हॉकी इंडिया - कर्नाटक, चंडीगडला मतदानाचा अधिकार नाही
युएनआय
Sunday, January 24, 2010 AT 12:00 AM (IST)
नवी दिल्ली - हॉकी इंडियाच्या बहुचर्चित निवडणुकीसाठी चंडीगड आणि कर्नाटकला मतदानाचा अधिकार मिळणार नाही. दोन वेळा निवडणुकीची मुदत टळून गेल्यावर अखेर 7 फेब्रुवारीस होणाऱ्या निवडणुकीसाठी हॉकी इंडियाचे सदस्यत्व मिळालेल्या या दोन राज्यांनी आपल्या प्रतिनिधींची नावे दिलेल्या मुदतीत न कळविल्याने त्यांना मतदान करता येणार नाही.
हॉकी इंडियाच्या निवडणुकीत केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने जातीने लक्ष घातले आहे. त्यांच्या प्रत्येक हालचालींवर क्रीडा मंत्रालयाचे बारीक लक्ष आहे. त्यामुळे मतदार यादी जाहीर करण्याची मुदत टळून गेल्याने शनिवारी अखेर क्रीडा मंत्रालयाने मान्यताप्राप्त 64 सदस्य राज्यातील मतदारांची नावे जाहीर केली. या मतदार यादीची छाननी केल्यानंतर चंडीगडने चुकीचे, तर कर्नाटकने कुणाचेच नाव पाठवले नसल्याने या दोन्ही राज्यांच्या प्रतिनिधीला मतदान करता येणार नसल्याचे क्रीडा मंत्रालयाने स्पष्ट केले.
निवडणूक तोंडावर आली असली, तरी गोंधळाची परिस्थिती काही बदललेली नाही. कारण हॉकी चंडीगडने चंद्रशेखर आणि आत्माराम यांची नावे प्रतिनिधी म्हणून सादर केली होती. मात्र, चंडीगड ऑलिंपिक संघटनेने हॉकी इंडियाच्या निवडणुकीस उपस्थित राहण्यासाठी कोणाचीच शिफारस केली नसल्याचे पत्र दिले. आता त्यांच्या मतदानाच्या अधिकाराविषयी अंतिम निर्णय निवडणूक निर्णय अधिकारीच घेतील. मात्र, निवडणूक निर्णय अधिकारी कोण? हे अजून निश्चित झालेले नाही. हॉकी इंडियाने या पदासाठी कुस्ती महासंघाचे अध्यक्ष जी. एस. मंडेर यांची नियुक्ती केली. क्रीडा मंत्रालयाने त्यांच्या निवडीस आक्षेप घेताना दिल्ली उच्च न्यायालयात आव्हानही दिले.
हॉकी इंडियाच्या याचिकेवर आज बी. डी. अहमद आणि राजीव सहाय यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने भारतीय हॉकी ऑलिंपिक संघटनेला क्रीडा मंत्रालयाच्या अर्जावर सोमवारपर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे. त्याचवेळी क्रीडा मंत्रालयाने निवडणुकीसाठी कायदे का तयार केले नाहीत आणि सरकारकडे अधिकार आहेत, तर त्याचा वापर का केला नाही, असा खुलासा क्रीडा मंत्रालयास करण्यास सांगितला.
दरम्यान, मतदार यादीविषयी अधिक माहिती देताना क्रीडा मंत्रालयाने सेनादल, रेल्वे, आंतरविद्यापीठ क्रीडा आणि एअर इंडिया क्रीडा मंडळ या सदस्यांना हॉकी इंडियाच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत घटनेत दुरुस्ती केल्यानंतरच मतदान करता येईल, असे स्पष्ट केले. हॉकी इंडियाच्या निवडणुकीसाठी आज जाहीर केलेल्या यादीनुसार महाराष्ट्राकडून इक्रम खान आणि लीना वालिया यांना मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे.
कोण होणार अध्यक्ष?
हॉकी इंडियाच्या निवडणुकीसाठी मतदार यादी जाहीर झाल्यावर यात भारतीय हॉकी महासंघाचे अध्यक्ष के. पी. एस. गील, सध्याच्या हंगामी अध्यक्षा विद्या स्टोक्स आणि माजी खजिनदार नरेंद्र बत्रा या प्रमुख व्यक्तींचा समावेश आहे. पण, यापैकी कोणीही अध्यक्षपदाच्या शर्यतीत नाही. पंजाबने सुखविंदर सिंग बादल यांच्या ऐवजी परगटसिंग आणि अनुपम वसिष्ठ यांची नावे पाठवली. त्यामुळे बादल यांचे नाव मागे पडले. गील यांना अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रस नसल्याचे समजते. कलमाडी यांचेही नाव कुठल्या राज्याने पुढे केलेले नाही. त्यामुळे आता एकदम चर्चेत आलेले सहारा उद्योग समूहाचे जेबी रॉय यांचे अध्यक्षपदासाठी पारडे जड मानले जात आहे. बंगाल संघटनेकडून त्यांचे नाव आले आहे.