निमलष्करी जवानांसाठी बांधणार एक लाख घरे
सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, March 25, 2010 AT 12:00 AM (IST)
नवी दिल्ली - केंद्रीय निमलष्करी दलासाठी घरांची आवश्यकता लक्षात घेऊन गृह मंत्रालयाने एक लाख घरे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. देशभरात 245 ठिकाणी अशी घरे बांधण्यात येणार असून, येत्या चार वर्षांत खासगी व सार्वजनिक भागीदारी तत्त्वावर हे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येणार आहे. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प निमलष्करी दलांसाठी मनोधैर्य आणि कार्यक्षमता वाढविणारा असल्याचे गृह मंत्रालयाचे म्हणणे आहे.
या प्रकल्पाची घोषणा 2009-10 च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी केली होती. गृह, अर्थ मंत्रालय आणि आशियायी विकास बॅंकेच्या मदतीने या प्रकल्पाच्या शक्यतेसंदर्भात पडताळणी अहवाल जानेवारीपर्यंतच पूर्ण केला आहे. सद्यःस्थितीत निमलष्करी दलाच्या जवानांसाठी निवासस्थानांचे प्रमाण केवळ 15.4 टक्के आहे. हे अतिशय कमी असून, अपेक्षित 25 टक्के प्रमाण गाठण्यासाठी बराच कालावधी लागणार आहे. या विलंबाचा जवानांच्या कार्यक्षमतेवरही परिणाम होत आहे.
त्या पार्श्वभूमीवर सीमा सुरक्षा दल, केंद्रीय राखीव पोलिस दल, भारत-तिबेट सीमा दल, सहस्र सीमा दल आणि आसाम रायफल या निमलष्करी दलांशी चर्चा करून 245 ठिकाणे निश्चित केली आहेत. या ठिकाणी जमीनही तयार आहे. पथदर्शी प्रकल्पासाठी (पायलट प्रोजेक्ट) 30 ठिकाणे निवडण्यात आली असून, त्यासाठीची सूचना यापूर्वीच 10 मार्चला काढण्यात आली आहे. या संदर्भात विकसकांना कामापोटी वार्षिक मोबदला देण्यासाठीची तरतूद गृह मंत्रालयाच्या अंदाजपत्रकात करण्यात येणार आहे. उर्वरित 215 जागांवर येत्या आर्थिक वर्षात काम सुरू होईल.