सचिन की पारी..अब १३ हजारी !
पीटीआय
Sunday, January 17, 2010 AT 06:52 PM (IST)
चटगाव : कागदावर भक्कम वाटणारी भारतीय फलंदाजी बांग्लादेशाविरुद्धच्या कसोटीत सपशेल नांगी टाकीत असतानाच, दुसरीकडे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर एकटाच किल्ला लढवीत होता. अशाही परिस्थितीत त्याने आज कसोटी सामन्यांतील १३ हजार धावांचा पल्ला पार केला. अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिलाच फलंदाज ठरला आहे.
बांगलादेशविरुद्धच्या आज सुरू झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी सचिन या विक्रमापासून केवळ ३० धावा दूर होता. डावाच्या ३६ व्या षटकात महमुदुल्लाहचा चेंडू पूल करीत त्याने हा मैलाचा टप्पा ओलांडला. यावेळी स्टेडियममधील प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला. धावांचा रतीब घालण्याची सवयच जणू जडलेल्या सचिनने त्यानंतर संयम दाखवीत आपले ५५वे कसोटी अर्धशतक साजरे केले.
अपुऱ्या सूर्यप्रकाशाअभावी पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा सचिन ७६ धावांवर नाबाद राहिला होता.
सचिन तेंडुलकर कसोटी कारकीर्द
१६२ सामने, १२९७० धावा, ४३ शतके, ५४ अर्धशतके, सरासरी ५४.७२
(ही कामगिरी चालू सामन्यापूर्वीची आहे.)
एकदिवसीय
४४० सामने, १७,३९४ धावा, ४५ शतके, ९३ अर्धशतके, सरासरी ४४.७१