणी पुढे आली आहे. मात्र, तेलंगणसंदर्भातील झालेल्या निर्णयाचा इतर मागण्यांचा संबंध नाही,'' अशा शब्दांत कॉंग्रेसने इतर नव्या राज्यांबाबत होणारी मागणी फेटाळली आहे. यामुळे स्वतंत्र विदर्भाची मागणी करणाऱ्या महाराष्ट्रातील कॉंग्रेस नेत्यांना पक्षनेतृत्वाने स्पष्ट इशारा दिला आहे.
स्वतंत्र विदर्भाच्या मागणीचे समर्थक असलेले कॉंग्रेस खासदार दत्ता मेघे यांनी तेलंगणपाठोपाठ विदर्भाचा प्रश्न सोडविला जावा, अशी मागणी पुढे केली आहे. भाजपने यापूर्वीच वेगळ्या विदर्भासह गोरखालॅंड, बुंदेलखंड या राज्यांच्या मागणीस पाठिंबा दर्शविला आहे. त्यामुळे तेलंगणानंतर कॉंग्रेसची भूमिका काय असेल, याकडे लक्ष लागले आहे. मात्र, तेलंगणाव्यतिरिक्त इतर राज्यांच्या निर्मितीबाबत कॉंग्रेसने साफ नकार दिला आहे. याबाबत पक्षप्रवक्ते अभिषेक सिंघवी म्हणाले, ""कालचा (केंद्र सरकारचा) निर्णय केवळ तेलंगणापुरताच मर्यादित असून, इतर प्रदेशांशी त्याचा संबंध नाही. प्रत्येक प्रदेशाचे प्रश्न वेगळे आहेत. ते याच्याशी जोडले जाऊ नयेत. या निर्णयाचा प्रभाव इतर मागण्यांवर पडणार नाही''.
महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षांपासून वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी होत आहे. यासाठी विदर्भाच्या मागासलेपणाचे दाखलेही दिले जात आहेत; तर त्यावर तोडगा काढण्यासाठी या भागाचा अनुशेष भरून काढण्यासाठी स्वतंत्र वैधानिक विकास महामंडळ नेमण्यात आले आहे. भाजपने स्वतंत्र विदर्भाच्या मागणीस पाठिंबा दिला असला, तरी या पक्षाची युती असलेल्या शिवसेनेचा महाराष्ट्राच्या विभाजनास ठाम विरोध आहे.