
जळगाव - मुंबई येथील फ्लोरेंझा कंपनीकडून जिल्ह्यातील नागरिकांना दुप्पट पैसे देण्याचे आमिष दाखवून सुमारे लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार येथील कंपनीत पैसे गुंतविलेल्या गुंतवणूकदारांनी केली आहे. याप्रकरणी मात्र पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.
पाच महिन्यांपूर्वी फ्लोरेंझा कंपनीचे अब्दुल कुरेशी (मुंबई), श्री. पाटील (मुंबई), अमर दुसाने (जामनेर) यांनी जळगाव व बोदवड येथील काही नागरिकांशी संपर्क साधला. त्यांनी त्यांना २१ दिवसांत पैसे दुप्पट केल्याचे सांगून त्यांच्याकडील रकमा ऑनलाइन बॅंकिंगद्वारे वरील कंपनीच्या खात्यावर जमा केल्या. त्यांना पैसे भरल्याच्या पावत्याही देण्यात आल्या. मात्र, मुदत संपल्यानंतरही कंपनीने त्यांनी गुंतविलेल्या रकमा परत केल्या नाहीत. २० डिसेंबर २००९ ही गुंतवणूकदारांना पैसे परत करण्याची अंतिम तारीख होती. गुंतवणूकदार वारंवार संबंधित कंपनीच्या प्रतिनिधींशी मुंबईत संपर्क साधतात. मात्र, त्यांचे मोबाइलही उचलत नाहीत. यामुळे गुंतवणूकदार पंधरा दिवसांपूर्वी कंपनीच्या मुंबई येथील कार्यालयात जाऊन त्यांनी कंपनीचे अधिकारी अन्सारी यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सुरवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर दहा दिवसांत पैसे परत करण्याचे आश्वासन दिले. मात्र, आतापर्यंत पैसे परत मिळालेले नाहीत.
कंपनीचे जिल्ह्यात कार्यालय नाही. एजंटामार्फत कारभार चालतो. जळगाव व बोदवड येथील अनेक नागरिकांच्या ग्रुप-ग्रुपने पैसे कंपनीत गुंतविले आहेत. मात्र, मुदत संपल्यानंतरही पैसे परत न मिळाल्याने नागरिक हताश झाले आहेत. "फ्लोरेंझा' ही बांधकाम व्यवसाय करणारी कंपनी आहे.
मुंबईत २५ कोटींची फसवणूक
फ्लोरेंझा कंपनीकडून मुंबईत २५ कोटींची फसवणूक केल्याचा गुन्हा सीबीडी बेलापूर (मुंबई) पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित अब्दुल कुरेशी (मुंबई) फरारी आहे. बेलापूर पोलिसांनी सात ते आठ जणांना अटक केली असून, कंपनीच्या कार्यालयास "सील' केले होते. या कंपनीत महाराष्ट्रासह गुजरात व इतर राज्यांतील नागरिकांनी गुंतवणूक केली आहे. यामुळे या कंपनीत गुंतवणूक केलेल्या नागरिकांसह महिला गुंतवणूकदारांमध्ये खळबळ उडाली आहे.
जयश्री गंधे (गुंतवणूकदार) - पाच महिन्यांपूर्वी आम्ही अमर दुसाने यांच्याकडे फ्लोरेंझा कंपनीत ऑनलाइन पैसे भरले. मात्र, अद्याप ते दुप्पट काय मूळ रक्कमही आम्हास परत मिळालेली नाही. कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधतो. मात्र, ते दूरध्वनी, मोबाइल उचलत नाहीत.
कंपनीचे जामनेर येथील प्रतिनिधी अमर दुसाने यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, की जळगाव जिल्ह्यातील ज्या गुंतवणूकदारांचा करार पूर्ण होण्याची तारीख २० डिसेंबर २००९ होती, त्यांची रक्कम अद्याप कंपनीने काढलेली नाही. कंपनीकडे या गुंतवणूकदारांच्या रकमा परत कराव्यात, अशा आशयाचा प्रस्ताव कंपनीकडे पाठविला आहे. कंपनीने अलॉटमेंट काढल्यास लागलीच गुंतवणूकदारांना पैसे परत मिळतील.