कसोटी मालिकेसाठी संघ जाहीर
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, January 06, 2010 AT 12:00 AM (IST)
चेन्नई - बांगलादेश दौऱ्यातील दोन कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. दिल्लीचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा याची कामगिरी खालावली असली, तरी त्याची निवड झाली आहे. उत्तर प्रदेशचा मध्यमगती गोलंदाज सुदीप त्यागी याला संधी मिळाली आहे. तमिळनाडूच्या दिनेश कार्तिकला राखीव यष्टिरक्षक म्हणून स्थान मिळाले.
भारताच्या 16 जणांच्या संघात तीन फिरकी गोलंदाज आहेत. श्रीलंकेविरुद्ध खेळलेला संघ बहुतांश कायम आहे. केवळ एस. बद्रिनाथ याला वगळण्यात आले. निवड समितीने केवळ 15 मिनिटांत संघ निवडला. इशांतला गुणवत्ता दाखविण्याची आणखी एक संधी देण्यात आली. वन-डे आणि ट्वेंटी-20 मध्ये त्याची कामगिरी फारशी प्रभावी झालेली नाही.
या मालिकेतील पहिली कसोटी चितगावमध्ये 17 ते 21 जानेवारी दरम्यान होईल. दुसरी कसोटी मीरपूरमध्ये 24 ते 28 जानेवारीदरम्यान होणार आहे.
संघ - महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण, युवराजसिंग, हरभजनसिंग, झहीर खान, एस. श्रीशांत, अमित मिश्रा, प्रग्यान ओझा, इशांत शर्मा, मुरली विजय, दिनेश कार्तिक, सुदीप त्यागी.