
ग्वाल्हेर - विक्रमादित्य सचिन तेंडूलकरने ग्वाल्हेरच्या कॅप्टन रुपसिंह स्टेडियमवर आज (बुधवार) इतिहास घडविला. विक्रमांचा या बादशाहने आणखी एक शिखर गाठत एकदिवसीय क्रिकेटमधील स्वप्नवत दोनशे धावांचा पल्ला गाठला. क्रिकेटच्या इतिहासात कधीही न घडलेली ही एेतिहासिक कामगिरी करताना त्याने भारताला पन्नास षटकांत ४०१ धावांचा डोंगरही रचून दिला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील या सामन्यातील सचिनच्या झंझावतासमोर गोलंदाज अक्षरशः घुडगे टेकून शरण आले.
शेवटच्या चार षटकांत सचिनला द्विशतकासाठी अवघ्या तीन धावा हव्या होत्या. नेमक्या याच वेळी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे तुफान सुरू झाले. त्याच्या फटकेबाजीमुळे सचिनला केवळ दोनच धावांची संधी मिळाली. पन्नासाव्या षटकात धोनीकडे स्ट्राईक आला. त्याने पहिल्याच चेंडूवर षटकार चढविला. दुसऱया चेंडूवर एकेरी धाव घेत त्याने १९९ वर नाबाद असलेल्या सचिनकडे स्ट्राईक दिला. सचिनने षटकातील तिसऱया चेंडूवर ही क्रिकेटच्या इतिहासातील पहिली द्विशतकी धाव घेतली आणि अवघे स्टेडियम जल्लोषात पार न्हाऊन निघाले.
सचिनने १४५ चेंडूत १९५ धावांची खेळी करीत पाकिस्तानच्या सईद अन्वर (१९४) आणि झिंम्बाब्वेच्या चार्ल्स कव्हेंन्ट्री (१९४) यांना मागे टाकले. याबरोबरच सचिनने एकदिवसीय कारकिर्दीतील ४६ वे शतकही झळकाविले. सचिनने १४७ चेंडूत २३ चौकार आणि ३ षटकारांसह २०० धावांची खेळी केली. भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी ४०२ धावांचे आव्हान ठेवले आहे.
येथील कॅप्टन रुपसिंह स्टेडिअमवर सुरु असलेल्या या सामन्या कर्णधार महेंद्रसिंह धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सेहवाग आणि सचिनने सुरवातीपासूनच फटकेबाजी करण्यास सुरवात केली. स्टेनच्या गोलंदाजीवर सेहवाग षटकार मारण्याच्या प्रयत्नात झेल देऊन ९ धावांवर बाद झाला. यानंतर आलेल्या दिनेश कार्तिकने सचिनच्या साथीत जोरदार फलंदाजी करीत दक्षिण आफ्रिकेला आणखी यश मिळू दिले नाही. दिनेश कार्तिक आणि सचिनने दुसऱया विकेटसाठी १९४ धावांची भागिदारी करीत विक्रम नोंदविला. कार्तिक ७९ धावांवर बाद झाला. यानंतर आलेल्या युसूफ पठाण आणि महेंद्रसिंह धोनी य़ांना आक्रमक फलंदाजी करीत भारताला ४०० धावांपर्यंत मजल मारुन दिली. धोनीनेही अर्धशतक नोंदविले.
या सामन्यासाठी भारताने आपला विजयी संघ कायम ठेवला असून, दक्षिण आफ्रिकेच्या संघात हाशिम आमला, जे पी ड्युमिनी आणि व्हॅन डर मर्व यांचा समावेश करण्यात आला आहे.