जवाहर सूतगिरणीच्या १७ जागा, १३९ अर्ज
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, March 10, 2010 AT 12:00 AM (IST)
धुळे - येथील जवाहर सहकारी शेतकरी सूतगिरणीची निवडणूक राजकीय विरोधाच्या विळख्यात सापडली आहे. या सूतगिरणीच्या 17 संचालकांच्या जागांसाठी होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी तब्बल 139 अर्ज आल्याने जवाहर गट आणि त्या विरोधात उभे ठाकणारे लोकशाही शेतकरी परिवर्तन पॅनलमध्ये संघर्ष अटळ असल्याचे स्पष्ट होत आहे. ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी झाली असून माजी मंत्री रोहिदास पाटील काय खेळी करतात, इच्छुकांना माघारी करण्यात यशस्वी होऊन निवडणूक बिनविरोध करण्याचे कौशल्य ते साधू शकतील काय, याकडे सर्वांच्या नजरा आहेत.
माजी मंत्री रोहिदास पाटील हे जवाहर सूतगिरणीचे संस्थापक अध्यक्ष आहेत. सध्या त्यांचे शालक सुभाष देवरे गिरणीचे अध्यक्ष आहेत. लोकसभा निवडणुकीपासून राजकीय फासे पलटल्याने आणि विरोध निर्माण झाल्याने बिनविरोध होणारी जवाहर सूतगिरणीची निवडणूक अटळ संघर्षाच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे.
नाराज, विरोधक एकत्र
कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील नाराज गट, शिवसेना- भाजप युतीचा प्रभावी सक्रीय गट एकत्र आले असून त्यांनी सूतगिरणीचे माजी अध्यक्ष तथा मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे पाहुणे किशोर पाटील यांना लोकशाही शेतकरी परिवर्तन पॅनलचे नेतृत्व सोपवत माजीमंत्री पाटील व त्यांच्या नेतृत्वाखालील जवाहर गटाला शह देण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. यातूनच जवाहर सूतगिरणीच्या निवडणुकींतर्गत 17 जागांसाठी आज तब्बल 139 अर्ज दाखल झाले. उद्या (ता. 10) छाननी आहे.
निवडणुकीसाठी अर्ज भरणारे प्रमुख इच्छुक उमेदवार ः किशोर पाटील, कुणाल पाटील, रंगराव धोंडू कोतेकर, नामदेवराव तोताराम पाटील, मधुकर जगन्नाथ गर्दे, प्रकाश रमेशचंद्र मुंदडा, सुभाष शिवाजीराव देवरे, गुणवंत राजाराम देवरे, उत्कर्ष विश्वास पाटील, गुलाबराव रघुनाथ पाटील, रामकृष्ण तथा बाबूशेट उपाध्ये, हेमलता मोहन जैन.
महिला सूतगिरणीसाठी तीन जागा बिनविरोध
धुळे - माजीमंत्री रोहिदास पाटील, कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखालील अजंग (ता. धुळे) येथील महिला सूतगिरणीची देखील निवडणूक होत आहे. त्यात 17 जागांसाठी महिला संचालिका निवडल्या जातील. यात कापूस उत्पादक मतदारसंघासाठी 13 जागा 21 अर्ज, इतर मागास वर्ग संवर्गात 1 जागा 5 अर्ज आले आहेत. मात्र, अनुसूचित जाती- जमाती, भटक्या विमुक्त जाती व दुर्बल घटकाच्या प्रत्येकी एका जागेसाठी एक अर्ज आल्याने या तीनही मतदारसंघांची जागा बिनविरोध निवडून आली आहे. जवाहर सूतगिरणीसाठी प्रांत तुकाराम हुलवळे हे निवडणूक निर्णय अधिकारी, तर शिवकुमार आवळकंठे सहाय्यक अधिकारी, महिला सूतगिरणीसाठी प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी भीमराज दराडे निवडणूक निर्णय अधिकारी, तर नायब तहसीलदार बी. बी. साळुंखे सहाय्यक अधिकारी म्हणून काम पाहात आहेत.