नाशिक शहरात क्रीडांगणाच्या उभारणीबाबत दुर्लक्ष
सकाळ वृत्तसेवा
Monday, February 08, 2010 AT 12:00 AM (IST)
हेमंत राऊत - सकाळ वृत्तसेवा
नाशिक - महापालिकेची स्थापना होऊन 28 वर्षे होऊनही शहरात पुरेशी क्रीडांगणे नाहीत. सध्या शहराचा चहूबाजूंनी झपाट्याने विकास होत असल्याने मोकळ्या भूखंडांवर, तसेच क्रीडांगणासाठी आरक्षित असलेल्या जागांवर अतिक्रमणांचा विळखा वाढत असून, वॉर्डनिहाय क्रीडांगणाची घोषणा हवेतच विरली आहे. शाळांच्या परिसरातही क्रीडांगणे नसल्याने विद्यार्थी व लहान मुलांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. आरक्षित भूखंडांवर प्राधान्याने क्रीडांगणे उभारावीत, अशी मागणी होत आहे.
महापालिका शिक्षण मंडळाच्या शहरात 145 शाळा आहेत. याशिवाय विनाअनुदानित शाळांची संख्याही मोठी आहे. या प्रत्येक शाळेस क्रीडांगण बंधनकारक आहे; मात्र खुद्द महापालिकेच्या पन्नासहून अधिक शाळांना क्रीडांगणे नाहीत. पहिल्या नगररचना आराखड्यात चाळीसहून अधिक भूखंड क्रीडांगणासाठी आरक्षित केले होते. त्याचप्रमाणे वॉर्डनिहाय क्रीडांगणे उभारले जातील, अशी घोषणा करण्यात आली होती. प्रत्यक्षात खेळाच्या मैदानासाठी असलेल्या अनेक भूखंडांना संरक्षक भिंती व कुंपणही केलेले नाहीत. नाशिक रोड व जेल रोड भागात 22 वॉर्ड आहेत. तेथे फक्त पाच मैदाने आहेत. अशीच परिस्थिती शहराच्या अन्य भागांतही आढळते. त्यामुळे विद्यार्थी व मुलांची खेळासाठी कुचंबणा होते. साडेचारशे कोटी रुपयांचे अंदाजपत्रक असलेल्या महापालिकेतर्फे खेळाच्या मैदानांच्या विकासासाठी होणारी तरतूद अतिशय नगण्य आहे. त्यामुळे शहरात खेळाडू कसे तयार होणार, हा प्रश्न आहे. महापालिकेने आजपावेतो समाजमंदिरे, व्यायामशाळा, उद्याने, सभामंडप, अपवादात्मक स्थितीत ग्रंथालय व अभ्यासिका दिल्या, जलतरण तलाव बांधले; मात्र मैदानांकडे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
या समस्येला महापालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी व काहीअंशी पालकही जबाबदार आहेत. कारण 14 वर्षांपेक्षा कमी वयाच्या चिमुरड्यांसाठी क्रीडांगणाची मागणी पालकांकडूनच व्हायला पाहिजे; परंतु पालकही याबाबत उदासीन दिसतात. मुलांच्या सर्वांगीण विकासात खेळांना महत्त्व आहे. मात्र त्यांना आपल्या वॉर्डात क्रीडांगण शोधून सापडले तर दैव! परिसरात मोकळी जागा ठेवून त्यात क्रीडांगण विकसित करण्यास प्राधान्य देण्याची मागणी होत आहे.