खासदाराच्या भावाने पाक क्रिकेटपटूंना हिणविले
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, December 15, 2009 AT 11:45 PM (IST)
कराची - नेपियर कसोटीदरम्यान न्यूझीलंडमधील एका खासदाराच्या भावाने पाकिस्तानी क्रिकेटपटूंना 'दहशतवादी' म्हणून हिणविल्याची खळबळजनक घटना घडली. मॅक्लिन पार्कवर कसोटीच्या पाचव्या दिवशी हा प्रकार घडला.
या प्रकरणी पाकिस्तानी क्रिकेट मंडळ "आयसीसी'कडे तक्रार दाखल करणार आहे. संघव्यवस्थापनाकडून माहिती मिळाल्यानंतर तक्रार केली जाईल, असे मंडळाचे अध्यक्ष इजाझ बट्ट यांनी सांगितले. नेपियरचे खासदार ख्रिस ट्रेमैन यांचा भाऊ मार्क त्याच्या 17 मित्रांसह कसोटी पाहण्यासाठी आला होता. ही मंडळी "कॉर्पोरेट बॉक्स'मध्ये बसली होती. त्यांनी तेथूनच "पाकिस्तानी टेररिस्ट्स' अशा घोषणा दिल्या. अखेर मैदानावरील इलेक्ट्रॉनिक स्क्रीनवर "वर्णभेदी वक्तव्य करू नये,' असा संदेश झळकला. पाकिस्तानी संघाचे व्यवस्थापक अब्दुल रकीब यांनी मात्र त्यांना किंवा कोणत्याही खेळाडूला अपशब्द ऐकू आले नसल्याचे स्पष्ट केले. मात्र या प्रकारानंतर 38 वर्षांचा मार्क आणि त्याच्या मित्रांना मद्य पुरविण्यात आले नाही. मार्क हा नामवंत रग्बीपटू केल ट्रेमैन यांचा मुलगा आहे. "ट्रेमैन रिअल इस्टेट' या कंपनीसाठी त्याने "कॉर्पोरेट बॉक्स' घेतला होता. बिल स्टॅसी या प्रेक्षकांना मार्क आणि कंपनीचे कृत्य खेदजनक असल्याचे वक्तव्य केले. स्वतः ट्रेमैन यांनी घडला प्रकार समर्थनीय नसल्याचे सांगितले.
कसोटी अनिर्णित
दरम्यान, पावसाच्या व्यत्ययामुळे ही कसोटी अनिर्णित राहिली. मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली.
संक्षिप्त धावफलक
पाकिस्तान - 223 व 455
न्यूझीलंड - 471 व बिनबाद 90