तीनही आघाड्यांवर अपयशी ठरलो - अनिल कुंबळे
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, March 16, 2010 AT 12:00 AM (IST)
महत्त्वाच्या स्पर्धेत पहिल्याच सामन्यात पराभव पत्करावा लागणे, ही निश्चितच निराश करणारी घटना आहे. अर्थात, इतिहासाचा विचार करायचा झाल्यास गेल्या स्पर्धेतही आमची सुरवात संथच झाली होती. पण, म्हणून पराभवास कारणे देणार नाही. एखाद्या महत्त्वाच्या स्पर्धेला सुरवात करताना सलामीला विजय मिळविणे आवश्यक असते. आम्हाला यात अपयश आले. ईडन गार्डनची खेळपट्टी संथ होती. तरी आम्हाला प्रथम फलंदाजी करणे कठीण गेले. पहिल्या सहा षटकातील क्षेत्ररक्षणाच्या मर्यादेचा आम्ही विचार केला होता. त्याचा आम्हाला फायदा उठवता आला नाही. आमच्या पहिल्या तीन विकेट फलंदाजांच्या चुकीने पडल्या. फटका मारण्याच्या नादात फलंदाजांनी चेंडू यष्ट्यांवर ओढवून घेतला. मला, अपयशाची कारणे द्यायची नाहीत. तरी, नशीब आमच्याबाजूने नव्हते असे मी म्हणेन. आमची फलंदाजीही चांगली झाली नाही. ट्वेंटी-20 क्रिकेट स्पर्धेत 135 धावांचे आव्हान निश्चित मोठे नव्हते.
कोलकता नाईट रायडर्सने अगदी नियोजन पद्धतीने आव्हानाचा पाठलाग केला. त्यांनी विकेट न देण्याचे गणित अचूक सोडवले. त्यामुळे सामना त्यांच्याबाजूने झुकला असे मला वाटते. कमी धावांच्या आव्हानाचा बचाव करताना तुम्हाला प्रतिस्पर्धी संघांच्या विकेट्स मिळणे आवश्यक असते. आम्हाला इथेही अपयश आले. आम्ही महत्त्वाच्या क्षणी फलंदाजांना धावबाद करण्याच्या संधी सोडल्या. त्यामुळे एका अर्थी कालचा दिवस आमचा नव्हता. क्रिकेटमधील फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण अशा तीनही आघाड्यांवर आम्ही अपयशी ठरलो.
पंजाबनेही आपला पहिला सामना गमावला. त्यामुळे आज होणाऱ्या सामन्यात आमच्याबरोबर पंजाबलाही विजय मिळविणे अनिवार्य आहे. विजय मिळाले, तरच आमचे आव्हान कायम राहील. यंदाच्या हंगामातील पहिला सामना आम्हाला आमच्या घरच्या मैदानावर खेळायला मिळाले. बंगळूरमधील चाहत्यांच्या आमच्याकडून भरपूर अपेक्षा आहेत. त्यांना निराश करून चालणार नाही. लागोपाठ सामने खेळण्यापूर्वी खेळाडूंचा प्रवासही भरपूर झाला असला, तरी विजय आवश्यक असल्याने आता खेळाडूंना तेवढी कणखर मानसिकता दाखवावीच लागेल. त्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन राखणेही गरजेचे आहे. समोर येणारी एकही संधी सोडून चालणार नाही.
(हॉकआय कम्युनिकेशन)