Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

"द रोमान्स ऑफ टाटा स्टील'मुळे नव्या पिढीला प्रेरणा मिळेल
सकाळ वृत्तसेवा
Sunday, March 21, 2010 AT 12:00 AM (IST)
Tags: book,   tata steel,   pune

पुणे - "द रोमान्स ऑफ टाटा स्टील' या पुस्तकाच्या मराठीतील अनुवादाने जगातील अग्रगण्य पोलाद कंपनीचा इतिहास सामान्यांपर्यंत पोचून नव्या पिढीपुढे प्रेरणादायी आदर्श निर्माण होईल, असा विश्‍वास टाटा स्टील कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक हेमंत नेरुरकर यांनी शनिवारी व्यक्त केला.

ज्येष्ठ पत्रकार आर. एम. लाला लिखित या पुस्तकाचा प्रा. विश्राम ढोले यांनी मराठीत अनुवाद केला. उत्कर्ष प्रकाशनच्या वतीने तयार करण्यात आलेल्या पुस्तकाचे प्रकाशन "सकाळ पेपर्स लिमिटेड'चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या हस्ते करण्यात आले, त्या वेळी नेरुरकर बोलत होते. टाटा मॅनेजमेंट सेंटरमध्ये हा कार्यक्रम झाला. नेरुरकर म्हणाले, ""पारतंत्र्यात एका भारतीयाने स्थापन केलेला "टाटा स्टील' हा देशातील पहिला पोलाद कारखाना आहे. अनेक चढ-उतारांवरून वाटचाल करीत कंपनीने अग्रगण्य स्थान संपादन केले. अनेक प्रामाणिक नेत्यांमुळे कामगार आणि व्यवस्थापनातील संबंध सलोख्याचे राहिले.
 
जॉर्ज  फर्नांडिस यांनी कारखान्याचे राष्ट्रीयीकरण करण्यासाठी केलेला प्रयत्न कामगारांनी हाणून पाडला. त्यामुळे टाटा स्टीलला पुन्हा प्रगतीचे बळ प्राप्त झाले.''

अध्यक्षीय भाषणात प्रतापराव पवार म्हणाले, ""टाटा स्टीलच्या शताब्दीनिमित्त हे पुस्तक लिहून लाला यांनी समाजावर उपकार केले आहेत. माझ्या मनावर सामाजिक आणि औद्योगिक प्रेरणेचा ठसा उमटविणाऱ्या अनेक पुस्तकांतील हे एक आहे. टाटा उद्योग समूहाशी माझे कायमच आत्मीयतेचे नाते राहिले आहे. टाटा स्टील्सशी माझे चांगले व्यावसायिक संबंध असल्याने हे पुस्तक माझ्यासाठी उत्कृष्ट, बोधप्रद आणि चिरंतन प्रेरणादायी ठरेल. लाला यांनी टाटा स्टीलप्रमाणे इतर उद्योगांवरही पुस्तके लिहावीत.''

पुस्तकाचे मूळ लेखक लाला यांनीही मनोगत व्यक्त केले. टाटा स्टीलचे माजी व्यवस्थापकीय संचालक बी. मुथुरामन यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळेच मी हे पुस्तक लिहू शकलो. हे पुस्तक एका भारतीय उद्योगाने केलेल्या खडतर प्रवासाचे चित्र आहे. 1991 मध्ये बंद पडणाऱ्या या कंपनीतील उत्कृष्ट कामगार आणि व्यवस्थापनातील संबंधामुळेच ही कंपनी पुन्हा जगातील  अग्रगण्य पोलाद कंपनी म्हणून स्थान संपादन करू शकली आहे, असे लाला यांनी स्पष्ट केले. प्रा.ढोले यांनी या वेळी मनोगत व्यक्त केले. उत्कर्ष प्रकाशनचे संचालक सु. वा. जोशी यांनी प्रास्ताविक केले. मंजिरी धामणकर यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.

एका प्रामाणिक उद्योजकाचा प्रवास
"सकाळ पेपर्स लिमिटेड'चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या औद्योगिक क्षेत्रातील वाटचालीबाबत या कंपनीतील प्रमुख अधिकारी श्री. हसन यांनी सांगितलेली माहिती लाला यांनी पुस्तकात आवर्जून नमूद केली असल्याची माहिती कंपनीचे अधिकारी योगेश जोशी यांनी दिली. 1970 च्या दशकात बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीमधून इंजिनिअरिंगची पदवी घेऊन बाहेर पडल्यानंतर एका तरुणाने जमशेदपूर येथे लघुउद्योग सुरू केला. त्याला काही कामेही कंपनीच्या वतीने देण्यात येत होती. एवढ्या मोठ्या कंपनीतील छोटा पुरवठादार असलेल्या त्या तरुणास हसन यांनी विशेष अतिथी म्हणून कंपनीतील कार्यालयात बोलाविले. त्याबद्दल त्या तरुणालाही आश्‍चर्य वाटून त्याने बोलाविण्याचे कारण विचारले, तेव्हा हसन म्हणाले, ""ही कंपनी ज्यांच्यासोबत आर्थिक व्यवहार करते, त्यांच्याबाबत आम्ही माहिती गोळा केली. त्यात तुमच्याविषयी कळाल्याने तुम्हाला बोलाविले आहे. तुमची
कामावर अतिशय निष्ठा असून, तुम्ही प्रामाणिक व कष्टाळू आहात. आमच्याकडून कामे मिळण्यासाठी तुम्ही कंपनीतील कोणालाही आमिषे दाखविली नाहीत की लाच दिली नाही, असे मला कळाले आहे. कंपनीतील प्रशासन भ्रष्ट होऊ नये, यासाठी आम्ही दक्ष असतो. म्हणून तुमच्यासारख्या व्यावसायिकांना आम्ही प्रोत्साहन देऊ इच्छितो. तुमच्यासारख्या लोकांमुळे आम्हाला भ्रष्ट लोकांशी व्यवहार करण्याची वेळ येणार नाही. याचा अखेर कंपनीलाच फायदा होणार आहे.'' हा तरुण "सकाळ' या दैनिकाचा अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बनला असून, केवळ उद्योगविश्‍वच नव्हे, तर पत्रकारिता आणि सामाजिक जीवन क्षेत्रात त्याने एक वेगळे मानाचे स्थान संपादन केल्याचे पुस्तकात नमूद करण्यात आल्याचे श्री. जोशी यांनी सांगितले.
प्रतिक्रिया
On 3/21/2010 6:01 AM Dnyandev Deokar said:
वेरी गुड


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: