Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

'एमबीए' पुन्हा तेजीत!
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, January 13, 2010 AT 03:00 AM (IST)
Tags: maharashtra,   education,   mba

उमेश घोंगडे 
 
पुणे -  उद्योग क्षेत्र मंदीच्या सावटातून बाहेर येत असल्याची चिन्हे दिसत असल्याने व्यवस्थापनशास्त्र (एमबीए) अभ्यासक्रमासाठीची मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे "एमबीए'च्या संस्था, त्यासाठीची प्रवेशक्षमता आणि प्रवेशेच्छूक या तिघांची संख्या वाढत आहे.

जागतिक पातळीवरील मंदीचा फटका गेल्या वर्षी औद्योगिक क्षेत्राला बसला होता. व्यवस्थापनशास्त्र संस्थांमधून थेट उद्योगांमध्ये होणाऱ्या भरतीवर (प्लेसमेंट) त्याचा परिणाम झाला. त्यामुळे या शाखेसाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या संस्थानिहाय काही प्रमाणात कमी झाली. यंदा या स्थितीत सुधारणा होत असून, "एमबीए'ला उत्सुक असणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे संस्थाचालकांनी सांगितले. येत्या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशप्रक्रियेची सुरवात काही संस्थांनी यापूर्वीच सुरू केली आहे. गेल्या महिन्यात "इंडियन इन्स्टिट्यूट्‌स ऑफ मॅनेजमेंट'साठीची "कॅट' चाचणी ऑनलाइन पद्धतीने झाली. सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाची "स्नॅप' ही चाचणीही गेल्या महिन्यात झाली होती. तिचा निकाल आज जाहीर झाला.
""व्यवस्थापनशास्त्र अभ्यासक्रमाचा उपयोग अनेक ठिकाणी होत असल्याने अनेक विद्यार्थ्यांचा कल त्याकडे आहे. त्यामुळे पदवी कोणत्याही शाखेतील असली, तरी विद्यार्थी "एमबीए'ला प्रवेश घेतात. मंदीचा परिणाम आता दिसत नाही. म्हणूनच प्रवेशेच्छूंची संख्या कमी होत न होता वाढत आहे,'' असे पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापनशास्त्र शाखेचे अधिष्ठाता डॉ. चंद्रशेखर चितळे यांनी "सकाळ'ला सांगितले.

"एमआयटी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट'चे कार्यकारी संचालक राहुल कराड म्हणाले, ""अभियांत्रिकीच्या पदवीनंतर "एमबीए' करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण पूर्वीपासूनच अधिक आहे. कारण अशा उमेदवारांना उद्योग क्षेत्रात तुलनेने चांगली संधी आहे. त्यामुळे करिअरचा चांगला पर्याय म्हणून विद्यार्थी या शाखेकडे पाहतात.''

पुणे केंद्रात गेल्या महिन्यात झालेल्या "कॅट'ची ऑनलाइन परीक्षा सहा हजार विद्यार्थ्यांनी दिल्याचे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील समन्वयक प्रा. एस. वाय. पाटील यांनी सांगितले. या परीक्षेसाठी गेल्या वर्षीपर्यंत पुण्यात केंद्र नव्हते. यावरूनही "एमबीए'कडील कल कसा वाढतो आहे हे स्पष्ट होते.

"एमबीए'साठीच्या संस्था चार प्रकारच्या असतात. पहिल्या प्रकारात "आयआयएम'सारख्या संस्थांचा समावेश होते. त्यांच्या प्रवेशासाठी "कॅट' परीक्षा घेतली जाते. "एआयसीटीई'ची मान्यता असलेल्या आणि विद्यापीठांना संलग्न असलेल्या संस्थांचा समावेश दुसऱ्या प्रकारात होतो. त्यासाठी संबंधित राज्य सरकारच्या तंत्रशिक्षण संचालनालयाद्वारा प्रवेश परीक्षा घेतली जाते. तिसरा प्रकार अभिमत विद्यापीठांना संलग्न असलेल्या संस्थांचा. त्यांच्यासाठीही स्वतंत्रपणे "सीईटी' घेतली जाते. शेवटच्या प्रकारात खासगी आणि स्वायत्त अभ्यासक्रमांचा. महाराष्ट्रात पहिला प्रकार वगळता उर्वरित तिन्ही प्रकारांत मोडणाऱ्या संस्था आहेत.

--------------------------------------------
महाराष्ट्रातील "एमबीए'च्या "सीईटी' आलेले अर्ज आणि प्रवेशक्षमता
वर्ष अर्ज प्रवेशक्षमता
२००७-०८ - ८८,००० १०,४२५
२००८-०९ - ९२,००० १५,५२५
२००९-१० - १,१४००० २१,६१५
--------------------------------------------
राज्याची "सीईटी' २१ फेब्रुवारीला
"एमबीए'साठीची राज्यातील "सीईटी' २१ फेब्रुवारीला होणार आहे. १८ जानेवारी ते दोन फेब्रुवारीदरम्यान राज्यातील पोस्ट कार्यालयातून माहितीपत्रक मिळणार आहे. सर्व अर्ज दोन फेब्रुवारीपर्यंत "ऑनलाइन' भरायचे आहेत. www.dt.org या संकेतस्थळावर सर्व तपशील उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
--------------------------------------------
Madhu Milan


आजचा सकाळ...
About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
Powered By: