प्रवीण तोगडिया यांच्या कंधमाल दौऱ्यास नकार
सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, March 19, 2010 AT 12:00 AM (IST)
भुवनेश्वर - विश्व हिंदू परिषदेचे (विहिंप) आंतरराष्ट्रीय सचिव प्रवीण तोगडिया यांना दंगल झालेल्या कंधमाल भागात जाण्यास स्थानिक प्रशासनाने नकार दिला आहे. तोगडिया यांचा आजपासून राज्य दौरा सुरू झाला. ते उद्या (ता. 19) कंधमाल येथे जाणार होते.
कंधमाल परिसरात भेट दिल्यानंतर तोगडिया यांच्याकडून कथित चिथावणीखोर वक्तव्य होण्याची शक्यता लक्षात घेता, जिल्हाधिकारी डॉ. कृष्णकुमार यांनी त्यांना तेथे जाण्यास मान्यता दिलेली नाही. ऑगस्ट 2008 मध्ये "विहिंप'चे ज्येष्ठ नेते स्वामी लक्ष्मणानंद सरस्वती यांची कंधमालमध्ये हत्या झाल्यानंतर या परिसरात जातीय दंगली उसळल्या होत्या.
या पार्श्वभूमीवर तोगडिया यांच्याकडून कथित चिथावणी देणारे वक्तव्य झाल्यास स्थानिक पातळीवर कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती बिघडू शकते. कोणताही धोका पत्करण्यास प्रशासन तयार नाही. यामुळेच तोगडिया यांना कंधमालमध्ये जाण्यापासून रोखण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
"विहिंप'चे राज्य सचिव गौरीशंकर रथ यांनी प्रशासनावर टीका केली आहे. ते म्हणाले, की प्रशासन आम्हाला विकासाच्या सूचना देण्यापासून रोखू शकत नाही. प्रशासनाला शक्य नसेल तर तोगडिया यांना आम्ही संरक्षण देऊ. प्रशासनाने त्यांना कंधमालमध्ये भेट देण्यापासून रोखू नये.