Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

बस अपघाताची तीन वर्षे
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, January 20, 2010 AT 12:49 AM (IST)

भरत पाटील
अभोणा - सप्तशृंगदेवीचे दर्शन घेऊन परतीला निघालेली मुंबई लक्‍झरी बस "यू' वळणावरून कोसळून झालेल्या भीषण अपघातास उद्या (ता. 20) दोन वर्षे पूर्ण होत असले तरी त्या घटनेचा कोणताही बोध न घेता गडावरील या मार्गाची सुरक्षितता जपण्यासाठी डोळेझाक केली जात असल्याचे चित्र आहे.

सुटीचा सदुपयोग व्हावा या हेतूने मुंबईहून खासगी ट्रॅव्हल्सच्या लक्‍झरी बसने निघालेले भाविक शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन घेऊन सप्तशृंगगडावर उशिराने पोचले अन्‌ आदिमाया सप्तशृंग मातेच्या दर्शनानंतर परतीच्या मार्गाला निघालेली ही आराम बस रात्री दहाच्या सुमारास शेवटच्या "यू' वळणावर आली असता चालकाचा ताबा सुटला आणि क्षणात सातशे फूट खोल दरीत बस कोसळली. या भीषण अपघातात 43 प्रवासी ठार झाले, तर तितकेच जखमीही झाले होते. बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी कोंबल्याने मृतांची संख्या वाढल्याचे स्पष्ट झाले होते.

या अपघातास बसमधून उडी मारणारा चालक जसा जबाबदार तसेच वाहतुकीवर नियंत्रण ठेवणाऱ्या यंत्रणेचा हलगर्जीपणा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष व राज्य परिवहन खात्याचा निष्काळजीपणा कारणीभूत ठरल्याची प्रतिक्रिया त्या वेळी ग्रामस्थ व भाविकांनी व्यक्त केली होती. अपघाताची कारणमीमांसा करण्यात काही दिवस गेले. भाविकांना घटनेचा विसर पडतो न पडतो तोच "ये रे माझ्या मागल्या' अशी स्थिती निर्माण झाली. आजही अवैध प्रवासी वाहतूक, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असणाऱ्या वाहनांना रोखणे, अवजड वाहन अथवा लक्‍झरी बसला प्रवेशबंदी तसेच संरक्षक कठड्यांचे मजबूत बांधकाम आदी बाबींवर अजूनही कोणतीही कार्यवाही होत नाही. वास्तविक पाहता गडावर जाण्यासाठी दहा किलोमीटरच्या घाट मार्गाला संरक्षक भिंत बांधणे अथवा अपघातापासून सुरक्षितता राहील इतपत मजबूत बांधकाम करणे गरजेचे आहे. तरीही अपघातानंतर "बीओटी' तत्त्वावर ठेकेदाराकडून संभाव्य अपघाताच्या ठिकाणी तात्पुरती संरक्षक भिंत उभारण्यात आली आहे. अवघ्या दहा किलोमीटर मार्गासाठी ठेकेदाराकडून एका बाजूने वीस रुपये टोल आकारला जातो. त्यामानाने सुरक्षिततेची जबाबदारी फोल ठरली. केवळ नांदुरी ते सप्तशृंग गड ये-जा करण्याकरिता वाहनासाठी दोन्ही बाजूला 40 रुपये टोल देऊनही त्यादृष्टीने रस्त्याची सुरक्षितता उपलब्ध नाही.

दुसरीकडे अवजड वाहन, टेम्पो, ट्रक, लक्‍झरी बस यांना रात्री-अपरात्री घाटमार्गातील प्रवेशबंदी करण्यास संबंधित यंत्रणाही निष्क्रिय ठरली आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे. रात्री-अपरात्री येणाऱ्या भाविकांना नांदुरी येथे निवासाची उत्तम सोय नाही. त्यामुळे भाविक गडावर वाहनाने जाण्यासाठी आग्रही असतात. भीषण अपघातानंतर कळवणच्या प्रांताधिकाऱ्यांनी परिवहन महामंडळाची बससेवा चोवीस तास सुरू केली. अन्‌ काही दिवसांनी "जैसे थे' स्थिती निर्माण झाली. नांदुरीला परिवहन महामंडळाच्या उपलब्ध असलेल्या अडीच एकर जागेवर वाहनतळाची व्यवस्था करून भाविकांसाठी बससेवा चोवीस तास सुरू केल्यास उत्पन्नात वाढ होईल आणि भाविकांचाही सुरक्षित प्रवास व राहण्याची सोय होणार आहे.

मार्च 1994 मध्ये खिराड-नाशिक बस अवनखेड नदीत कोसळून 84 प्रवासी पाण्यात बुडून मरण पावले. त्याच वर्षी चैत्र पौर्णिमेला पाण्याच्या टॅंकरखाली सापडून नऊ भाविकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर 21 जानेवारी 2007 ला देवीचे दर्शन घेऊन परतीच्या मार्गाला निघालेल्या भाविकांच्या बसला अहिवंतवाडीजवळ वळणावर अपघात होऊन 24 जण ठार झाले होते. त्यानंतर अवघ्या एका वर्षात पुन्हा 20 जानेवारी 2008 ला सप्तशृंगगडावरून परतीच्या मार्गाला निघालेली आराम बस "यू' वळणावरून दरीत कोसळली अन्‌ या भीषण अपघातात 43 भाविकांना प्राण गमवावा लागला. दोन्ही बस मुंबईच्या होत्या.

आदिमाया सप्तशृंगी मातेच्या दर्शनानंतर परतीच्या मार्गाला निघालेल्या भाविकांचा दुर्घटनेचा विचार केला असता तो रोखण्यासाठी कुठेही प्रभावी उपाययोजना झाली नसल्याचे भाविकांचे म्हणणे आहे. या अपघाताच्या आठवणीने अभोण्यासह कळवण, वणी व परिसरातील ग्रामस्थांच्या अंगावर शहारेच उभे राहतात.

साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धे पीठ असणाऱ्या आदिमाया सप्तशृंग देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येत असतात. त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ठोस पावले उचलण्याची गरज आहे. मात्र यंत्रणा एकमेकांवर जबाबदारी ढकलत असल्याचे भाविकांचे म्हणणे आहे.

ठेकेदाराकडून नांदुरी ते सप्तशृंगगड रस्त्यावर मार्गदर्शक खुणा, फलक, संरक्षक कठड्यांचे मजबूत काम व सुरक्षितता, सार्वजनिक विभागाची तत्परता, तसेच संबंधित पोलिस यंत्रणेकडून वाहनांची जुजबी पडताळणी न होता काटेकोरपणे तपासणी आणि परिवहन महामंडळाकडून भाविकांसाठी चोवीस तास उत्तम बससेवा होणे गरजेचे आहे, असे भाविकांसह सर्वसामान्य नागरिकांचे म्हणणे आहे.


आजचा सकाळ...
About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
Powered By: