
मीरपूर - भारत दौऱ्यातील मालिकेत झालेल्या पराभवाची परतफेड करताना श्रीलंकेने तिरंगी मालिकेत भारताचा चार गडी राखून पराभव करत विजेतेपद मिळविले. मालिकेच्या मध्यात संघात स्थान मिळालेला माहेला जयवर्धने श्रीलंकेच्या विजयाचा शिल्पकार ठरला. फलंदाजांनी केलेली हाराकिरी भारताच्या पराभवास कारणीभूत ठरली. भारताला रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा श्रीलंकेचा नूआन कुलसेकरा अंतिम सामन्याचा, तर कर्णधार कुमार संगकारा मालिकेचा मानकरी ठरला.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताला 48.2 षटकांत 245 धावांत रोखल्यावर श्रीलंकेने 48.3 षटकांत 6 बाद 249 धावा केल्या. माहेला जयवर्धने याने विजयी खेळी करताना नाबाद 71 धावांचे योगदान दिले. त्याला तिलकरत्ने दिल्शान आणि कुमार संगकारा यांची सुरेख साथ मिळाली.
आशिष नेहराने भरात असणाऱ्या उपूल थरंगाला भोपळा फोडण्यापूर्वीच बाद करून श्रीलंकेला धक्का दिला होता. मात्र, त्यानंतर दिल्शान आणि कर्णधार कुमार संगकारा यांनी परिस्थितीनुसार खेळ करत प्रथम संघाचा पाया भक्कम केला. दुसऱ्या विकेटसाठी त्यांनी 92 धावांची भागीदारी केली. प्रमुख गोलंदाज अपयशी ठरल्यावर धोनीने युवराज आणि हरभजन असा दुहेरी फिरकी मारा सुरू केला. त्यानंतर त्याने रवींद्र जडेजालाही आणले. फिरकी गोलंदाजांच्या हातात चेंडू देण्याचा त्याचा निर्णय चांगलाच यशस्वी ठरला. युवराजने दिल्शानला बाद केले. हरभजनने संगकारा आणि थिलन कंदंबी यांना बाद केले. जडेजाने समरवीराचा अडथळा दूर केला. पण, त्यानंतर जयवर्धने याने संयमी खेळी साकारत श्रीलंकेच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
त्यापूर्वी, सुरेश रैनाने कारकिर्दीत झळकाविलेल्या तिसऱ्या शतकामुळे भारताला आव्हानात्मक धावसंख्या उभे करता आले. वीरेंद्र सेहवागने 27 चेंडूंत 42 धावांची झंझावती सुरवात केली होती. मात्र, समोरून गंभीर आणि विराट कोहली हे भरात असलेले फलंदाज दुसऱ्याच षटकांत बाद झाले होते. नूवान कुलसेकरा आणि चाणका वेलेगेदरा यांच्या अचूक माऱ्यापुढे भारताची अवस्था एकवेळ 5 बाद 60 अशी झाली होती. त्या वेळी रैना आणि रवींद्र जडेजा यांनी सहाव्या विकेटसाठी केलेल्या 106 धावांच्या भागीदारीमुळे भारताचे आव्हान उभे राहिले.
श्रीलंका
थरंगा झे. कोहली गो. नेहरा 0
दिल्शान झे. धोनी गो. युवराज 49
(54 चेंडू 8 चौकार)
संगकारा झे. सेहवाग गो. हरभजन 55
(51 चेंडू, 8 चौकार)
जयवर्धने नाबाद 71
(81 चेंडू, 5 चौकार)
समरवीरा त्रि. गो. जडेजा 27
कंदंबी पायचीत गो. हरभजन 18
रणदीव धावबाद 17
परेरा नाबाद 6
अवांतर 6
एकूण 48. 3 षटकांत 6 बाद 249
बाद क्रम - 1-0, 2-93, 3-109, 4-157, 5-189, 6-228
गोलंदाजी -आशिष नेहरा 1.2-0-2-1
श्रीशांत 9.3-0-72-0
विराट कोहली 1.4-0-12-0
झहीर खान 10-0-51-0
हरभजन 10-041-2
युवराज सिंग 9-0-41-1
रवींद्र जडेजा 7-0-29-1