कॅलिससारखे खेळाडू संघात हवेतच!
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, March 23, 2010 AT 12:00 AM (IST)
क्रिकेटमध्ये एकाच खेळाडूने फलंदाजी तसेच गोलंदाजीच्या सरासरीत वर्चस्व राखले असल्याचे क्वचितच दिसते, पण जॅक कॅलिस करीत असलेली फलंदाजी नवोदितांसाठी धडा आहे. त्याला बाद करण्यात चारही प्रतिस्पर्धी अपयशी ठरले आहेत. त्याने तीन वेळा सामनावीर पुरस्कार मिळविला आहे, त्यावरून त्याचा प्रभाव किती आहे, हे लक्षात येईल. त्याचबरोबर आमच्यासाठी तो महत्त्वाची षटकेही टाकत आहे. आमची गोलंदाजीची योजना यशस्वीपणे राबविण्यात त्याचा मोलाचा वाटा आहे. त्याच्यासारखा मोलाचा खेळाडू संघात हवाच असतो.
आम्ही दोन "अवे' आणि दोन "होम' लढती खेळलो आहोत, तरीही गुणतक्त्यात आघाडीवर आहोत. कर्णधार या नात्याने मी या क्रमवारीस फारसे महत्त्व देत नाही. गतवर्षी आम्ही एकदा आठव्या क्रमांकावर होतो, पण तरीही हार पत्करली नाही. त्या वेळी आमच्याबद्दल खूप काही बोलले जात होते, पण आम्ही जिंकण्यासाठी मैदानावर उतरत असतो, या गोष्टीस मी महत्त्व दिले. आमची चेन्नईविरुद्धची लढत याच प्रकारची असेल. त्यांच्याकडे मॅथ्यू हेडन, सुरेश रैनासारखे काही चांगले आक्रमक फलंदाज आहेत. त्यामुळे योजनेची योग्य प्रकारे अंमलबजावणी करणे महत्त्वाचे असेल. आम्ही प्रत्येक प्रतिस्पर्ध्यासाठी भिन्न योजना तयार केल्या आहेत, तसेच पूर्ण पूर्वतयारी करूनच मैदानात उतरतो; मात्र सर्वांत महत्त्वाचे असते ते योजनेची अंमलबजावणी. स्पर्धा सुरू होऊन दहा दिवसच झाले आणि आमच्या चार लढती झाल्या आहेत व आता लागोपाठ दोन सामने खेळणार आहोत, त्यामुळे चांगलीच दमछाक होते. त्यामुळे संघाची निवड महत्त्वाची आहे. 45 दिवस खेळाडूंना ताजेतवाने तसेच फॉर्ममध्ये राखणे महत्त्वाचे आहे. गेल्या काही सामन्यांत राखीव असलेल्या अभिमन्यू मिथुनला आता लवकरच अंतिम संघात स्थान मिळेल. विनय कुमार गेल्या सामन्यात चांगलाच यशस्वी ठरला, तसेच त्याची फलंदाजीही उपयुक्त आहे.
आता दोन होम लढती आहेत, त्यामुळे प्रेक्षकांचा पाठिंबाही महत्त्वाचा आहे. गेल्या तीन वर्षांत चाहते आणि आमच्यातील नाते अधिकच घट्ट होत आहे. आम्ही घरच्या मैदानावर खेळतो, त्या वेळी खूप रेड शर्टस् दिसत असतात. चाहते व संघ यांच्यातील संबंध दृढ करण्याचे श्रेय फ्रॅंचाईजना आहे. अर्थात, त्यामुळे सांघिक भावना अधिक बळकट होते. केवळ आयपीएलमध्येच नव्हे, तर रणजी लढतीच्या वेळीही मनीषला चांगले प्रोत्साहन मिळत होते. विनय व अन्य खेळाडू केवळ कर्नाटकचे नसतात; तर ते आरसीबीचे खेळाडू झाले आहेत. (हॉकआय कम्युनिकेशन्स)