महाराष्ट्राचा लचका तोडू देणार नाही - उद्धव ठाकरे
सकाळ वृत्तसेवा
Saturday, December 12, 2009 AT 12:15 AM (IST)
मुंबई - आंध्र प्रदेशचे विभाजन करून 'तेलंगणा' हे स्वतंत्र राज्य निर्माण होणार असले, तरी कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्राचा लचका तोडू देणार नाही, अशी सडेतोड भूमिका शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे.
आंध्र प्रदेशचा तुकडा पाडून तेलंगणा राज्यनिर्मितीची घोषणा होताच "स्वतंत्र विदर्भा'च्या मागणीची चर्चा सुरू झाली आहे. त्याचा समाचार घेताना उद्धव ठाकरे म्हणाले, की तेलंगणा झाले म्हणून कोणी महाराष्ट्राचा लचका तोडण्याचे स्वप्न पाहत असतील, तर त्यांनी कायम स्वप्नातच राहावे. शिवसेना आहे तोपर्यंत महाराष्ट्राचा लचका कुणालाही तोडता येणार नाही. संयुक्त महाराष्ट्र हेच मराठी जनतेचे स्वप्न आहे व त्यात विदर्भासह महाराष्ट्रातील सर्व भागातील जनताही सामील आहे; पण तो संयुक्त महाराष्ट्रही आपल्याला पूर्णपणे कुठे मिळाला, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
बेळगाव-कारवारसह सीमा भागातील मराठी जनता आजही कर्नाटकात "कानडी' सरकारचा अत्याचार सहन करीत आहे. कानडीची सक्ती तिथे सुरू आहे. ज्यांनी आज "तेलंगणा' दिले त्यांचीच सरकारे कर्नाटक व केंद्रात असताना त्यांना आमच्या मराठी सीमाबांधवांवरील अन्याय दूर करता आला नाही. त्यामुळे तेलंगणावरील अन्याय दूर करणाऱ्यांनो, बेळगाव-कारवारसह सीमा भाग महाराष्ट्रात टाका व संयुक्त महाराष्ट्रावरील अन्याय दूर करा, अशी मागणीही उद्धव यांनी केली.
महाराष्ट्रातील सर्व भागांत विकासाचा समतोल राखणे आवश्यक आहे. सर्वच प्रांतांचा विकास संयुक्त महाराष्ट्र म्हणून झाला, तरच 105 हुतात्म्यांचे बलिदान सार्थकी लागेल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.