राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी इंग्लंड मोठे पथक पाठविणार
सकाळ वृत्तसेवा
Saturday, March 20, 2010 AT 12:00 AM (IST)
नवी दिल्ली - येथे ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी इंग्लंड पूर्ण ताकदीनिशी मोठे पथक पाठविणार आहे. इंग्लंडचे पथकप्रमुख क्रेग हंटर यांनी नुकतीच नवी दिल्लीला भेट दिली. त्या वेळी त्यांनी ही माहिती दिली. राष्ट्रकुल स्पर्धेच्या इंग्लंडच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार ते सतरा क्रीडा प्रकारांसाठी 560 सदस्यांचे पाठविणार आहेत. 2006च्या राष्ट्रकुल स्पर्धेपेक्षा हे पथक मोठे असणार आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव इंग्लंड या स्पर्धेसाठी पथक पाठविणार नाही, असे आधीचे वृत्त होते. ते हंटर यांनी फेटाळून लावले. ""लंडनमध्ये 2012 मध्ये होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेसाठी राष्ट्रकुल स्पर्धा महत्त्वाची आहे, यात शंका नाही. त्यामुळे त्यामध्ये भाग घेण्यासाठी आमचे खेळाडू उत्सुक आहेत,'' असे हंटर यांनी म्हटले आहे.
या स्पर्धेत कोण सहभागी होणार आणि कोण नाही, हे योग्य वेळी कळेलच, असे सांगून हंटर म्हणाले, ""दिल्लीतील प्रत्येक स्पर्धा ठिकाणाची आपण पाहणी केली असून, ती सर्व स्पर्धेच्या आधी सज्ज होतील, असा आपल्याला विश्वास आहे. आमचे भारताबरोबरचे संबंध चांगलेच दृढ आहेत. ते अतिशय चांगल्या पद्धतीने स्पर्धेचे आयोजन करतील, यात शंका नाही.''
दरम्यान, ऑस्ट्रेलियन राष्ट्रकुल स्पर्धा संघटनेचे मुख्य अधिकारी पीटर क्रॉसव्हाइट म्हणाले, ""इंग्लंडचे खेळाडू देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी कणखर आणि अधिक जिद्दी आहेत. त्यामुळे ते आनंदाने या स्पर्धेत सहभागी होतील. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना आम्ही नवी दिल्लीत करण्यात आलेल्या सुरक्षाव्यवस्थेची माहिती दिली आहे. आत्तापर्यंत तरी आम्हाला कुठल्याही खेळाडूने स्पर्धेसाठी जाणार नसल्याचे सांगितलेले नाही. स्पर्धेत सहभागी होण्याबाबत ज्याने त्याने आपली मानसिक तयार करायची आहे, परंतु जर कुणी सहभागी झाले
नाही, तर मी खूपच निराश होईन.''
विश्वकरंडक हॉकी स्पर्धेच्या आयोजनाबरोबरच नेमबाजी आणि तिरंदाजी स्पर्धा आयोजित केल्यानंतर भारतीय संयोजकांचा आत्मविश्वास वाढला असल्याचेही ते म्हणाले.