अधिवेशनातील गोंधळाचे खापर विरोधकांच्या माथी
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, December 23, 2009 AT 12:00 AM (IST)
नवी दिल्ली - संसदेत सरकार चर्चेसाठी तयार असतानाही विरोधकांनी महत्त्वाच्या मुद्यांवर बोलण्याऐवजी गोंधळच घातला, अशा शब्दांत हिवाळी अधिवेशनात झालेल्या गोंधळाचे खापर संसदीय कामकाजमंत्री पवनकुमार बन्सल यांनी विरोधकांवर फोडले.
अधिवेशनाच्या समारोपानिमित्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. लोकसभा शुक्रवारीच (ता. 18) अनिश्चित काळासाठी स्थगित झाली, तर राज्यसभा आज संपली. अधिवेशन काळातील कामकाजाची माहिती देताना बन्सल यांनी अधिवेशन फलदायी झाल्याचा दावा केला. मात्र, दोन्ही सभागृहांच्या बैठकांची कमी झालेली संख्या चिंतेचा विषय असल्याचे सांगितले. या अधिवेशनात झालेला गोंधळ, स्थगित झालेले कामकाज यामुळे लोकसभेत 31 तास 48 मिनिटे, तर राज्यसभेत 13 तास एक मिनिट एवढा वेळ वाया गेला, तर दोन्ही सभागृहांनी 17 विधेयके मंजूर केल्याचेही बन्सल यांनी सांगितले. दरम्यान, महिला आरक्षण विधेयक पुढील अधिवेशनात आहे त्या स्वरूपात मंजूर होण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
पुढील काळात दोन्ही सभागृहांच्या जास्तीत जास्त बैठका व्हाव्यात, यासाठी प्रयत्न केला जाईल. संसदीय समित्यांचे कामकाज उत्कृष्ट असल्याची प्रशंसा करून बन्सल म्हणाले, की समित्यांच्या बैठकांवर परिणाम होणार नाही, याची दक्षता बाळगताना दोन अधिवेशनांमधील काळ दोन महिन्यांपेक्षा जास्त नसावा, याकडेही लक्ष दिले जाईल.
लोकसभेत झालेल्या गोंधळात तब्बल आठ विधेयके कोणत्याही चर्चेविना मंजूर झाल्याबद्दल छेडले असता बन्सल यांनी सरकार चर्चेस तयार होते. कामकाज सल्लागार समितीच्या
बैठकीतही विधेयकांबाबत माहिती देण्यात आली, चर्चेसाठी वेळही ठरविण्यात आला होता. त्यानुसार, मंत्री सभागृहात उपस्थितही होते. मात्र, गोंधळात ते शक्य झाले नाही, असे सांगून त्यांनी वेळ मारून नेली. तेलंगणच्या मुद्यावरून लोकसभेत चार दिवस कामकाज विस्कळित झाले होते. त्या संदर्भात विचारले असता, लवकरच या मुद्यावर तोडगा शोधण्याचा प्रयत्न असेल. पुढील अधिवेशनामध्ये जास्तीत जास्त विधेयके येणार असल्याने त्यावर चर्चेसाठी वेळ मिळावा, यासाठी असे वादग्रस्त विषय आधीच शांत होणे चांगले, असेही बन्सल म्हणाले. मात्र, तेलंगणच्या संदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेस, द्रमुक यासारख्या सरकारमधील घटक पक्षांनी व्यक्त केलेल्या नाराजीच्या मुद्यावर छेडल्यानंतर आजचा विषय केवळ संसदेच्या कामकाजापुरताच आहे, असे म्हणून बन्सल यांनी प्रश्नाला बगल दिली.