पत्नीवर २८ चाकूचे वार करणाऱ्या पतीस सक्तमजुरी
सकाळ वृत्तसेवा
Saturday, March 20, 2010 AT 06:47 PM (IST)
जळगाव - मुंबईला राहण्यास नकार देणाऱ्या पत्नीवर चाकूने 28 वार करून तीस जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्याऱ्या 66 वर्षीय पतीस न्या.आर.एस. खारकर यांनी दोन वर्षाची सक्तमजुरी व एक हजार रुपये दंडाची शिक्षा आज दुपारी पावणेदोनला ठोठावली. ही घटना भुसावळ येथे 3 जानेवारी 09 ला घडली होती.
या खटल्याची माहिती अशी : भुसावळ येथील गौतम हौसिंग सोसायटीतील रहिवासी मधुकर चावदास इंगळे (वय 66; रा.मुंबई) हे मुंबईहून गावित आले होते. या ठिकाणी त्यांची पत्नी सुमनबाई इंगळे व बहीण सुशीला ह्या राहत असे. ते व त्यांचा मुलगा हे दोघे मुंबई येथे राहत असे. सुमनबाईस ते मुंबई येथे राहण्यासाठी आग्रह करीत असे. मात्र, त्या सुमनबाई हिने नकार दिला. 3 जानेवारी 09 ला दुपारी तीन ते साडेतीनच्या सुमारास इंगळे यांच्या राहत्या घरातून वाचवा-वाचवा असा आवाज आला. हा आवाज ऐकून समोरच राहणारे राहुल रघुनाथ घोडेस्वार (रा.कंडारी ता. भुसावळ) व त्याचा मित्र किरण लक्ष्मण मोरे हे धावत आवाजाच्या दिशेने गेले. बंद घराच्या बाथरुममधून रक्त मिश्रित पाणी बाहेर वाहत असताना दिसून आले. दरवाजा हा आतून बंद होता. श्री.घोडेस्वार व श्री. मोरे ह्यांनी दगडाने दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, उघडला गेला नाही. थोड्यावेळाने बंद घराचा दरवाजा उघडून त्यातून मधुकर इंगळे हे बाहेर पडले. या दोघांनी आत जाऊन बघितले असता किचन रूममध्ये सुमनबाई ह्या रक्त्याच्या थारोळ्यात पडल्या होत्या. त्यांच्या अंगावर ठिकठिकाणी जखमा झाल्या होत्या. त्यांनी जखमी सुमनबाई ह्यांना भुसावळ पालिका रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. त्यानंतर तापी लाइफ केअर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉ. सुरेंद्र भिरूड यांनी शस्त्रक्रिया केली. यात त्यांच्या पोटातून चाकूचे तुटलेले पाते काढले. तसेच 28 वार करण्यात आले असल्याचे दिसून आले.तक्रारीनंतर जखमी सुमनबाई ह्यांचाही जबाब घेण्यात आला होता. या प्रकरणी भुसावळ शहर पोलिस ठाण्यात राहुल घोडेस्वार यांनी दिलेल्या माहितीवरून मधुकर इंगळे यांच्याविरूद्ध खुनाच्या गुन्ह्याचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा खटला न्या.आर.एस. खारकर यांच्यासमोर चालला. या खटल्यात चौदा साक्षीदार तपासण्यात आले.
यात फिर्यादी राहुल, डॉ.भिरूड, संशयिताचा मुलगा राजेश यांचा समावेश होता. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपअधीक्षक विश्व पानसरे यांनी केला होता. या खटल्याची आज अंतिम सुनावणी होऊन न्या.खारकर यांनी वयोवृद्धाचे वय लक्षात घेऊन दोन वर्षाची सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. सरकार पक्षातर्फे ऍड. शरद सूर्यवंशी यांनी युक्तिवाद तर ऍड.आर.आर. वाणी यांनी संशयित आरोपीतर्फे काम पाहिले. दरम्यान, घटनेनंतर अवघ्या सहा महिन्यातच दुसऱ्या आजाराने सुमनबाई यांचे निधन झाले, असे न्यायालयाच्या आवारात शिक्षा सुनावणीनंतर आप्तस्वकीयांनी सांगितले.