ख्रिस गेलचे झंझावाती शतक
सकाळ वृत्तसेवा
Friday, December 18, 2009 AT 12:15 AM (IST)
पर्थ - कर्णधार ख्रिस गेलच्या झंझावाती शतकाच्या जोरावर वेस्ट इंडीजने तिसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला चोख प्रत्युत्तर देत दमदार सुरवात केली. आज दुसऱ्या दिवसअखेर त्यांच्या 2 बाद 214 धावा झाल्या होत्या. खेळ थांबला तेव्हा रामनरेश सरवान 42, तर नरसिंह देवनारायण दहा धावांवर खेळत होता.
गेलने सलग दुसऱ्या कसोटीत शतक झळकावले आहे. मालिकेतील दुसऱ्या कसोटीत त्याने त्याने नाबाद 165 धावा केल्या होत्या.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने आपला पहिला डाव 7 बाद 520 धावांवर घोषित केला होता. त्याला उत्तर देताना ख्रिस गेल आणि ट्रॅव्हिस डाऊलीन यांनी शतकी सलामी दिली. त्यांनी आक्रमक खेळ करीत 145 चेंडूंत 136 धावांची सलामी दिली. गेलने कारकिर्दीतील बारावे शतक झळकाविले. त्याने 72 चेंडूंत नऊ चौकार आणि सहा षटकारांसह 102 धावा केल्या, तर संयमी खेळ करणाऱ्या डाऊलीनने 116 चेंडूंत नऊ चौकारांसह 55 धावा केल्या. गेल आणि डाऊलीन हे दोघे बाद झाल्यावर रामनरेश सरवान आणि नरसिंह देवनारायण यांनी दिवसअखेर वेस्ट इंडीजला दोनशे धावांचा टप्पा पार करून दिला.
ऑस्ट्रेलियाने काल पहिल्या दिवसअखेर 3 बाद 339 धावा केल्या होत्या. त्या वेळी मायकेल हसी 81, तर मार्कस नॉर्थ 23 धावांवर खेळत होता. हसी आज केवळ एका धावेची भर घालून परतला. त्यानंतर नॉर्थ आणि ब्रॅड हॅडीन यांनी आक्रमक खेळ केला. त्यांनी 101 चेंडूंत 89 धावांची भागीदारी केली. अर्धशतकी खेळी करून नॉर्थ बाद झाला. त्यानंतर हॅडीनने मिशेल जॉन्सनच्या साथीत ऑस्ट्रेलियाला पाचशे धावांचा टप्पा पार करून दिला. केमार रोचने हॅडीनला बाद केले. त्याचे शतक अवघ्या बारा धावांनी हुकले. त्याने 91 चेंडूंत अकरा चौकार आणि दोन षटकारांसह 88 धावा केल्या. हॅडीनपाठोपाठ जॉन्सनही बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाने डाव घोषित केला. त्या वेळी एकही शतक न होता 520 धावांचा टप्पा गाठणारा ऑस्ट्रेलिया दुसराच संघ ठरला. ऑस्ट्रेलियाकडून पाच जणांनी अर्धशतकी खेळी केली. यापूर्वी भारताने न्यूझीलंडविरुद्ध 524 धावा केल्या होत्या. त्यात एकाही शतकाचा समावेश नव्हता. त्यात सहा अर्धशतके झाली होती.
संक्षिप्त धावफलक - ऑस्ट्रेलिया - पहिला डाव - 130.4 षटकांत 7 बाद 520 घोषित (सायमन कॅटीच 99, शेन वॉटसन 89, ब्रॅड हॅडीन 88, मायकेल हसी 82, मार्कस नॉर्थ 68, मिशेल जॉन्सन 35, नरसिंह देवनारायण 2-74, केमार रोच 2-104) विरुद्ध वेस्ट इंडीज - पहिला डाव - 46 षटकांत 2 बाद 214 (ख्रिस गेल 102, ट्रॅव्हिस डाऊलीन 55, रामनरेश सरवान खेळत आहे 42, देवनारायण खेळत आहे 10, डग बॉलिंजर 1-41, मिशेल जॉन्सन 1-68)
पाचवे वेगवान शतक
कसोटी क्रिकेट इतिहासात ख्रिस गेलचे पाचव्या क्रमांकाचे वेगवान शतक ठरले. त्याने अवघ्या 70 चेंडूंत शतक झळकाविले. कसोटीमध्ये सर्वांत वेगवान शतक ठोकण्याचा विक्रम वेस्ट इंडीजचे सर व्हिव्हियन रिचर्डस यांच्या नावावर आहे. त्यांनी इंग्लंडविरुद्ध अवघ्या 56 चेंडूंत शतक ठोकले होते. त्यापाठोपाठ ऑस्ट्रेलियाचा ऍडम गिलख्रिस्ट (57 चेंडू), जॅक ग्रेगरी (67 चेंडू), वेस्ट इंडीजचा शिवनारायण चंदरपॉल (69 चेंडू) यांची वेगवान शतके आहेत.